ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरोग्य, म्हाडाची झाली पाळी, आता आम्हालाही शिजवू द्या थोडी खिचडी

January 2, 202215:41 PM 50 0 0

स्पर्धा परीक्षा घेणा-या एमपीएससीचा सावळा गोंधळ पाहता एक ना धड भाराभार चिंध्या असं म्हणायला हरकत नाही. आरोग्य विभागाने परीक्षेचे अनेक गोंधळ घातले, त्यानंतर म्हाडानेही आम्ही काही कमी नाही हे दिमाखात दाखवून दिले. आता एमपीएससी म्हणत आहे की, ‘त्यांची झाली आहे पाळी, आता आम्हालाही शिजवू द्या थोडी खिचडी.’ एमपीएससीने आज होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. आज रोजी होणारी परीक्षा रद्द करून पुढे कधी होणार? याचाही खुलासा केलेला नाही. विद्यार्थ्यांना केवळ आशेवर लटकवत ठेवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने परीक्षा घेतल्या नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं वय उलटून गेलं. त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ठेवण्यात आलेली होती. आता हीच परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या बाकी विभागाचं एक वेळ समजून घेता येईल. त्यांना आपल्या दैनंदिन कामकाज व्यतिरीक्त यासारख्या इतर कामाचं नियोजन करायचं म्हटलं की, थोडी धांदल उडणारच. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नियोजन करायचं असल्याने त्या विभागांनी परीक्षा पुढे ढकलली किंवा त्या विभागाचे मंत्री याबद्दल जी कारणे देतील, तीही एक वेळ पचवल्या जाईल. पण खास स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जी यंत्रणा निर्माण करण्यात आली, तीच यंत्रणा असा ढिसाळपणा करत असल्यास मग विद्यार्थ्यांनी कुणाकडे पहायचं? हा प्रश्न पडणे तर साहजिकच आहे. परीक्षा आणि फक्त परीक्षा घेणे हेच या यंत्रणेचं मुख्य काम आहे. तेही त्यांना जमत नसतील तर या यंत्रणा करतात काय? हाच प्रश्न पडतो. ज्या कार्यासाठी आपली निर्मिती झाली तेच आपल्याला करता येत नसतील, तर याला काय म्हणायचं? एमपीएससी म्हणजे एक पोकळ भोपळा झालेला आहे. फक्त बाहेरून आणि नावाने मोठा दिसतो आहे, आतून काहीच नाही.
या एमपीएससी बद्दल कधी कधी असं वाटतं की, आयोगाच्या सदस्यांना, अधिका-यांना आणि मंत्र्यांना कमीत कमी एक वर्ष तरी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी करायला हवे. मग यांना कळेल की, उपाशी-तापाशी, पोटाला मारून रात्रंदिवस अभ्यास करून जेव्हा परीक्षेत असे गोंधळ घातल्या जाते, ऐनवेळी परीक्षा रद्द केल्या जाते. तेव्हा किती मनस्ताप होतो. हा मनस्ताप झेलल्याशिवाय परिस्थितीची जाणीव होणार नाही. अलिशान बंगल्यात राहून, ऑफिसमधील एसीत बसून काही मिनिटात फक्त आपले ओठ हलवून हे लोकं निर्णय घेतात. आपल्याच पदाच्या मदमस्त धुंदीत रममाण असणा-या या लोकांसमोर विद्यार्थी कसे येणार? मग या लोकांकडून विद्यार्थ्यांचं भलं कसं होणार? जेव्हा या गोष्टी होत नसतील, तेव्हा यांना गरीबी, मेहनत आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाललेला जीवाचा आटापिटा हे सारं कळणारच नाही.

यांच्या त्याच त्या कार्यामुळे नवल आणि लाज वाटते की, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात असं गोंधळाचं सत्र सुरू आहे. विचार केला तर आपल्या राज्यात कशाचीच कमी नाही. प्रगत तंत्रज्ञान, मुबलक संसाधने आणि बुद्धिमान लोकं आहेत. मग नेमकं अडतंय कुठे? हेच कळत नाही. एमपीएससीची ही समस्या काही आजची नाही. एमपीएससी दरवर्षी काही ना काही गोंधळ घालत असते आणि विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून आंदोलने करण्यास भाग पाडत असते. राजकीय पक्षांनी जेवढी आंदोलने केली नसतील, तेवढी आंदोलने विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या कारभाराबाबत केलेली आहेत. तरी अजून या लोकांना समज आलेली नाही. महाराष्ट्र शासनाने याचा गांभीर्याने विचार करून एमपीएससी हे यूपीएससी सारखं कसं होईल हे पहायला हवं.
आज रोजी होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या संदर्भातील खापर आयोगाने महाराष्ट्रात ज्या विद्यार्थ्यांनी कमाल वयोमर्यादाची अट ओलांडली त्यांच्यावर फोडले आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची संघी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय जारी केला आहे. परंतु ही गोष्ट आधीच यांच्या लक्षात का आली नाही? वयोमर्यादा ओलांडणा-या विद्यार्थ्यांचा विचार करायचा होता तर ही तारीख जाहीरच करायला पाहिजे नव्हती. यांच्या अशा कार्यप्रणालीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया तर येणारच आहे. मग या प्रतिक्रियांना फेस करण्याची तयारी का ठेवत नाही? आता यांना या प्रतिक्रियांची कसली लाज वाटते. विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळतांना यांना कसलीच लाज वाटत नाही. मग आता का? या प्रतिक्रियांच्या विरोधात आयोगाकडून कार्यवाहीचा बडगा उगारण्यात येत आहे व विद्यार्थ्यांना काही कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपी परीक्षेला बसण्यास मज्जाव करण्यात येत आहे. असा इशारा देण्यात आला आहे. मग यावर संताप व्यक्त तर केलाच जाईल ना!
महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख विद्यार्थी एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यामधील दरवर्षी केवळ 4 ते 5 हजारच पदे भरली जातात. विचार करा! परीक्षा देणारे एकूण विद्यार्थी मायनस भरली जाणारी पदे इज इक्वल टू मलिंदा असंच म्हणावं लागेल. असं असलं तरी वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम एमपीएससी कधीच करत नाही. मागील दोन वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ राहिल्यानंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत. एमपीएससीच्या या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे निवड प्रक्रियेस पात्र ठरलेल्या स्वप्नील लोणकर नावाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. वेळेवर परीक्षा न घेणे, एकच एमपीएससी सदस्य नियुक्त असल्यामुळे वेळेवर मुलाखती न होणे, यूपीएससीच्या धर्तीवर अनुकरण आणि आधुनिकीकरण न करणे, सरकारी अधिका-यांच्या निवडीसाठी नवीन पध्दतीचा अवलंब न करणे या गोष्टी कारणीभूत आहेत. एमपीएससी संविधात्मक संस्था असून देखील राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराची शिकार होते.
यूपीएससीला जे जमतं ते एमपीएससीला का जमत नाही? वेगवेगळ्या डिफेन्सच्या परीक्षा होतात. त्या यंत्रणेला जमतं, मग ते एमपीएससीलाच का जमत नाही? सरकार आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या जीवाशी कुठपर्यंत खेळणार आहे? विधानसभेत सांगूनसुद्धा जर वचनाची पूर्तता होत नसेल तर त्या नेत्यावर हक्कभंग का आणू नये? हे सगळे प्रश्न आता रात्रीचा दिवस करून एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी विचारत आहे. जेव्हा नेत्यांवर हक्कभंग आणता येत नाही तर उमटणा-या प्रतिक्रियांच्या बाबतीत विद्यार्थ्यांवर बरं आणता येते. चूक आपली मात्र दोष विद्यार्थ्यांना..!

 

शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणध्वनी-7057185479

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *