ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

होळी व धूळवड – रंगांचा चैतन्यमय उत्साहाचा सण व उत्सव

March 17, 202212:50 PM 57 0 0

वृक्षवेलींना कोवळे कोवळे अंकुर यव फुटून हिरवीगार पालवी येऊ लागते. नानाविध रंगांची नानाविध फुले फुलायला लागतात. मोगरा सुवास घेऊन बहरतो. बागेतील झाडे फळांनी लगडली जातात. रानातले पक्षी अमृततुल्य फळं खाऊन तृप्त होतात. अवघी सृष्टी हिरवाकंच शालू नेसली आहे असं भासू लागते. ही अशीच तर किमयागार वसंत ऋतूची चाहूल लागते. मग त्यातूनच होळीचा सण जवळ आल्याची जाणीव होते. होळीचा सण म्हणजे दुषप्रवृत्तींचा विनाश, व सत्याचा असत्यावर विजय. मनातल्या साऱ्या दुष्ट विचारांना जाळून मन निर्मळ पवित्र करणे. नानाविध रंग उधळून त्या रंगात देहभान हरपून रंगून जाणे.
होळी, हुताशनी, होलीका अशा वेगवेगळ्या नावांनी हा सण ओळखला जातो. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा म्हणून हा सण साजरा केला जातो. नभांगणी पुर्ण चंद्र असतो. होळी पौर्णिमा साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. ती थोडक्यात अशी, द्वापार युगात हिरण्यकश्यपू हा दानव तपश्चर्येच्या बळावर तो स्वतःला विष्णू लोकीचा राजा समजू लागला. तो खूप अहंकारी व बलवान होता. अहंकारापाई तो देवदेवतांची घृणा व तिरस्कार करत होता. त्याला भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील आवडत नसे. तो स्वतःला देव समजून स्वतःचे नाव घेण्यास प्रजेला प्रवृत्त करत होता. अशा प्रकारे तो प्रजेवर अन्याय करत होता. तो उन्मत्त होऊन माजला होता. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू म्हणजेच प्रल्हादाची माता देवभक्त व श्रद्धालू होती. घडलं असं की त्याचा पुत्र प्रल्हाद हा विष्णु नारायणाचा परमभक्त होता. तो “नारायण नारायण” असा जप करून भक्ती करू लागला. हे काही हिरण्यकश्यपूला आवडले नाही. त्याने प्रल्हादाला अनेक प्रकारे समजावले व ठार मारण्याचे प्रयत्न केले. तपश्चर्येच्या जोरावर प्रल्हादाला प्रत्येक वेळी जिवदान मिळाले. तरीही प्रल्हादाने न डगमगता न घाबरता विष्णूंची पुजा चालूच ठेवली.
हिरण्यकश्यपू ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून गेला. व त्याने आपल्या बहिणीला होलिकादेवीला बोलावून घेतले व तुला मिळालेल्या वरदानाचा वापर कर असे सांगितले. होलिकादेवीला मिळालेले वरदान म्हणजे अग्नीपासून भय नाही. परंतु त्या वरदानाचा दुरुपयोग केल्यास अग्नीत जळून भस्म होणार. परंतु होलिकादेवीने मागचा पुढचा विचार न करता छोट्या प्रल्हादाला मांडीवर घेऊन ती चितेवर बसली. जस-जशी चिता पेटू लागली तशी होलिकादेवी जळू लागली व ती जोरजोरात ओरडू लागली. परंतु कुप्रवृत्तीमुळे ती चितेत जळून भस्म झाली. परंतु प्रल्हाद मात्र नारायण नारायण जप करत राहिला व त्याच्या नामस्मरणाने त्याला अग्नी पासून कोणतीही इजा झाली नाही. सर्व प्रजेने प्रल्हादाचा जयजयकार केला व तेव्हापासून होलिका उत्सव साजरा करू लागले. म्हणजेच कुप्रवृत्तीचा व दुष्टशक्तीचा विनाश व सत्याचा विजय होतो.
संपूर्ण भारत देशात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा केला जातो. तसेच रंग उधळून धुळवड साजरी करतात. छोटा-मोठा असा भेद न करता सर्वजण रंगात रंगून जातात काही ठिकाणी भांग पितात. त्यादिवशी मजेतच प्रत्येक जण एकमेकांची खिल्ली उडवतात. परंतु कोणीही रागावत नाहीत की भांडत नाहीत. या दिवशी चेष्टा-मस्करीला ऊत येतो. सर्वजण आनंदात उत्साहात होळीचा सण साजरा करतात.
