ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रस्ते निर्मितीसह शहराच्या सर्वांगीन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही: टोपे

October 24, 202112:57 PM 45 0 0

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरात रस्ते निर्मितीची गरज असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीसह राज्य शासनाकडून आगामी कालावधीत भरघोस निधी उपलब्ध होण्यासाठी निश्‍चितपणे प्रयत्न केले जाईल अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज शनिवारी येथे बोलतांना दिली. जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या शहरातील कन्हैयानगर ते बाबुराव काळे चौक या सिमेंटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज शनिवारी पालकमंत्री टोपे यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आ. कैलास गोरंट्याल हे होते तर व्यासपिठावर नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल, उपनगराध्यक्षा अन्सारी फरहान रहिम, युवानेते अक्षय गोरंट्याल, उद्योजक शांतीलाल चोरडीया, ओमप्रकाश मंत्री, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतिष पंच, जेपीसी बँकेचे अध्यक्ष दिपक भुरेवाल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी नगरसेविका श्रीमती सावित्रीबाई पगारे, मनकर्नाबाई डांगे, बांधकाम सभापती सय्यद फरीन सय्यद अजहर, नगरसेवक ॲड. राहुल इंगोले, सौ. संगीता पाजगे, शेख शकील, रमेश गौरक्षक, नजीब लोहार, मुस्तकीन हमदुले, बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर नागरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलतांना टोपे म्हणाले की, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध आत पुर्णपणे हटविण्यात आले असून दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहे. कोव्हिडच्या पार्श्‍वभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य शासनाची आर्थीकस्थिती निश्‍चितपणे खालावली होती. परंतू महाराष्ट्र राज्य हे अत्यंत ताकतवर राज्य असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीला कट न लावता राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आगामी कालावधीत जालना शहराच्या सर्वांगीन विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. शहरातील परिस्थितीवर जिल्ह्याची प्रतिमा अवलंबुन असते त्यामुळे शहर विकासाकडे जाणीवपुर्वक लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगुन टोपे म्हणाले की, आ. कैलास गोरंट्याल यांनी शहरातील ज्या प्रमुख पाच रस्त्यांच्या कामाची आवश्‍यकता व्यक्त केली त्या रस्त्यांच्या कामांना देखील निश्‍चितपणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहरातील स्वच्छतेच्या संदर्भात जालना पालिकेचे काम चांगले असल्याबद्दल कौतुक करून गेल्या अनेक वर्षापासून रखडून पडलेला घनकचरा प्रकल्प कार्यान्वीत करण्याची सुचना टोपे यांनी यावेळी केली. सदर प्रकल्प कार्यान्वीत झाल्यास जालना शहरातील कचऱ्याची विल्हेवाट शासकीय पध्दतीने करण्यासाठी मदत होईल. अशी अपेक्षा पालकमंत्री टोपे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राम सावंत व बनसोडे यांनी केले तर शेवटी आभार नजिब लोहार यांनी मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विनोद यादव, अजहर सय्यद, संजय गायकवाड, धामेश निकम, सोनु लुटे, बाबुराव भवर, के. सी. साळवे, विश्‍वनाथ क्षीरसागर, प्रकाश लोखंडे, शेख शमशोद्दीन, शेख मोमिन, अर्जुन क्षीरसागर, बापु साळवे, हरिभाऊ खरात आदींनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर भांदरगे, केदार मुंदडा, सिध्दीविनायक मुळे, शेख हफीज, शेख जमीर, अमिन हमदुले, गुलाब पठाण, अफसर चौधरी, शेख आसेफ, शेख अलीम, गजानन घोडके, सय्यद अफजल, सय्यद सद्दाम यांच्यासह परिसरातील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॉकेल व दाळ चोरांच्या हातात जालना पालिका देणार का? आ. कैलास गोरंट्याल यांचा सवाल
जालना शहरातील जनतेने टाकलेल्या विश्‍वासाला सार्थ करत गेल्या पाच वर्षात जालना नगर पालिकेतर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात विकासाची कामे करून शहराला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे आणि आपण या शहराच्या विकासासाठी शासन स्तरावर भरीव निधी खेचून आणला आहे. यावर जालना शहरातील जनतेचा पुर्णपणे विश्‍वास असल्याचे सांगुन त्याचा प्रत्यय येणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत निश्‍चितपणे दिसून येईल असे आ. कैलास गोरंट्याल यांनी यावेळी बोलतांना सांगीतले. नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याचा धागा पकडून असे प्रवेश केल्याने काही होत नाही. रॉकेल आणि दाळ चोरांच्या हातात जालना पालिकेची सुत्रे सोपवणार का? असा सवाल उपस्थित करून जालना शहरातील जनता ही सुज्ञ असून ते पालिका निवडणुकीत निश्‍चितपणे योग्य निवड करतील असा विश्‍वास व्यक्त करून जालना शहरातील आर. पी. रोड, नेहरू रोड, सदर बाजार, पित्ती पेट्रोलपंप ते अंबड चौफुली अशा पाच ते सहा प्रमुख रस्त्यांची कामे करणे गरजेचे असून या रस्त्यांच्या कामासाठी सदर भागातील नागरीकांची मागणी लक्षात घेवून याकामासाठी निधी उपलब्धतेसाठी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आ. गोरंट्याल यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

राज्यात फडणवीस सरकार असतांना भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून जालना शहराच्या सर्वांगीन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विकास कामांसाठी जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल आणि नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांचे देखील मोलाचे सहकार्य मिळाले असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भास्करराव दानवे यांनी आपल्या भाषणातून केले आहे. ते म्हणाले की, जालना शहरा बाहेरून जाणाऱ्या 20 कि.मी. रस्त्यापैकी 15 कि. मी. रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. उर्वरीत पाच कि. मी.चे काम देखील लवकरच पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पालकमंत्री राजेश टोपे आणि आ. कैलास गोरंट्याल यांनी कोणतेही राजकारण आडवे न आणता जालना शहराच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणल्याबद्दल त्यांचे आपल्या भाषणातून दानवे यांनी कौतुक केले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *