जालना :- कोरोनाच्या निर्मुलनासाठी दि. 8 ते 14 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम अत्यंत प्रभावीपणे आणि नियोजनबध्द पध्दतीने राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत डॉ. राठोड बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. जयश्री भुसारे, डॉ. संजय जगताप, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन नार्वेकर आदींची उपस्थिती होती. तर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातुन विस्तार अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व नगर पालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, या मोहिमे अंतर्गत जास्तीतजास्त लसीकरण करण्याबाबत प्रयत्न करावेत. प्रसिध्दी व प्रचारावर जोर द्यावा. यासाठी काटेकोर नियोजन करावे. विस्तार अधिका-यांनी सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेऊन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल, याची दक्षता घ्यावी. शहरामध्ये देखील नगर पालिकेच्या मुख्याधिका-यांनी जनजागृती करावी. विशेषत: दुकानदार व तेथील कर्मचा-यांचे लसीकरण झाले का ते तपासावे.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, लसीचा अजिबात तुटवडा नाही. मुबलक प्रमाणात लसीचा साठा उपलब्धआहे. त्यामुळे ‘मिशन कवच कुंडल’ ही मोहिम प्रभावीपणे राबवावी. महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबीराच्या माध्यमातून करण्यासाठी प्राचार्यांशी संपर्क साधण्याची सूचना यावेळी जिल्हाधिका-यांनी अधिका-यांना केली.
Leave a Reply