नाशिक: यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील, असा इशारा भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला. ते शनिवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीच्या निर्णयाचा विरोध केला. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील, असे तुषार भोसले यांनी म्हटले.
मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे. काही वारकरी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. कुंभमेळ्याचे शेवटचे शाही स्नान झाल्यामुळे वारीला एवढी गर्दी होणार नाही. पालखी सोहळ्यात गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी वारकरी संप्रदाय तयार होता. मात्र, सरकारने परस्पर निर्णय घेतला. या निर्णयाला कोणत्याही वारकऱ्याने पाठिंबा दिला नसल्याचे तुषार भोसले यांनी सांगितले.
राज्य सरकारचा काय निर्णय?
राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.
पायी जाण्यास मज्जाव, रिंगण-रथोत्सावाला अटींवर परवानगी
वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास देण्यात आली नाही, असं ते म्हणाले.
भाविकांसाठी मंदिर बंद
दरम्यान, भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केवळ मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
या आहेत मानाच्या 10 पालख्या
1) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर )
2) संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )
3) संत सोपान काका महाराज ( सासवड )
4) संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )
5) संत तुकाराम महाराज ( देहू )
6) संत नामदेव महाराज ( पंढरपूर )
7) संत एकनाथ महाराज ( पैठण )
8) रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )
9) संत निळोबाराय ( पिंपळनेर – पारनेर अहमदनगर )
10) संत चांगाटेश्वर महाराज ( सासवड )
Leave a Reply