भोपाळ : प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीची हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. हत्या करण्याच्या पद्धती आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, याची माहिती तिने गूगल सर्च करुन मिळवल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील खेडीपूर गावात 18 जूनला ही घटना घडली. आरोपी महिला तबस्सुमने पोलिसांना पतीच्या मृत्यूची माहिती दिली, मात्र तो कधी आणि कसा झाला, हे माहित नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली.
महाराष्ट्रात काम करणारा पती मूळगावी
तबस्सुमचा पती आमीर हा महाराष्ट्रात काम करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आर्थिक विवंचनेमुळे तबस्सुम खर्चासाठी इरफान नावाच्या तरुणावर अवलंबून होती. या काळात तबस्सुम आणि इरफान यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आमीरला पुन्हा मूळगावी परतणे भाग पडले.
पती घरी असल्याने पत्नीची कोंडी
आमीर सतत घरात असल्यामुळे तबस्सुम आणि इरफान यांना भेटण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी आपल्या वाटेतील काटा काढण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार आमीरला अस्थम्याचा त्रास होता. तो त्यावर नियमित औषध घेत होता. तबस्सुमने आमीरच्या औषधांच्या जागी चुकीची औषधं ठेवली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला.
प्रियकराच्या साथीने काटा काढला
त्याच रात्री इरफान घरी आला आणि त्याने तबस्सुमच्या साथीने आमीरचे हात-पाय बांधले. हातोड्याचे घाव घालून इरफानने आमीरची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तबस्सुमने पोलिसांना बोलावूलं. घरावर दरोडा पडल्याचा संशय यावा, अशी परिस्थिती तिने निर्माण केली, परंतु परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला.
गूगल सर्चमुळे भांडाफोड
पोलिसांनी तबस्सुमचे कॉल डिटेल्स चेक केले असता इरफानसोबत तिचे अनेक वेळा संभाषण झाल्याचे समोर आले. सायबर पोलिसांच्या मदतीने गूगल हिस्ट्री तपासली असता तबस्सुमने हत्या करण्याच्या पद्धती, हात-पाय कसे बांधावेत आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, याची माहितीही गूगल सर्च करुन मिळवल्याचं उघड झालं.
कसून चौकशी केल्यावर तबस्सुमने हत्येची कबुली दिली. हत्येनंतर अवघ्या 24 तासात घटनेची उकल करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
Leave a Reply