आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाला जर कशाचे महत्त्व पटले असेल तर ते म्हणजे “ऑक्सिजन”. मधल्या काळात प्रगतीच्या नावाखाली झाडे कापून सिमेंटचे जंगल निर्माण झालेले बघायला मिळते. याच काळात एक व्यक्ती सलग 40 वर्ष नैसर्गिक ऑक्सिजनची निर्मिती करत होती व त्याची खबर जगाला सोडा आम्हा भारतीयांना ही नव्हती किंबहुना अजूनही तेवढी नाही. अशा या व्यक्तीची आज प्रकर्षाने आठवण येते व त्यांच्या या अफाट कार्याविषयी मन कृतज्ञतेने भरून येते. आसामची सांस्कृतिक राजधानी जोरघाट पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकीलामुख परिसरात जादव मोलाई पायेंग राहतात. 16-17 वर्षाचे असताना ब्रह्मपुत्रेच्या रोद्ररुपाने जो महापूर आला त्या महापुराने ते रहात असलेल्या बेटावर एकही झाड शिल्लक राहिले नाही व सावली न मिळाल्यामुळे शेकडो साप वाळूत तडफडून मेले. पुढे झाडं नसतील तर आपली माणसांची हीच अवस्था होईल या विचाराने ते अस्वस्थ झाले. त्यांची अस्वस्थता बघून गावातील काही लोकांनी त्यांना झाडे लावण्याचा सल्ला दिला व तो त्यांनी मनावर घेतला आणि येथून सुरुवात झाली
ती आज अत्यंत गरज असणाऱ्या नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीची. आपण कल्पनाही करू शकणार नाही असे 1250 एकर जंगल या एका व्यक्तीने निर्माण केले. या जंगलात बांबू, साग, काटेसावर, सुबाभूळ, कदंब, ऐन, अर्जुन, शेवरी अशा 110 प्रकारच्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. आयुष्यातील सतत 40 वर्षे देऊन त्यांनी ही निर्मिती केली व खऱ्या अर्थाने सर्व पशुपक्ष्यांना व वन्य प्राण्यांना त्यांचे हक्काचे घर निर्माण करून दिले. जवळच असलेल्या काझीरंगामधून गेंडे तर अरुणाचल प्रदेश मधून हत्ती तीन ते चार महिन्यांसाठी येथे मुक्कामासाठी येतात. अस्वल, हरणे, गवे हे वन्य प्राणीही येथे पाहायला मिळतात. चिमण्यांपासून ते गिधाडांपर्यंत विविध पक्षी, प्राणी, औषधी वनस्पती या जंगलात पाहायला मिळतात. एप्रिल, मे आणि जून हा आसाममधील पावसाळ्याचा काळ. त्यामुळे या काळात पायेंग जास्तीत जास्त झाडे लावतात. हे सर्व होत असताना त्याची कुठेही वाच्यता वा गवगवा नाही हे विशेष. हौशी फोटोग्राफर व पत्रकार जितू कलिता यांच्यामुळे जादव पायेंग यांच्या “मूलाई कथोनी” या बेटावरच्या जंगलाची ओळख सर्वांना झाली व पूढे “फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया” अशी अंतरराष्ट्रीय ओळखही त्यांना मिळाली. 2015 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. एक व्यक्तीच्या मनाची अस्वस्थता, सापांचा पाहिलेला मृत्यू जर 1250 एकर परिसरात झाडांची निर्मिती करू शकतो तर आज आपण कित्येक मानवी देह ऑक्सिजन विना तडफडून मरतांना बघत आहोत. आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण भारताचे स्थान निर्माण करू शकतो, गरज आहे ती फक्त भावना जागृत करून कृती करण्याची.
डॉ०. पी. एस. महाजन
संभाजीनगर
Leave a Reply