ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माझी भटकंती ट्रेक फिलिंग..

September 29, 202115:15 PM 32 0 0

25 डिसेंबर सोनेरी पहाट भ्रमंती होती राजधानी सातारा किल्ले जरंडेश्वर,किल्ले कल्याणगड उत्साह आणि मागच्या ट्रेकच्या सुखद आठवणी घेऊन माझ्या मुली, भाऊ, वहिनी आणि मी पोहोचलो जरंडेश्वरच्या पायथ्याशी. खेडी आपल्यापेक्षा खूप लवकर जागी होतात. रस्ता कुठून आहे, कसा आहे ही माहिती सांगणारे सत्तरीचे आजोबा आमच्या पेक्षाही फ्रेश वाटले. जरंडेश्वर नावातील भव्यता पायथ्यापाशीच जाणवते. उंची 3300 मीटर पण चढायला सोप्पा. निम्म्यापर्यंत पायऱ्यांचा रस्ता आणि निम्मा दगडधोंड्यांचा चढणीचा.. जसजसे उंच जातोय तशी तशी मनाची स्थिती बदलते. जगापासून तुटून निसर्गाच्या स्वाधीन होतो आपण. ती झाडाझुडपांची नीरव शांतता आपल्यालाही शांत शांत करते आतून-बाहेरून.. जरंडेश्वरला प्राचीन हनुमान मंदिर आहे. सुबक आणि प्रसन्नपणे आपल्याकडे पाहणारा मारुती शाश्वत आणि नश्वर हा फरक सांगून जातो. निसर्गाची किमया जरंडेश्वरला लाभलेय. भरपूर झाडी आणि विविध पक्षांचा वावर.. गड उतरताना पावलं जड झाली. अजून थांबाव.. पहावं.. नातं अजून घट्ट करावं या निसर्गाशी.. असं वाटत राहील पण सूर्यनारायण माथ्यावर आलेला आणि कल्याणगड खुणावत होता. तासाभरात कल्याणगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

आता कस लागणार होता. गड उंचच उंच..3500 मिटर उंचीवर भगवा फडकत होता.रस्ता वळणावळणाचा पण अतिशय खराब.गाडी कशीबशी एक किमी पर्यंत नेली आणि उतरलो.अपार प्रिय असणारा भगवा उंचावर फडकत होता. मोक्षदा एकादशी (गीता जयंती) होती. माझा उपवास आज खऱ्या अर्थाने कारणी लागणार होता. चार किमीची चढण चढून दर्शन होणार होतं माझ्या दैवताचं. “जय शिवराय” म्हणत केली सुरुवात. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. एक एक वळण पार करतांना श्‍वास आणि ठोके जाणवायला लागलेले.. ऊन तर भाजल्यागत स्पर्श करत होतं देहाला. ट्रे क मध्ये पाणी प्यायचं नाही हा नियम सर्वांनाच. पावले चालत होती अखंड. शरीर थकलं की मनाची हिंमत कामी येते हे अनुभवत होते. रोजच्या धावपळी आणि नित्याचीच काम करून त्रागा करणार मन, शरीर अशा वेळी त्याच्यातील खऱ्या क्षमता दाखवतं आणि त्याच्यातील प्रचंड जिद्द, ताकत बघून क्षणभर आपणही त्याच्यापुढे नतमस्तक होतो.
वळणावळणाचा डोंगर पार करून गेल्यावर मधोमध उंच सुळक्या सारखा भाग दिसतो. तिथे पायर्‍या आहेत वर जायला. तिथली सावली, पिवळीधम्मक रानफुलं जणू श्रमपरिहाराला सज्ज दिसली.सगळा थकवा पार पळाला आणि पायांना पुन्हा वेग आला. गडाच्या मुख्यद्वाराचं दर्शन झालं आणि आपोआप नतमस्तक झाले.
कल्याण गडाच्या मध्यावर 30 मीटर लांब गुहा आहे. पायर्‍या उतरून खाली गुहेत प्रवेश केला की निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघायला मिळाला. थंड स्वच्छ निर्मळ पाण्याने पायांना स्पर्श केला आणि एक शिरशिरी आली अंगभर.. गुडघ्यापर्यंत पाणी गुहेत होते. गुहेच्या शेवटाला श्री दत्तगुरूंची सुबक मूर्ती आहे. कल्याण लुटीचा खजिना महाराजांनी या ठिकाणी लपवला होता.
अद्भुत अनाकलनीय आहे हे सर्व. खालून बघताना फक्त उंच डोंगर दिसणारा हा गड प्रत्यक्षात एक गूढ वाटतो. अनेक प्रश्न मनात उठवुन जातो. हा गड म्हणजे खजिना आहे महाराष्ट्राचा.
हे सारे गडकोट भव्यता आणि दिव्यतेच्या सार्‍या मानदंडांना भेदून कधीच पुढे निघून जातात.. इथे मिळते ती फक्त एक शिवप्रेरणा.. मावळा होऊन जगण्याची, निष्ठेची, अंतःकरणाच्या अफाट सामर्थ्याची..
श्वासाश्वासात आमच्या निनादतात राजे
तुमच्याच सावलीत पुन्हा आम्ही जन्मास यावे.
शितल गोविंद शिंदे.
वडूज, सातारा.
7248954680

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *