जालना : रोटरी क्लबचे कार्य हे उल्लेखनीय असून आता याला पुढे न्यायचे आहे. आरोग्य क्षेत्रात जे उपक्रम रोटरी आयोजित करेल, त्या प्रत्येक उपक्रमास राज्यभर मदत केली जाईल. आज रोटरीच्या वतीने जो सन्मान केला, सत्कार केला, यातून सामाजिक उत्तरदायित्व, कर्तव्यभावना वाढीस लागून जनतेसाठी काम करण्याची नवी ऊर्जा मिळेल. या माध्यमातून जालन्यासह महाराष्ट्रासाठी चांगले काम करून दाखवेन, असा विश्वासही आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश राजेश टोपे यांनी येथे बोलतांना दिला.
रोटरी क्लब ऑफ जालना सेंट्रलतर्फे शहरातील बेजोशीतल सभागृहात रविवारी आयोजित कोरोना संवेदनशीर सन्मान सोह्ळ्यात सत्कारमूर्ती म्हणून मंत्री टोपे बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, रोटरी झोनल कोऑर्डिनेटर (कोविड कमिटी) डॉ. राजीव प्रधान, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरीश मोटवाणी, अध्यक्ष सुरेंद्र मुनोत, परेश रायठ्ठा आदींची उपस्थिती होती. जालन्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाची जागा निश्चित झाली आहे. लवकरच आयुष रुग्णालय आणि अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. सध्याचे ४०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उपलब्ध झाल्यास वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकते. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे सोपे असले तरी यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, दर्जेदार ग्रंथालय, प्रयोगशाळा यासह अद्ययावत उपकरणे लागतात. त्यामुळे योग्य तो विचार करूनच वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जाईल, असे सांगून श्री.टोपे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात एमआयआर मशीन दिली असून आता कॅथलॅब व रेडिएशन सुविधा आणायची आहे. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अद्ययावत उपचार करणे शक्य होईल. तसेच जिल्हा रुग्णालयास कॉर्पोरेट लूक देत असून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाकाळात स्थानिक स्टील, बियाणे उद्योजकासंह विविध क्षेत्रांतील दानशूरांनी मोठी मदत केल्यामुळे जिल्ह्यात अद्ययावत असे कोविड हॉस्पिटल सुरू झाले. संपूर्ण मराठवाड्यात नाही एवढे व्हेंटिलेटर जालन्यात आले. सध्या जिल्हा रुग्णालयात ८० बेडचे आयसीयू आहे. आपण समाजाचं काही देणं लागतो, या भावनेतून लोकांनी मदत केल्यामुळे हे शक्य झाले. आता कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून यात सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री टोपे यांनी केले.
या वेळी कोरोनाकाळात शहर स्वच्छ व सुंदर ठेवून नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सदैव कार्यरत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, लोकांच्या सुरक्षेची काळजी घेणारे एसपी विनायक देशमुख यांच्यासह उत्कृष्ट रुग्णसेवा देणार्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक घनश्याम गोयल, डॉ. राजेंद्र बारवाले, सुरेश अग्रवाल, समीर अग्रवाल, रामकिसन मुंदडा यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. स्वप्निल बडजाते व डॉ. सोनाली जेथलिया यांनी केले, तर आभार परेश रायठ्ठा यांनी मानले.
–फोटो कॅप्शन–
रोटरी क्लब ऑफ जालना सेंट्रलतर्फे पालकमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार करताना नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, रोटरी झोनल कोऑर्डिनेटर (कोविड कमिटी) डॉ. राजीव प्रधान, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरीश मोटवाणी आदी.
Leave a Reply