उरण दि 27(राघवी ममताबादे ) : सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील जनतेला सकस, निर्भेळ आणि भेसळमुक्त मिठाई व इतर अन्न पदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कडक कार्यवाही करावी , असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसापूर्वीच दिले होते.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा त्यांनी बांद्रा येथील कार्यालयात काही दिवसापूर्वी आढावा घेतला होता.या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, सर्व सह आयुक्त प्रत्यक्ष व इतर जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.त्या सर्वांना कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाही उरण तालुक्यात अनेक ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत सर्रास खुलेआम मिठाई व इतर पदार्थाची विक्री सुरु आहे.
जिल्हा स्तरावरील अधिका-यांनी मिठाई व इतर खाद्य पदार्थांच्या उत्पादकांसोबत बैठक घ्यावी. त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत. मिठाई व इतर पदार्थांवर तयार करण्याची आणि संपण्याची दिनांक टाकणे आवश्यक आहे, याबाबत जन जागृती करावी.त्याचबरोबर दुध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ तपासणी वाढवावी आणि त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनामार्फत दिले असतानाही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उरण मधील कोणत्याही दुकानावर कारवाई होताना दिसून येत नाही. अनेक मिठाईच्या दुकानात खाद्य पदार्थांवर पदार्थ तयार करण्याची तारीख नसते किंवा पदार्थ संपण्याची तारीख नसते. परंतु अशा खाद्य पदार्थाच्या दुकानावर किंवा मिठाईच्या दुकानावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसून येत नाही.
औषध प्रशासनातर्फे तपासणीत ज्या औषध विक्री दुकानात फार्मसिस्ट नाहीत अशा दुकानांचे परवाने रद्द करणे, आयुर्वेद, ॲलोपॅथी व इतर औषध निर्मितींचा दर्जा सातत्याने तपासला जाणे आणि विभागातील पदभरती इत्यादि विषयांचा आढावाही घेण्यात आला होता. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत अन्न व औषध प्रशासनने केलेल्या कामाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त श्री. सिंग यांनी दिली. या कालावधीत दूध या अन्न पदार्थाच्या कारवाईत रुपये 4,60791 किमतीचा माल जप्त करण्यात आला. दुग्धजन्य पदार्थाच्या कारवाईत रुपये 39,50,386 किमतीचा माल जप्त करण्यात आला. तर धाडी जप्तीत 526.10 लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. सणासुदीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या मोहिमेत खवा, मावा, मिठाई, खाद्य तेल, तुप, रवा मैदा, बेसन मसाले अशा भेसळ युक्त वस्तुंचा रुपये 31,11,514 किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली होती.यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दुग्ध व दुग्ध जन्य पदार्थ, गोड पदार्थ, विविध खाद्य पदार्थ यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे हे सिद्ध होते.दिवाळी मध्ये तर विविध खाद्य पदार्थात खूप मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते.त्यामुळे अनेकांना विषबाधा किंवा इतर रोग होतात. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही वस्तू किंवा खाद्य पदार्थ घेताना काळजी घेणे आवश्यक आहे.उरण तालुक्यात अनेक ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अनेक नियम पायदळी तुडवले जातात. अनेक खाद्य पदार्थावर खाद्य पदार्थ तयार केल्याची तारीख व खाद्यपदार्थ संपण्याची तारीख टाकलेली नसते. यामुळे अशा पदार्थात भेसळ असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी नागरिकांच्या जीवाशी, त्यांच्या भावनेशी खेळ खेळला जात आहे.
Leave a Reply