करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत असून यादरम्यान वाहन चालकांची तपासणी केली जात आहे. यावेळी अनेक वेळा पोलीस आणि चालकांमध्ये वाद होत असल्याचं समोर आलं आहे. असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे घडला असून दांपत्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे.
कागदपत्रं मागितली म्हणून दुचाकीस्वाने पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालत त्याच्या हाताचा चावा घेतला.तर त्याच्या पत्नीने फळीने मारहाण केली. यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
उद्धव एकनाथ भोसले आणि कुंदनबाई अशी यांची ओळख पटली शअून दोघेही आव्हाळवाडी, वाघोली येथे वास्तव्यास आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळून उद्धव आणि कुंदनबाई हे दुचाकीवरून जात होते. तेव्हा तिथे गुन्हे शाखेचे सचिन दिलीप पवार कर्तव्यावर होते. गाडीचा नंबर पाहिला असता त्यांना संशय आला.
सचिन पवार यांनी उद्धव भोसले यांच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनकडे घेऊन जात होते. तेव्हा उद्धव एकनाथ आणि पत्नी कुंदनबाई भोसले यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद एवढा झाला की, उद्धव यांच्या पत्नीने सचिन पवार यांना रस्त्यावर पडलेल्या फळीने मारण्यास सुरुवात केली. तर उद्धव यांनी सचिन पवार याच्या हाताला चावा घेतला. त्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे लोणीकंद पोलिसांनी सांगितले.
Leave a Reply