ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लोकलेखक अण्णाभाऊ साठे

July 31, 202114:26 PM 62 0 0

लोकशाहीर’ अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. त्यानिमित्त हा लेख तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णांनी आपले उभे आयुष्य मुंबईच्या चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा-वेगळा गुण. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली, त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवत राहतो. लेखनातील लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखन शैलीवर त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. त्यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे; ही खरोखरी अचंबित करणारी गोष्ट आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्वपूर्ण ठरलेल आहे. अजरामर अशा या साहित्याने उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. उपजत बुद्धिवादी म्हणून त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेता येतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. अनेक नामवंत साहित्यिकांच्या वाट्याला त्यांच्या हयातीत उपेक्षाच आली.

जशी महात्मा जोतीराव फुले यांच्या वाङ्मयाची त्यांच्या काळात उपेक्षा झाली, तशीच उपेक्षा अण्णाभाऊ साठे यांचीही झाली. अण्णाभाऊंचे साहित्य रूपवादी, रंजनपर, परधार्जिणे आणि भडक आहे, ते साहित्यबाह्य प्रेरणेवर आधारलेले आहे अशी टीका झाली. मराठी 'कादंबरीचे शतक' लिहिणाऱ्या कुसुमावती देशपांडे यांनी तर कोण हे अण्णाभाऊ साठे ? असा प्रश्न केला होता. होय, अण्णाभाऊ सामाजिक बांधिलकी मानणारे, समाजपरिवर्तनाचे शस्त्र हाती घेऊन लेखन करणारे साहित्यिक होते. कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा जवळून संबंध होता. पण सर्वसामान्य कष्टकरी, दलित, उपेक्षित आणि धर्मव्यवस्थेने हक्क नाकारलेले स्त्री-पुरुष हे त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. समीक्षकांना त्यांचे साहित्य प्रचारकी, रंजनपर वाटले असेल, पण हजारो वाचकांनी त्यांच्या कथा- कादंबऱ्यांची अक्षरश: पुन:पुन्हा पारायणे केली. त्यांच्या साहित्यात संघर्ष विद्रोह प्रकर्षाने जागोजागी जाणवतो. त्यांची पात्रे शोषित दलित जनतेची दु:खे वाचकांपर्यंत वास्तवपणे पोहोचवतात. त्यांच्या ‘निळू मांग, मकुल मुलाणी, भोमक्या, फुला, नसरू, दादा न्हावी या पात्रांनी सा- या महाराष्ट्राला वेड लावले, झपाटून टाकले. त्यांच्या साहित्यातून प्रगट झालेली त्यांची सर्वसामान्य माणसांविषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदु:खाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ घालत असे. वाचनीयता हे तर त्यांच्या साहित्याचे महत्वाचे वैशिष्ट्य होतेच, पण त्याचबरोबर मराठी मनाचा आणि महाराष्ट्रीय सांस्कृतिक विशेषांचा अत्यंत मनोज्ञ आविष्कार त्यांच्या कथा-कादंबऱ्यादी सर्वच लेखनातून समृद्ध स्वरूपात झालेला असल्याने, त्यांच्या साहित्याला वाचकांची अधिक पसंती असे. अण्णाभाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते.  त्याबाबत ते एका ठिकाणी म्हणतात, ‘जे मी स्वत: जगलो आहे, पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे, तेच मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या साहित्यातील बऱ्याच व्यक्तिरेखा मला प्रत्यक्ष भेटलेल्या आहेत. अण्णाभाऊंच्या साहित्यातील वैविध्य, भाषेवरील पकड पाहिली की कोणीही अचंबित होईल एवढे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. सुरुवातीस ‘लोकयुद्ध’, ‘युगांतर’मध्ये त्यांनी वृत्तांत लेखन, मुलाखती, लेख लिहिले. ‘वाट्टेल ते’ आणि ‘हवे ते’ ही सदरे लिहिली. ‘मराठा’सारख्या