कोकणातला होळीचा सण म्हणजे ग्रामीण भाषेत त्याला शिमगा म्हणतात. मुंबईत व इतर ठिकाणी राहणारे कोकणातले चाकरमानी होळीच्या सणासाठी आपापल्या गावी आवर्जून उपस्थित राहतात. कोकणात ग्रामीण भागात जवळ जवळ पंधरा दिवस होळीचा सण साजरा करण्यात येतो. आजही तिथले रितीरिवाज अजूनही जपले जातात. परंपरेनुसार सर्व विधी पूजा अर्चा केली जाते. देवबाप्पाला गा-हाणे घातले जाते. कोकणात होळी सणानिमित्त पालखी नाचविणे हा अप्रतिम सोहळा अनन्यसाधारणपणे साजरा करण्यात येतो. पालखी नाचवत नाचवत प्रत्येक घरासमोर नेली जाते. सर्वजण भक्तिभावनेने पालखीची पूजा करून मनोभावे दर्शन घेतात. या दिवसात लहान मुलांसह मोठी माणसे देखील देव-देवतांची वेगवेगळी सोंगं घेऊन आपली कला सादर करून मनोरंजन करतात. अशा प्रकारचा कोकणात होळीचा सण उत्सव म्हणून साजरा करतात.
रायगड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पुर्वी फाल्गुन ह्या महिन्याला आल्गुन, फाल्गुन, होळी न शिमगा असं मजेशीर नावाने हे चार महिने मोजले जात होते. असं समजण्यामागील हेतू काहीसा वेगळा असू शकतो असो. तर मुख्य उद्देश हा आहे की ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी मुख्य होळी पौर्णिमेच्या साधारणपणे आठ दिवस आधी छोटी होळी आणली जाते. त्याला ग्रामीण भाषेत मुलारी (मुरारी) असे म्हटले जाते. त्याची रोज पुजा केली जाते. व नवव्या दिवशी म्हणजेच होळी पौर्णिमेच्या दिवशी उंच वृक्ष आणले जाते तिच होलिका देवी. तिला फुलांच्या माळा व पताका लावून सुशोभित केली जाते. पूजाअर्चा करून खणा नारळाची ओटी भरून साग्रसंगीत पुजा केली जाते. पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो. त्यात होळी म्हटलं की पुरणाची पोळी आलीच. “होळी रे होळी पुरणाची पोळी” असं जोरात म्हटले जाते. या दिवशी सर्वजण जुने पुराणे राग रुसवे विसरून होळीसाठी एकत्र जमा होतात. व एकमेकांची टेर खेचत, वेडेवाकडे बोलून बोंबा मारत, खेळ खेळत आनंद साजरा करतात. विशेष म्हणजे छोटी मुलं रात्रीच्या वेळी वेगवेगळी सोंग घेऊन प्रत्येकाच्या दारात जाऊन नाचतात व त्यांना त्याचे बक्षिस म्हणून पैसे व खाऊ दिले जायचे. सर्वजण स्वतःमधील असलेला द्वेष, मत्सर, राग, अहंकार विसरून होळीचा सण साजरा करण्यात रममाण होतात. त्यानंतर रात्री होळीला अग्निदेवतेची आहुती देऊन दहन केले जाते. होळीच्या निमित्ताने दुष्ट प्रवृत्तींचा, दुष्ट शक्तींचा विनाश होतो व सत्याचा विजय होतो असत्य जळून नष्ट होते. अशा पूर्वापार चालत आलेल्या ह्या रीती आजही त्या तेवढ्याच उत्साहाने मानल्या जातात. व पाळल्या जातात. त्यानंतर धुळवड म्हणजे रंगपंचमीचा खेळ खेळला जातो. पूर्वी गुलाल उधळून होळी खेळली जायची. त्यानंतर आता रंगीबेरंगी रंगांची उधळण करून, रंगीत पाण्याने भरलेले फुगे एकमेकांच्या अंगावर फेकून रंगपंचमी खेळली जाते. अवघी सृष्टी नानाविध रंगांच्या रंगीत फुलांनी नटली जाते, अगदी तसेच आबालवृद्ध होळीच्या रंगात रंगून जातात.
धुळवड साजरी करताना तेवढीच काळजी घ्यावी लागते. बाजारात आता भेसळयुक्त रंग येऊ लागले आहेत. त्यामुळे त्वचेचे विकार, डोळ्यांना इजा होणे, डोळे चुरचुरणे, लाल होणे हे प्रकार वाढू लागले आहेत त्यामुळे प्रत्येकाने काळजीपूर्वक रंग खेळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाण्याची नासाडी होऊ लागली आहे. रंग खेळताना पाण्याचा अपव्यय टाळा. कृत्रिम रंगापेक्षा नैसर्गिक रंगांचा वापर करा. म्हणजेच फुलांचे रंग वापरा. रंग खेळताना स्वतःची काळजी घ्या.

सौ. छाया म्हात्रे (पनवेल)

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *