सातारा,(विदया निकाळजे) : कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना स्वतःच्या मोबाईल वरून कोविड ची माहिती भरावी लागत आहे.त्यामुळे “गुरुजी” त्रस्त झाले असून “गुरुजींच्या मोबाईल डेटा वर आरोग्य विभागाचा डल्ला ” अशी स्थिती निदर्शनास आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटात कोणत्याही कामाला नकार न देता प्रसंगी रस्त्यावर ,चेक पोस्ट वर रात्री अपरात्री ऊन वारा पाऊस यांची तमा कसलीही तक्रार न करता कोरोनाची ड्युटी केली आहे. तथापि आरोग्य विभागाची ऑनलाइन माहिती भरण्यासाठी “तंत्रस्नेही शिक्षक ” या गोंडस नावाखाली सदर माहिती गुरुजींच्याच मोबाईल वरून भरायचा अलिखित आदेश आरोग्य विभागातील काही कर्मचारी देत आहेत. एकीकडे ऑनलाईन शिक्षण, विविध प्रशिक्षण, स्वाध्याय उपक्रम,गृहभेटी ,असे शिक्षण विभागाचे विविध उपक्रम राबविण्यात गुरुजी व्यस्त आहेत .स्वाध्याय या व्हाट्सएपच्या आधारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी घरोघरी जाऊन प्रसंगी स्वतःच्या मोबाईल वरून उपक्रम पूर्ण करावा लागत असताना
कोरोनाच्या आडून आरोग्य विभाग एक प्रकारे गुरुजींच्या मोबाईल डेटा वर डल्ला मारत आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांची शिक्षणाची विस्कटलेली घडी पुन्हा लाईनवर आणण्याची जबाबदारी गुरुजींवर असताना आरोग्य विभागाच्या ऑनलाइन माहिती भरताना गुरुजी त्रासून गेले आहेत. काही ठिकाणी कोविड सेंटर वर गुरुजींची नियुक्ती रात्रपाळी वर केली आहे सकाळी7 ते दुपारी 3 व दुपारी 3 ते रात्री 11 व पुन्हा रात्री 11 ते सकाळी 7 असे त्या ठिकाणी थांबावे लागत आहे. तिथे थांबण्यासाठी कसलीही सोय नसल्याने गुरुजींना अत्यन्त कठीण परिस्थितीत थांबावे लागत आहे.
“दररोज 100 ते 200 रुग्णाची पॉसिटीव्ह,निगेटिव्ह ,हाय रिस्क- लो रिस्क ,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अशी माहिती ठराविक वेळेतच भरावी लागत आहे अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार केली जाईल असा अलिखित इशारा मिळत असल्याने गुरुजी अंडर प्रेशर काम करीत असल्याची माहिती ‘ नाव न छापण्याच्या अटीवर एका त्रस्त गुरुजींनी सांगितली. जिल्ह्यातील काही तालुक्यातून सदर अन्यायाविरुद्ध संबंधित विभागाशी चर्चा झाली आहे तथापि राष्ट्रीय आपत्तीचे कारण पुढे करून पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे.
Leave a Reply