दैनिकातही लेखन केले. पहिली कथा कम्युनिस्ट पक्षाच्या ‘मशाल’ साप्ताहिकात लिहिली. अण्णाभाऊंनी आपल्या अनेक कथांमधून सामाजिक-राजकीय, धार्मिक, कौटुंबिक समस्यांना तोंड फोडले. स्वतंत्र बाण्याच्या बंडखोर नायिका व तळच्या जात-वर्गातील लढाऊ नायक त्यांनी निर्माण केले. त्यांच्या ‘बंडवाला’ या कथेत जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध लढणारा मांग समाजातील तरुण आहे. ‘रामोशी’ या कथेत यदू रामोशी हा जमीनदाराच्या अन्यायाविरुद्ध आणि भ्रष्ट सरकारी यंत्रणेविरुद्ध कसा संघर्ष करतो याचे चित्रण आहे. ‘कोंबडीचोर’मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दारिद्रय़, उपासमार शिल्लक राहिल्याने गरिबीमुळे सामान्य माणूस कसा चोरी करण्यास मजबूर होतो याचे चित्रण आहे. ‘बरबाद्या कंजारी’ या कथेत मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या समाजाची दयनीय अवस्था व जात पंचायतीच्या अमानुष प्रथांचे दर्शन घडते. या जात पंचायतीला आव्हान देऊन बरबाद्या व त्याची मुलगी कशी बंडखोरी करते याचे चित्रण आहे. अण्णा भाऊंच्या ‘गजाआड’ या कथासंग्रहातील अनेक कथा त्यांना जे तुरुंगात कैदी भेटले त्यांच्यातील संवेदनशील माणसांवरील मजबुरीचे दर्शन घडवितात. ‘जिवंत काडतूस’ या कथेत ते १९४२ च्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील त्यांच्या मित्राच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतात. अण्णाभाऊंनी त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे मुंबईच्या घाटकोपरमधील चिरागनगर या झोपडपट्टीत घालविली. तेथील गरीब, व्यसनी, व्यभिचारी, चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या, गुंड, मवाली, उपेक्षित, भटक्या माणसांचे जगणे, त्यांचा जीवनसंघर्ष अण्णा भाऊंच्या ‘चिरागनगरची भुतं’ या संग्रहातील कथांत आढळतो. ‘स्मशानातील सोनं’ ही त्यांची कथा देशातील वंचितांची विदारक मांडणी करून त्या दुःखाच्या परिमार्जनातील सामूहिक जबाबदारीची संवेदना मांडते. ‘मरीआईचा गाडा’ या कथेत  अंधश्रद्धेला आव्हान देण्याचे काम या कथेतील नाना नावाचे पात्र करते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील चळवळीमुळे दलित-अस्पृश्य समाजात जे नवे आत्मभान आले त्याचेही चित्रण अण्णा भाऊंच्या ‘वळण’, ‘सापळा’ या कथांमध्ये आढळते. दलितांनी मेलेल्या गुरांची विल्हेवाट लावणे, त्याचे मांस खाणे थांबवावे असा संदेश डॉ. बाबासाहेबांनी दिला होता. त्या संदेशामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती, अनेक गावांत दलितांना बहिष्काराला तोंड द्यावे लागले होते. अनेक दलितांना मृत मांस खाण्याच्या जुन्या सवयी सोडणेही जड जात होते. या द्वंद्वाचे चित्रणही अण्णाभाऊंच्या ‘वळण’, ‘सापळा’सारख्या कथांत आढळते. भारतीय समाजातील जातीय उतरंडीमुळे चांभार-मांग समाजातही कशी श्रेष्ठ- कनिष्ठ भावना वाढीस लागते याचे चित्रण ‘उपकाराची फेड’ या कथेत पाहायला मिळते. अण्णाभाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘फकिरा’ ही कादंबरी ब्रिटिश जुलमी राजवटीच्या विरोधात भारतीय जनतेचा प्रातिनिधीक हुंकार मांडते. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. न्यायाधिष्ठित समाजरचनेचा आग्रह अण्णाभाऊंच्या संपूर्ण साहित्यात ओतप्रोत भरला आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाडय़ांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. बंगालचा दुष्काळ, तेलंगणा संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराच पोवाडा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील मुंबईची लावणी, माझी मैना, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बíलनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले

