मुंबई : घरच्यांसाठी आणलेले दही खाल्ल्याच्या रागातून पत्नीला चाकूने भोसकून तिच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्याला सत्र न्यायालयाने आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ‘पीडित महिला ही आरोपीची पत्नी असली तरी तिला या हल्ल्यामुळे झालेल्या त्रासाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही,’ असे मत सत्र न्यायालयाने निकाल सुनावताना व्यक्त केले.
सचिन मलोरे असे आरोपीचे नाव असून तो अॅन्टॉप हिल येथील रहिवाशी आहे. २०१७ मध्ये अटक झाल्यापासून तो कारागृहात आहे. पाय घसरून पडल्याने पत्नीला दुखापत झाल्याचा दावा त्याने बचावासाठी केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला.
तक्रारदार महिलेची साक्ष, वैद्यकीय पुरावा आणि घटनेचे प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या साक्षीवरून आरोपीनेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध होते. आरोपीला गोवले गेल्याचे कोणतेही कारण पुढे आलेले नाही. उलटतपासणी दरम्यानही तक्रारदार महिला व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल असा पुरावा पुढे आलेला नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
सचिन हा बेरोजगार असून मद्यपान करून आल्यानंतर आपल्याला शिविगाळ करायचा. आरोपीच्या बेरोजगारीमुळे कुटुंब चालवण्यासाठी आपणही काम करत असल्याचे पीडित महिलेने न्यायालयाला सांगितले. घटनेच्या दिवशीही आरोपी मद्यपान करून घरी आला. त्या वेळी आपण आईकडून आणलेले दही खात होतो. ते पाहून आरोपी चिडला. त्याने त्याला आक्षेप घेतला. तसेच मांजरीसारखी लपून दही खात असल्याचे हिणवू लागला. आपण आईकडून आणलेले दही खात असल्याचे सांगूनही त्याने वाद घातला. त्यावरून भांडण सुरू झाल्यानंतर आरोपीने मारहाण सुरू केली. तसेच आपल्यावर चाकू हल्ला केला. त्यानंतर आपल्याला जखमी अवस्थेत सोडून त्याने पळ काढला, असे महिलेने साक्षीत म्हटले होते.
Leave a Reply