ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मी शोधत आहे नव्या वाटा

October 8, 202113:50 PM 19 0 0

llया देवी सर्व भुतेषु शक्तिरुपेण संस्थिता नमस्तसै नमस्तसै नमो नमःll

आपला भारत देश हा खेड्यांचा देश एकेकाळी आपल्याला याचा अभिमान होता पण आज आपण पाहतोय वस्तुस्थिती अशी आहे की शहरी लोक वस्तीने आणि शहरीकरणाने शहरे फुगत चालली आहेत, आणि खेडी ओस पडत आहेत एकेकाळी हीच खेडी स्वावलंबी होती स्वतःच्या गरजा स्वतःच्या स्थानिक उत्पादनाद्वारे भागवत होते, एकूण काय तर खेड्यातील लोक जीवन सुखाचे होते पण या सुखात शहरीकरण नावाचा मिठाचा खडा पडला आणि खेड्यातील वस्तीचा ओघ शहरात गर्दी करु लागला.
आणि याच खेड्यातील आमच्या या खेडवळ भागातील स्त्रियांचे जीवन म्हणजे रहाटाला जुंपलेल्या व झापड बांधलेल्या बैलां सारखे असते. त्या आपल्या अंधारातच चाचपडत असतात. जगात अनेक क्रांत्या झाल्या, जगाचे आधुनिकीकरण झाले पण आमच्या ग्रामीण भागातील स्त्रियांचे प्रश्न आजही सुटले आहेत असे विधान करणे आज चुकीचे ठरेल. हो पण पूर्वीपेक्षा परिस्थितीत मात्र थोडाफार बदल घडत आहे, पण तरीही ताठ मानेने जगू पाहणाऱ्या या स्त्रीला आधाराची अजूनही गरज आहे.पहायला गेलो तर शहर आणि गावातील स्त्री जीवन यामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे ‌. हीच दरी कमी करणे आजच्या काळाची गरज आहे.
आपण पहात आहोत महिला चळवळी, महिला सक्षमीकरण, महिला स्वावलंबी ,स्त्री शक्तीचा जागर , मुलगा व मुलगी यात फरक न मानणे यासाठी जे काही संघर्ष चालू असतात, लढे चालू असतात ते प्रामुख्याने शहरी स्त्रियांच्या जीवनाच्या प्रश्नांशीच निगडित असतात आणि या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या स्त्रियाही अर्थात कार्यकर्त्या याच मुळी शहर निवासिनी ,मध्यमवर्गीय पांढरपेशा स्त्रिया असतात. विधवांचे प्रश्न ,हुंडाबळी, कुटुंबातील आत्याचार हे प्रश्न शहरात काय किंवा ग्रामीण भागात काय सारखेच जटिल आहेत पण तरीही ग्रामीण स्त्रीचे जीवनावश्यक प्रश्न सारखेच असले तरी त्यांचे प्रश्न कोणाच्याही मर्मभेदात शिरत नाही. प्रश्न दोघींचेही समान असले तरी आमच्या गावरानी स्त्रियांच्या प्रश्नांचा सांधा काही फारसा जुळला जात नाही.
शहरी स्त्रियांच्या मानाने आमच्या गावरानी स्त्रियांचे आयुष्य हे शारीरिक कष्टाचे आहे. विहिरीतून पाणी काढणे, हे डोक्यावर आणणे, घरकाम, घरातील स्वच्छता ,दिवसातून दोन वेळेस स्वयंपाक ही कामे तर रोजचीच आहे पण उन्हाळ्यात मात्र जमिनीच्या बुडाला लागलेले, खोलवर गेलेले पाणी विहिरीच्या कठड्यावर टेकून उभे राहून सर्व शक्तीनिशी बाहेर काढणे व हेच पाणी पुन्हा डोक्यावर घेऊन चार पाच महिलांची पायपीट करताना चे चित्र वर्तमानपत्रात पाहिल्यावर जेव्हा आपल्या घरातील नळ सोडल्यावर हवे तेवढे पाणी वापरण्याची या आपल्या वृत्तीची आपल्यालाच लाज वाटायला हवी.


अंगातील कष्ट आणि या कष्टा साठी लागणारा वेळ इतक्या अवाजवी प्रमाणात खर्च होऊनही चेहऱ्यावरील हावभाव मात्र शांत असतात तीचे .स्वतःची शेती असेल तर शेतीची चाकरी आणि वेळ मिळाला तर इतरांच्या शेतावरही रोजंदारी,कोंबडी ,बकरी पालन, दूध दुभते ही सारी कामे बहुदा आमच्या बायकांचीच.त्यासाठी त्यांना मोबदला तर नाहीच याउलट शेत जमिनीच्या कागदपत्रांवर नावे ही त्यांची नसतात. पुरुषांच्या मानाने कष्टाच्या कामाची मजुरी ही स्त्रियांना कमीच असते. स्त्रियांचे आर्थिक शोषण केले जाते. गरीब घरातील मुली असतील तर शिक्षणासाठीही तीला पुढे जाऊ दिले जात नाही.याउलट शिक्षण थांबवून त्यांना विवाहबंधनात अडकवले जाते. यानंतर मग सुरू होते ती त्यांची जीवनातील सर्कस. बाळंतपण, कुपोषण, अनारोग्य यांना तोंड द्यावे लागते.
आता मात्र काळाच्या ओघात हळूहळू हि परिस्थिती बदलत असताना दिसत आहे. ग्रामीण स्त्रियांनीही अधिकार्‍यांना घेराव घालून, मोर्चे काढून रोजगार हमी योजना देण्यास शासनाला भाग पाडले आहे. जिल्हा परिषदांसाठी निवडणुकीत सर्वपक्षीय महिलांची महिला आघाडी ची स्थापना, शेतकरी महिला आघाडी यांनी अनेक कार्यक्रम राबवले आहेत. चुल-मुल या चक्रात असुनही स्वतःचे स्थान निर्माण करण्यास प्रयत्न करू लागल्या आहेत.बेकारी, गरिबी ,गुंडांचा त्रास ,दारू, मटक्याचे अड्डे यामुळे निर्माण होणारे भीतीचे वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी ही स्त्रियांना सत्तेत वाटा असावा असे विचार पुढे आले. दारूबंदी, दारूची दुकाने नष्ट करावी या आंदोलनास पाठिंबा मिळु लागला आहे. स्त्रियांसाठी जागा राखीव असल्याने लहान लहान वस्त्या, वाड्या, पाडे इथल्या अगदी तळागाळातल्या स्त्रियांना आयुष्यात प्रथमच गावच्या शासन प्रणालीत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. काहीजणी अशिक्षित असुनही आज अधिकाराने पुरुषांच्या बरोबरीच्या खुर्चीत स्थानापन्न होण्याचा मान मिळवित आहेत.
स्त्रीयांसाठी शिबिरे, कार्यशाळा ,कामकाजाच्या पद्धती, नियम, कायदे, अधिकार, सरकारी योजना ,राजकीय शिक्षण इत्यादी मार्गाने पद्धतशीर शिक्षण देण्यात येत आहे त्यामुळे आम्हा ग्रामीण स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला आहे. निवडणुकीत उभे राहणे,व प्रचारासाठीही त्या आज घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे समाजाने निर्माण केलेल्या कोषातून ती आज घराबाहेर पडत आहे. घराबाहेरील दुनियेची ओळख घेत आहे.विधवांना अनुदान, अपंग योजना, सेवानिवृत्ती वेतन, शौचालय अनुदान यासारख्या शासकीय योजना स्त्रियांपर्यंत पोहोचल्या आहेत .अनेक बचत गटांची मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात निर्मिती झाली आहे. लग्न, शिक्षणासाठी कर्जे मिळू लागले आहेत. लोणची,पापड, कुरडया, चटण्या, विणकाम, भरतकाम, अशा लघुउद्योगांची ही प्रदर्शने भरू लागली आहेत. यातून काम तर मिळत आहेच पण हे करण्यासाठी प्रोत्साहन ही मिळत आहे.
परिस्थितीशी झुंजण्याचे सामर्थ्य पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये अधिक आहे. ग्रामीण भागातील गरीबातील गरीब मुलीही शिक्षण घेण्यासाठी आज बाहेरगावी, शहरात जात आहेत. अल्पवयीन लग्नाचे प्रमाणही कमी झाले आहे. ताठ मानेने जगू पाहणार्‍या या ग्रामीण स्त्रीला आधार देणं आणि शहर व गावातील स्त्री जीवनाची ही दरी कमी करण आजच्या काळाची आहे.
स्त्रीही अतिशय आनंदात किंवा पराकोटीच्या दुःखातही मानसिक संतुलन ढळू देत नाही. प्रसंगी मेणाहुनही मऊ तर कधी वज्राहुनही कठोर ती होऊ शकते.
आजचा या नवरात्री पासून अस निश्चित करु या की, स्त्रीने तिच्यात असलेल्या शक्तीला जागे केले पाहिजे . संयमी असलेली स्त्री प्रसंगी बळकट होऊ शकते. स्त्रीत्वाच्या सिमेत राहूनही ती आकाशाला गवसणी घालू शकते. तिने कुणाच्याही आधाराच्या कुबड्या न घेता खंबीरपणे आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहिली तरच खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर होईल. ‘आपली बुद्धिमत्ता हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे ‘ हे या स्त्रीला समजू दे .हेच साकडे आज या जगत्जननी शक्ती देवतेला आहे.
यत्र नार्यस्तु पुजन्ते l रमन्ते तत्र देवता : ll
सौ. तृप्ती भोईर
उरण रायगड

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *