ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सण, उत्सव आणि पर्यावरण

August 11, 202121:57 PM 210 0 2

भारत हा एक सुंदर आणि समृद्ध संस्कृतीचा देश आहे.आपण भारतीय आपल्या संस्कृतीचा खुप आदर आणि सन्मान करतो. संस्कृती म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण करताना विचारपूर्वक, रीतभातीला अनुसरून करीत असतो. आपल्या कला , धर्म, खाद्यसंस्कृती, सवयी, जत्रा, संगीत, नृत्य, आणि महत्वाचे म्हणजे सण आणि उत्सव ही संस्कृतची मुलभूत अंगे होत.
प्रत्येक धर्म आपल्या प्रथा, परंपरेस पुजनीय मानत असतो. आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीत सण उत्सवांना अन्योन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक सण अन उत्सव विधियोक्त साजरे केले जातात. उपवास, गंगेतील स्नान, देवपूजा, प्रार्थना, गाण, नृत्य, आणि सूग्रास पंचपक्वान्नाचे नैवेद्य , सोवळ ओवळ हे सारे त्या त्या सणाला साजेस केल जात.
भारतीय संस्कृतीत सणांचे वर्णन प्रत्येक तीथीला केलेले असते. मराठी महिन्यातील कोणताही दिवस निवडा तुम्हाला त्या तिथीला एखादा सण जोडून आलेला दिसेलच. विशिष्ट ऋतू मध्ये विशिष्ट वातावरणात सण साजरे केले जातात. ऋतुमानानुसार आहार ही ठरलेला असतो. तळलेल्या पदार्थांतुन आपल्याला पोषणमूल्य मिळते म्हणून दिवाळीचा फराळ हा जास्तीत जास्त तळलेला असतो. भाद्रपद महिना म्हणजे कधी भरपूर उन तर कधी कधी भरपूर पाऊस आणि याच महिन्यात गणेशोत्सव असतो गणेशाला आवडणारा उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दिला जातो. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दिले जाणारे कडुलिंबाच्या पानांचे तिर्थ गुढीपाडव्याला दिले जाते मुळ उद्देश आरोग्याचे रक्षण.
“शु़भकरोती कल्याणमं आरोग्यंम धनसंपदा”या ओळीतच सांगितले आहे आरोग्य म्हणजेच धनसंपदा आहे. सायंकाळी देवापुढे लावलेल्या त्या मंद दिव्याच्या प्रकाशात शेकडो जीवजंतू दिव्याभोवती फिरताना आपल्याला दिसतात. काही किटक हे आपल्या दृष्टीला दिसतही नाही. पण दिव्याच्या ज्योतीच्या आकर्षणामुळे दिव्याभोवती येत असतात आणि त्या दिव्याच्या ज्योतीत विलीनही होवून नष्ट होतात. परिणामी वातावरण निर्जंतुक रहाण्यासाठी मदत होते. म्हणून तर म्हटले आहे “दिवा जळो देवापाशी पण उजेड पडो सर्वांपाशी “.
आज मायक्रोस्कोपच्या सहाय्याने दिसणारे व्हायरस, बॅक्टेरीया पहायला कोणतीही वैज्ञानिक साधने नसतांनाही त्या काळच्या ऋषीमुनींनी अनुभव, आणि दिव्य शक्ती च्या बळावर आजची वैज्ञानिक सत्ये हजरो वर्षांपूर्वी योगसाधनेनी सिध्द केली.
संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ” या अभंगातून वनस्पतींचे महत्व अजरामर केले आहे. वड, दुर्वा, बेल, तुळस, कडुनिंब, शमी इत्यादी वनस्पती पुजेच्या स्थानी अग्रगण्य मानल्या जात आहेत, पवित्र मानल्या जात आहेत. “जे देवाला तेच देहाला” या नियमानुसार प्रत्येक वनस्पतींत औषधी गुण लपलेले आहेत. आणि सणांच्या वेळी या वनस्पतीना मोठा मान आहे.
सण , उत्सव हे खरे तर आनंदासाठी साजरे केले जातात. पुर्वीची लोक सण येण्याच्या अगोदरच सणाच्या स्वागतासाठी सज्ज असायची. निसर्गाशी समरस होण्यासाठी पुर्वजांनी सणांची कल्पना मांडली आहे. डोळे,कान नाक, जीभ, त्वचा या पंच इंद्रीयांना सुखावणारे घटकांचा समावेश सणावाराला केला जातो. सुगंधी उटण्याने आंघोळ, दिवे, पणत्या, धुप अगरबत्ती, हे घटक इंद्रीयांना सुख देणारे तर आहेतच, याशिवाय प्रत्येक वनस्पतींचा उपयोग औषधी मात्रा पुढील पिढीला ओळख व्हावी , हा मुख्य उद्देश ही या पुजेचा आहे.
स्त्रियांचा वटपौर्णिमेचा सण म्हणजे वडाच्या झाडाखाली जाऊन आसनस्थ होऊन विधीनुसार पुजा करण्याचा सण पण आज आपण पहातोय , वडाच्या फांद्या तोडून घरी आणून पुजा केली जात आहे. अशी पुजा करणे कोणत्याही धार्मिक ग्रंथात सांगितलेली नाही. पण तरीही अशी पुजा होतच आहे. दरवर्षी कित्येक वडाच्या झाडांच्या फांद्या तोडल्या जात आहेत.नदीकिनारी व समुद्र किनारी आपल्याला असलेली नारळांच्या झाडाची दाटी दिसेल ही कृपा नारळी पौर्णिमेच्या सणाची आहे. नदी समुद्राला देवता मानुन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा नारळी पौर्णिमा हा दिवस होय. या सणाच्या निमित्ताने समुद्राला शांत करण्यासाठी सोडलेला नारळ काही वेळा आपसूकच तरंगत किनाऱ्याला लागतो व तो तीथेच रुजला जातो.व त्याचा मोठा वृक्ष होतो. आणि फळांनी बहरतो. आणि नारळ म्हणजे कल्पवृक्ष आहे. निसर्गाने जे आपणास दिले आहे तेच परत करावे , ही उदात्त भावना यामागची आहे.


शरद ऋतूत येणारी अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा यादिवशी दुध आटवून त्यात जायफळ, वेलची, केशर साखर टाकुन आपल्या प्रिय जनांसोबत हास्य, विनोद करून ,गीत नृत्य असे करमणुकीचे कार्यक्रम करून रात्री १२ वाजता हे मसाला दुध चंद्राला दाखवून दुधात चंद्राची प्रतिमा पाहून हे दुध प्राशन केले जाते. शास्त्रीय दृष्ट्या हे दुध “सिच्युएशन” पित्तप्रकोप कमी करणारे असते. म्हणजे सणाच्या निमित्ताने आरोग्यही राखले जाते.
आयुष्य भर पै पै साठवून, वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेऊन, मेहनतीने आपल्या स्वप्नातील घर बांधले जाते आणि मग याच घराच्या गृहप्रवेशासाठी शुभ दिवस पाहून घरातच छोटासा होम केला जातो. या होमाच्या विधीसाठी दगडी पेटी, सोन्याची प्रतिमा, सात धद्यांचे पाणी, सात औषधी वनस्पती , सात प्रकारची माती, नवीन मातीची मडकी, विविध फुले , वेगवेगळ्या समिधा असे जे नाना जिन्नस आणले जातात ते सारे जास्तीत जास्त नैसर्गिक घटक गोळा केले जातात मग इथेही पर्यावरणाची मदत घेऊन च हा विधी पार पाडला जातो.
विवाह सोहळ्यातील काही चालीरीती उदाहरण द्यायचे झाल्यास हळद लावणे, मेंदी लावणे , यातही शास्त्रीय कारणे लपलेली आहेत. जोपर्यंत मुलीला मासीक पाळी येत नाही तोपर्यंत तिचे लग्न केले जात नाही. एकदा का मुलीचे लग्न ठरले की तीच्यात शारीरिक, मानसिक बदल घडून येतात. मन अस्थिर होते, याचाच परिणाम तीच्या अंतःस्रावी ग्रंथीवर होत असतो, हार्मोन्स वर होत असतात. आणि मग हार्मोन्स मधे बदल झाला की याचा परिणाम तीच्या मासिक पाळी वर होतो. हेच शरिरातील हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी तीच्या सर्वं अंगाला हळद लावली जाते. तसेच हळद रक्तशुद्धीचे काम करते. मेंदी लावली जाते. मेंदीमुळे शरिरात शितलता रहाते. मन शांत रहाते. म्हणून तर आपल्या महाराष्ट्रात मेंदीचा कार्यक्रम, आणि हळदीसाठी खास करून एक दिवस राखीव ठेवला जातो. अंगाला हळद लावल्याने रक्तातील दोष, अतिरिक्त स्त्राव घामाद्वारे , लघवीच्या मार्गाने बाहेर काढले जातात. या प्रक्रियेत हळदीचा लेप म्हणजेच लेपनचिकीत्सा होत असते.
आपल्या दैनंदिन जीवनातील ताण तणाव कमी करण्याचे काम हे सण नी उत्सव करीत असतात.पण मानवी स्वभाव म्हणजे “उस गोड लागला तर मुळासकट खाल्ल्याशिवाय सोडत नाही. ” अगदी तसच आहे एखाद्या गोष्टीचा आनंद मिळत असेल तर ती गोष्ट सातत्याने, पुन्हा पुन्हा, अधिक प्रमाणात करण्याची ही मानवी प्रवृत्ती.सणांच्या बाबतीतही असेच म्हणता येईल आजकाल काही विशिष्ट सणांत काही गोष्टींचा विपर्यास होवू लागला आहे. आपण साजरे करीत असलेले सण उत्सव एका वाढत्या समस्यांची मालाच तयार होत आहे. निसर्गातील बदलांचे स्वागत करणारे सण माणसालाच हानिकारक होवू लागले आहेत.
नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला पुजेसाठी आणलेल्या नागास जबरदस्तीने दुध पाजले जात आहे. काही गारुडी लोक नागाच्या तोंडातील विष काढुन अर्धमेल्या अवस्थेत टोपलीत भरून रस्त्यांवर येऊन खेळ करीत असतात. दहीहंडी उत्सव म्हणजे श्रीकृष्णाच्या बाललिला पण हे पावित्र्य आता फक्त पोथीमधेच वाचायला मिळेल. आज दहीहंडी म्हणजे फक्त स्पर्धा , गोंगाट, डिजेवरील ठेका, आवाजाची १०० डेसिबल च्या मर्यादेच्या पुढे आवाज. यामुळे ध्वनीप्रदूषण होत आहे.
गणपती बाप्पा म्हणजे आपले आराध्य दैवत भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकाचा सहभाग मिळावा म्हणून या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. पण आज तो बिचारा बाप्पा तो. कर्णकर्कश आवाज आणि डोळे दिपणाऱ्या लाईट मुळे कंटाळून जात असेल. गणेशोत्सोवातील मांगल्य, भक्तीरस, पावित्र्य कुठेही न दिसता सजावटीतील स्पर्धा, थर्माकोलचा वापर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, मिरवणुकीतील डिजे यामुळे त्या त्या परिसरात प्रदुषण होत आहे .
दिवाळीतील फटाक्यांचा आवाज,विद्युत रोषणाई, फटाक्यातील विषारी दारु फटाक्यातील धुर यामुळे हवा प्रदूषित होत आहे. संक्रातीत उडवल्या जाणाऱ्या पतंगाच्या मांज्यामुळे अनेक पक्षी गळ्यात फास बसून मृत्युमुखी पडत आहे. रस्त्यावरील दुचाकी स्वारांनाही या मांज्याने शिकार केले आहेत.तसेच होळीसाठी केलेली वृक्षतोड यातुनही पर्यावरणाची हानी होत आहे.
राष्ट्रीय सण साजरे करताना त्या दिवसापुरता राष्ट्रध्वजाचा मान राखला जातो अन दुसऱ्या दिवशी हेच झेंडे नको तीथे पडलेले दिसतात समुद्र किनारी, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात यावेळी इथेही राष्ट्रीय निष्ठेची पायमल्ली होत आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे फक्त आनंद घेतला जात आहे पण पुढील परिणाम पाहीले जात नाहीत.


ज्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात अमुलाग्र बदल घडून आला आहे त्याचप्रमाणे आपल्या सण उत्सव साजरा करण्याच्या पध्दतीतही विलक्षण बदल झाला आहे. सण उत्सवातुन पर्यावरणावरील होणारी हानी हा विषय स्पष्टपणे मांडता येत नाही कारण हा विषय भावनिक झाला आहे. यातुन लोकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. पण तो आता दिवसेंदिवस गंभीर बनु पहात आहे. कोणत्याही सण उत्सवाला धर्म, जातीच्या चाकोरीतून न पहाता आपण एक या निसर्गाची अपत्य आहोत,अस मानल पाहीजे. ठिक आहे “कालाय तस्मै नमः” पण हा बदल नेमका कुठे करावा? कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आणि “जुन तेच सोन ठेवायच …
हा विचार करणे क्रमप्राप्त आहे. सण साजरे करताना निसर्ग पुजा करताना आपल्याला मानसिक समाधान मिळते, मन प्रसन्न होते. पण हे करीत असताना निसर्गाची खरी संपत्ती, समृद्धीचा लोप होत ईकडे जाणुनबुजून दुर्लक्ष होत आहे.
अनंत यातना पर्यावरणास देऊन पर्यावरणाच्या बदलास मानव कारणीभूत होत आहे. सणांचा आनंद घेणे आपला अधिकार आहे पण हाच आनंद घेत असताना इतरांच्या आनंदावर विरजण पडू देऊ नये. याची काळजी घेणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे.
आपले भारतीय सण उत्सव पर्यावरणाचे जतन करण्यासाठी साजरे व्हावेत,सोबत संवर्धन हा मुळ उद्देश असावा. आपण रहातो तो परिसर निसर्ग संपन्न असेल तरच आपल्याला आरोग्य धनसंपदा लाभेल. या जगात जोपर्यंत पर्वत, वन, उपवन, नद्या सरोवरे आहेत तोपर्यंत च पुढील पिढीला मोकळा श्वास घेता येईल. व सुखाने जगता येईल.
गणेश ही बुद्धी ची देवता आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याची बुद्धी बाप्पांने या मानवाला द्यावी. पर्यावरणाचे रक्षण केले तरच निसर्ग देवता मानवावर प्रसन्न होईल. मानवाने सणांकडे शास्त्रीय दृष्ट्या पहावे.नाहीतर मानवाच्या जीवनात “सण म्हणजे क्षणाचा आनंद व अनंत काळचा तणाव “असे होण्यास विलंब लागणार नाही…….

सौ. तृप्ती भोईर
उरण रायगड
९१६७५८१६६०

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *