जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरात गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीरपणे विक्री करणार्या रुबी मेडीकल आणि जनरल स्टोअरच्या मालकावर औषधी निरीक्षक अंजली मिटकरी यांनी कारवाई केली असून या कारवाईत मोठा औषधी साठाही जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात औषधी निरीक्षक अंजली मिटकरी यांनी दैनिक मराठवाडा केसरी सोबत बोलतांना ही माहिती दिली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन जालना कार्यालयाच्या औषध निरीक्षक अंजली मिटकर यांनी दि. 29 जुन 2021 रोजी रुबी मेडिकल आणि जनरल स्टोअर, टाऊन हॉल, जालना या मेडीकलची तपासणी केली होती. तपासणी वेळी सदर मेडिकलमध्ये सुहाग्रा टॅब्लेटसच्या 15 स्ट्रीप आणि गर्भपातासाठी वापरण्यात येणारी जेसटॅप्रो एमटीपी किट – 1 स्ट्रीप या औषधी अवैध रित्या खरेदी करुन अवैध विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले होते. सदर औषधी साठ्याचे कोणतेही खरेदी बिल/पुरवठादाराचा तपशील आढळून आला नाही. तसेच दुकानात उपलब्ध एमटीपी किटच्या स्ट्रीप वर उत्पादकाचे नाव, बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि एमआरपी नमुद नसल्याचे आढळून आले. त्यानंतर सदर मेडिकलचे मालक तथा नोंदणीकृत फार्मासिस्ट मोहम्मद जावेद यास संधी देऊन सुद्धा त्याने सदर औषधींचा उत्पादन खरेदी स्त्रोत किंवा पुरवठा करणार्या व्यक्तीचे नाव/तपशील सादर केला नाही. त्यामुळे सदरील औषधी अवैधरित्या खरेदी करून, अवैध व ज्यादा दराने विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याबद्दल औषध व्यावसायिक मोहम्मद जावेद यांच्या विरुद्ध कदिम जालना पो.स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्हा हा दि. 09 जुलै 2021 रोजी श्रीमती अंजली मिटकर औषध निरीक्षक, जालना यांचे फिर्यादीवरून दाखल करण्यात आला आहे. भादंवि चे कलम 420, 336 ई. अंतर्गत ऋखठ दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई संजय काळे, सह-आयुक्त (औषधे) औरंगाबाद विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अंजली मिटकर औषध निरिक्षक, जालना यांनी केली.
Leave a Reply