पूर्वी लहानपणी असा प्रश्न पडायचा की, ‘उत्तम शुक्रवार’ का म्हणायचा? प्रभु येशूने तर आत्यंतिक छळ, वेदना, दुःख सहन करीत क्रूस खांबावरील मरण पत्करले. पण जसजशी समज येत गेली तेंव्हा लक्षात यायला लागले की, खरेच हा दिवस आमच्यासाठी ‘उत्तमच’ आहे. कारण त्याच्या बलिदानाने, त्याने त्याचे आमच्यावर असलेले जीवापाड प्रेम व्यक्त करीत आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग मोकळा केला. त्याला बसलेल्या प्रत्येक फटक्यातून वाहणारे रक्त, आमच्या जीवनात आरोग्यदायी रस निर्माण करीत होते. त्याच्या मस्तकावरील काट्यांचा मुगुट, आमच्या मस्तकी सार्वकालिक जीवनाचा मुगुट ठेवीत होता.
भाला भोसकलेल्या त्या कुशीत आमच्यासाठी मायेची ऊब होती. आम्हांला प्रेमळ बाहुंचा आधार देण्यासाठी त्याने हातात खिळे ठोकून घेतले. आम्हांला पवित्र मार्गात चालता यावे म्हणून त्याने आपले पाय खिळयांनी घायाळ होऊ दिले. त्याच्या निर्व्याज प्रेमाची आम्हांला ओळख आणि जाणीव होते. त्याचे क्रुसखांबावर पसरलेले बाहू जणू आम्हांला कुशीत घेण्यासाठी अधीर झालेले आहेत. खरेच “उत्तमच आहे
हा शुक्रवार” कारण आमच्यासाठी स्वप्राण देणारा आमचा प्रभू आम्हांला भेटला. जगभरातील ख्रिस्ती समाजात येशूख्रिस्ताच्या दु:खसहनाचे चाळीस दिवस, 'उपवासकाळाचे दिवस' म्हणून पवित्र मानले जातात.
देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय-निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे; कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो
तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.” येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा काही अनपेक्षित नव्हता. 'जुना करार' बायबल धर्मग्रंथात त्याच्या मृत्यूविषयीचे भाकित केलेले होते. 'परमेश्वराचा यातनाधीन सेवक,' 'वधासाठी नेलेला कोकर' असे त्याचे वर्णन संदेष्ट्यांनी केलेले आहे बायबल मधील 'नवा करार' या धर्मग्रंथात म्हटले आहे की, 'हा दुर्जनांना सलणारा काटा होईल, आणि सज्जनांसाठी पायरी होईल.' (बायबल मधील संत लूक : ३) येशूचा जन्म झाला, त्यावेळचे हे वर्तवलेले भविष्य आहे. ताबोर, जेथसेमनी बाग यांचे संदर्भ आणि 'शेवटचे भोजन' यातील प्रतिकात्मक संदर्भ यावरून, आपला मृत्यू भीषण असणार आहे, याची जाणीव येशूला झालेली होती. येशूच्या मृत्यूत राजकारण काही नव्हते. मात्र राजेलोकांचा हस्तक्षेप हे विधिलिखित होते. येशूचे रोमन साम्राज्याच्या विरोधातील आणि स्वर्ग राज्याविषयीचे बोलणे हे केवळ निमित्त होते. बाकी सारी परमेश्वराची योजना होती. वघस्तंभावरील यातना सहन करत असताना येशूच्या मुखातून सात उद्गार निघाले होते. त्यांना ‘सात शब्द’ असेही म्हणण्यात येते. ते खाली ज्या क्रमाने दिले आहेत त्या क्रमाने तो ते बोलला असावा असा तर्क केला जातोः
१) “बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे ते जाणत नाहीत.” (लूक २३:३४)
२) “मी तुला सत्य सांगतो, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” (लूक २३:४३)
३) “बाई, बघ तुझा पुत्र!”, “बघ, तुझी आई!” (योहान १९:२६-२७)
४) “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” (मत्तय २७:४६, मार्क
१५:३४)
५) “मला तहान लागली आहे.” (योहान १९:२८)
६) “पूर्ण झाले.” (योहान १९:३०)
७) “बापा, मी तुझ्या हाती माझा आत्मा सोपवतो.” (लूक २३:४६)
येशूच्या शेवटच्या दोन उद्गारांत तो आपल्या बापाबरोबर बोलला होता आणि ते त्याच्या पृथ्वीवरील कार्याच्या समाप्तीविषयी आणि पूर्णतेविषयी होते. येशूचा तिसरा उद्गार त्याच्या आईविषयी होता. त्याचा चौथा उद्गार तो सोशीत असलेल्या यातनेमधून निघालेला होता आणि पाचवाही तसाच होता. पण त्याचे पहिले दोन उद्गार क्षमेविषयी आणि तारणाविषयी आहेत. जे लोक त्याचा छळ करत होते त्यांच्यासाठी त्याने क्षमेची याचना केली. आणि जो गुन्हेगार पश्चात्ताप करत होता त्याला त्याने सुखलोकात भेटण्याचे वचन दिले. पण हे दोन्ही उद्गार फक्त त्यांच्यासाठीच नव्हते. ते आपल्यासाठीही आहेत. प्रभू येशू वधस्तंभावरून काय बोलला ह्याची चर्चा फक्त गुड फ्रायडेच्या उपासनेसाठीच राखून ठेवायची असे नाही. त्याची आठवण आपण नेहमी केली पाहिजे. आमेन.
प्रा. दिपक देवदत्त निर्मल
जालना
[email protected]
Leave a Reply