‘जग बदल घालूनी घाव-सांगुनी गेले मला भीमराव’ हे गाणे अशी अनेक गाणी, कवने, पोवाडय़ांतून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. तमाशाबंदीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अण्णाभाऊंनी 'लोकनाट्य' ही संज्ञा वापरली आणि अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे, शेटजीचे इलेक्शन,माझी मुंबई इत्यादी लोकनाट्ये लिहून तो शब्द रूढ केला. या लोकनाट्यातून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रश्न त्यांनी मांडले. भांडवलदार, शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार, शेटजीभटजी हे त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते. 'धोंड्या' नावाचे एक पात्र निर्माण करून अक्षरशः पुंजापतींच्या वृत्तीप्रवृत्तींवर दगड भिरकावले. प्रबोधन करून परिवर्तन घडविले. वर्गयुद्ध घडविले, सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य मराठी माणसांना दिले. कलानंदाचा आनंद देण्याबरोबरच मराठी मनावर संस्कार केले. अण्णाभाऊंनी आपल्या पुरोगामी-समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपरिक, पौराणिक तमाशाच्या गण-गवळण ढाच्यातही आमूलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनालाही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजासारख्या शूर पुरुषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवाऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लील भाषेत टिंगल-टवाळी चालायची तिलाही त्यांनी काट दिला. अण्णाभाऊंनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जनप्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोकनाटय़ातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य-संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढरपेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णाभाऊंचे साहित्य इंग्रजी, हिंदी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांतही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णाभाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि ‘महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की’ असा गौरव केला. रशियाच्या इंडो-सोव्हिएत कल्चरल सोसायटी च्या निमंत्रणावरुन ते १९६१ साली रशियात गेले. त्यांवर त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन लोकप्रिय झाले. त्यांचे व्यक्तिमत्व विविध कलागुणांनी भरलेले होते. ते उत्तम अभिनय करीत. हातात डफ घेऊन शाहिरी कवने मोठ्या तडफेने गात. बुलबुल, बासरी, हार्मोनियम अशी वाद्येही ते वाजवीत. दांडपट्टा फिरवीत. शिवाय स्वतःच्या लिखाणाव्यतिरिक्त त्यांनी नवयुग, युगांतर आणि आचार्य अत्रेंच्या मराठा वर्तमानपत्रातून अनेक लेख व पुस्तकांची परीक्षणे लिहिली. अण्णाभाऊंचा शेवटचा काळ मात्र हलाखीत गेला. दारिद्र्य आणि एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. मराठी साहित्यातील प्रतिष्ठांकडून त्यांची तशी उपेक्षाच झाली. विपन्नावस्थेत गोरेगावच्या सिध्दार्थनगरात त्यांचे निधन झाले. अण्णाभाऊ साठे हे एक झपाटलेले लेखक होते. अवतीभोवती पसरलेले अफाट दु:ख, दारिद्रय व अज्ञान हेच त्यांच्या चिंतनाचे व लेखनाचे विषय होते. केवळ वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी हे साहित्य निर्माण केले. त्यापैकी बरेच साहित्य प्रसिद्ध झालेले असले तरी अजूनही बरेच साहित्य अप्रकाशित आहे किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संघर्ष हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्राणबिंदू आहे. संघर्ष कशासाठी ? कुणासाठी ? व कुणाविरुद्ध हे प्रश्न ओघाने आलेच. अण्णाभाऊंच्या कथा-कादंब-यांमधला संघर्ष शोषण आणि व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. तो दलित- पीडित-शोषित-वंचितांसाठी आहे. तो त्यांना न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी आहे. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. केवळ महाराष्ट्र नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महत्वपूर्ण काम शाहीर अण्णाभाऊसाठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागांतील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले. खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे ध्येयवादी लोकशाहीर, लोकलेखक होते.

-सुरेश मंत्री, अंबाजोगाई

संपर्क- ९४०३६५०७२२

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *