जालना – जालना जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. जालना जिल्हा बालविवाहमुक्त होऊन मुलींसह जिल्ह्याला सक्षम करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येऊन एकत्रितरित्या बालविवाहाविरोधात काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. महिला व बालविकास विभाग, युनिसेफ व एसबीसी3 यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील बालविवाह निर्मूलनासाठी प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण या कार्यशाळेचे जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. राठोड बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती संगिता लोंढे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमंद्रे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष मनोहर बंसवाल, निशित कुमार, प्रिया सबनीस आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात बालविवाह घडणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण आहे. बालवयात अनेक मुलींचे लग्ने लाऊन दिली जातात. मुलींचा शारिरीक विकास पुरेशा प्रमाणात झालेला नसल्याने मुलींच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होतात. समाजाला लागलेल्या या प्रथेचे समुळ उच्चाटन होण्यासाठी समाजातील प्रत्येकाने बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आमच्या गावात आम्ही बालविवाह होऊ देणार नाही हा निर्धार प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी सांगितले.
युनिसेफ व विविध विभागांच्या सहकार्याने बालविवाह निर्मूलनासाठी प्रशिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी एक साखळी निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षकांनी ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती, शिक्षक, शिक्षिका यांना बालविवाह रोखण्याबाबत प्रशिक्षण देण्याचे आवाहन करत येणाऱ्या काळात जालना जिल्हा बालविवाहमुक्त होईल, यादृष्टीने प्रत्येकाने आपली भूमिका बजावण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी केले. यावेळी मनोहर बन्सल, निशित कुमार यांनीही बालविवाह रोखण्यासंदर्भात प्रशिक्षकांना उपयुक्त अशी माहिती दिली. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यशाळेस विविध विभागाचे अधिकारी तसेच प्रशिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Leave a Reply