आज स्त्री-पुरुष समानतेविषयी जेव्हा चर्चा होते त्यावेळी एक गोष्ट प्रामुख्याने दिसते ती म्हणजे धार्मिक टीका जणू स्त्री पुरुष समानता ही काही दशकातच उदयाला आली आहे असे चित्र भासविले जाते परंतु भारतीय प्राचीन संस्कृतीचा अभ्यास केला तर लक्षात येते की स्त्री पुरुष समानता ही प्राचीन काळापासूनच भारतात अस्तित्वात आहे.
हिंदु धर्माने स्त्रीला कधी अबला न मानता नेहमी शक्तीच्या रूपात पूज्य मानले आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार जीवनाला समृद्धी आणि संपन्नता देणारी श्री लक्ष्मी, ज्ञान प्रदान करणारी श्री सरस्वती आणि शक्ती प्रदान करणारी श्री महादुर्गा अन् श्री महाकाली या मूलभूत तिपाईवर मानवी जीवनाची सफलता आधारित आहे. जगामधील सर्व धर्मांपैकी केवळ आपल्या हिंदु धर्मात स्त्रीला ‘शक्ती’ (प्रकृती), तर पुरुषाला ‘शिव’ मानून त्यांच्या मीलनातून सृष्टीची निर्मिती झाल्याचा सिद्धांत मांडला आहे. मानवासह सर्व सृष्टीच्या निर्मितीसाठी स्त्री आणि पुरुष यांच्या बीजाचा संयोग होणे अपरिहार्य असल्याचे वैज्ञानिक सत्य हिंदु धर्मानेच मान्य करून दोघांना समान दर्जा दिला आहे. प्राचीन काळापासूनच पुरुषांप्रमाणेच स्त्रियांचे महान कार्य त्यांची श्रेष्ठता व पुरुषांच्या बरोबरीने त्या कार्यात त्यांच्या सहभागाचे अनेक दाखले आम्हाला दिसतात. उदा.
रामायणात कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, मंथरा, सीता, उर्मिला, मंदोदरी, शूर्पणखा, शबरी या स्त्रिया किंवा महाभारतात भीष्ममाता गंगा, मत्स्यगंधा, कुंती, माद्री, द्रौपदी, सुभद्रा, गांधारी, हिडिंबा या स्त्रियांचे महत्त्व विषद होते. रामायण, महाभारतातील स्त्रिया जशा पतिव्रता, तशाच राजकारणातही निपुण होत्या. रणांगणात पती दशरथाच्या रथाचे चाक निखळून पडत असतांना त्याला स्वतःच्या हाताचा आधार देणारी कैकेयी एक रणधुरंधर स्त्रीच होती. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पंचकन्यांचे प्रातःसमयी नित्य स्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे म्हणण्यामागे या स्त्रियांचे चरित्र आणि चारित्र्य कारणीभूत आहे. तसेंच त्यांचे स्मरण म्हणजे त्यांच्या कार्याचा धर्माने केलेला गौरवच आहे.
वेदकाळात स्त्रियांना गायत्री मंत्र आणि वेदपठणाचा, तर अधिकार होताच; पण मौजींचाही (व्रतबंधनाचा) अधिकार होता. कात्यायनी, मैत्रेयी, गार्गी, अपाला यांशिवाय अनेक स्त्रिया वेदविद्येत पारंगत होत्या. ॠग्वेदातील ॠचा रचणार्या ॠषींची एकूण संख्या ३०० होती. त्यात जुहू, शची, घोषा, लोमाशा, लोपामुद्रा या विदुषी स्त्रियांचाही समावेश होता. प्राचीन काळातील संस्कृत कवियत्रींच्या नावांची सूची पुष्कळ मोठी होईल.
आद्य शंकराचार्य आणि बौद्ध महापंडित मंडणमिश्र यांच्या विद्वत्तापूर्ण वादचर्चेत न्यायाधिशाची भूमिका बजावणारी एक स्त्री होती. तिचे नाव होते उभयभारती (श्री सरस्वतीदेवी). ती मंडनमिश्रांची पत्नी होती. प्रत्यक्ष सरस्वतीदेवीच्या पतीशी शास्त्रार्थाचा वाद होतांना तिला आद्य शंकराचार्यांनी न्यायाधिशांची भूमिका स्वीकारण्यास स्वीकृती द्यावी, यावरून त्या स्त्रीच्या निःपक्षपातीपणाची आणि पांडित्याची कल्पना येते. आम्ही भारतियांनी स्त्रीला मातृरूपात करून त्या रूपाला पूजनीय मानले आहे.
मनु म्हणतात की, उपाध्यापेक्षा आचार्य दहा पटींनी श्रेष्ठ, तर आचार्यापेक्षा बाप शंभर पटींनी श्रेष्ठ, तर बापाहून आई सहस्र पटींनी श्रेष्ठ आहे. सप्तशतीत मार्कंडेयांनी जगन्मातेची पूजा करतांना म्हटले आहे की, सर्व स्त्रिया ही तुझीच रूपे आहेत. त्यामुळेच आपल्या देशात आचार्य आपल्या शिष्यांना उपदेश करतांना प्रथम म्हणतात, ‘मातृदेवो भव’, मग ‘पितृदेवो भव’, नंतर ‘आचार्य देवो भव’, ‘अतिथी देवोभव’. हे सर्व पाहिल्यावर असे वाटते की प्राचिन भारतीय संस्कृतीत स्त्री-पुरुष समानता होतिच किंबहुना स्त्रीचे महत्व हे पुरुषांपेक्षा जास्तच होते.
डॉ०. पी.एस. महाजन
संभाजीनगर
Leave a Reply