नातं
नातं तुझं आणि माझं,
तूला कळलच नाही !
प्रेमाचं गणित माझं ,
तुला सुटलच नाही !
चंद्र
पौर्णिमेच्या चंद्रा पेक्षा ,
माझा चंद्र सुंदर आहे !
त्या हर एक अदेवर,
माझा जीव फिदा आहे !
मनातील भाव सहज अलगत कागदावर व्यक्त करता आलं पाहिजे. प्रेम या शब्दात विश्व सामावलेले आहे. जगात प्रेम आहे म्हणूनच जग सुखी, समृद्धी आणि आनंदी आहे, असे माझे ठाम मत आहे! ज्याच्याकडे प्रेम करणारे हृदय नाही तो आयुष्यात सुखी कधीच होऊ शकत नाही. प्रेमात निस्वार्थी पणे प्रेम करणे हेच श्रेष्ठ आहे. जो त्याग करावयाला शिकला तोच प्रेम करावयाला शिकला अशी माझी धारणा आहे. प्रेमाने सर्व जग जींकता येते. प्रेमाने हृदयावर राज्य करता येते म्हणून हृदयाच्या तळापासून प्रेम करा. प्रेमाने नटलेल्या बहारदार सृष्टीत हसा, खेळा, बागडा. प्रेमाला वय नसते, बंधन नसते. प्रेमाचा संचार हा खट्याळ वाऱ्यासारखा मुक्त आहे. प्रेम हे पवित्र आहे खळखळ वाहणाऱ्या झरण्यासारखं ! प्रेमाच्या सुगंधाने धरणी नटली आहे फक्त हा सुगंध हुंगणाऱ्याची कमी आहे. प्रेम हे कोणत्याही वयात कोठेही… केव्हाही होऊ शकते. प्रेम बंधनात कोणी कधी अडकेल आणि कोणी कधी मुक्त होईल याचा काही नेम नाही.
#साहित्यिक_हा_आपल्या_अवती_भोवतीच्या_सृष्टीतील_सजीव_आणि_निर्जीव_यांचे_सूक्ष्म_निरीक्षण_करीत_असतो. आपल्या निरीक्षण शक्ती, प्रतिभा शक्तीच्या आणि अनुभावांच्या जोरावर तो विश्वातील सजीवांचे आणि स्वतःचे प्रेम आपल्या काळजातल्या लेखणीने कागदावर लिहून त्याला जिवंत पणा बहाल करतो. उपमा , उपमेय, अलंकार, यमक , छंदोमय
लेखन, गाणी, चारोळी, हायकू, कविता , गझल , लेख , कथा , कादंबरी , इ. विविध प्रकाराद्वारे विविध माध्यमांचा वापर करीत प्रेमाची महती मांडतो. प्रेम साहित्यकृतील अजरामर पणा बहाल करीत असतो. यातून पुढे सिनेमा, नाटक, गाणी, पुस्तके, प्रेम दर्शवणाऱ्या वास्तू, चित्रे इ.चा जन्म होतो.
हे सर्व करीत असताना #साहित्यिकांना_झालेले_प्रेम_तो_लेखणीने_अजरामर_करतो. यामध्ये आपले आणि इतरांचे प्रेम अनुभव विरह, प्रेम , दुःख, सुख, आनंद, सामाजिक वेदना इ. तो मांडत असतो. आपल्या कविता, लेख, गाणी , कथा इ. विविध माध्यमातून लेखन करीत असताना प्रेम या विषयावर त्यांचे लिखाण आल्यास तो कोण ? ती कोण ? हा प्रश्न अवती भोवती वावरणाऱ्या वाचकांना प्रश्न पडतो ? संशयाने त्याच्याकडे तिच्याकडे पाहिले जाते. घरातील घरचा आहेर ही त्याला तिला फुकटात मिळतो आणि हे अवघड जागेचं दुखण जिव्हारी लागते. त्याचा अन तिचा भूतकाळ चाळला जातो. साहित्य लिहितांना बऱ्याच साहित्यिकांना हे मिळालेले आतलं दुखणं आहे अशा प्रकारच्या विविध दुःखातून साहित्य निर्माण होते . घरातील वातावरण मनमिळाऊ आणि वैचारिक असल्यास त्याला आणि तिला प्रोत्साहन मिळते. जर या आनुभवातून साहित्यिक जात असतील त्यांनी डळमळून न जाता आपल्या विचारावर ठाम रहावे. आपल्याला आलेले अनुभव आणि इतरांकडून ऐकण्यात आलेले अनुभव बिधास्त लेखणीतून कोणाची भीड भाड न ठेवता मांडावे. आज कित्येक साहित्यकृती अजरामर झाली आहे आणि होत आहे . आज असंख्य गाणी, कविता, चारोळ्या , कथा , कादंबरी, सिनेमा , नाटक इ. निर्माण झालेले रसिकांच्या हृदयावर राज्य करतात.
#सजीव_प्राण्यामध्ये_ही_प्रेम_हा_गुण_सामावलेले_आहे जबरदस्तीने आणि आकर्षणाने मिळवलेले प्रेम हे दीर्घ काळ टिकत नाही. प्रेम हा दोन मनाचा संगम आहे. प्रेम या व्याख्येत मित्रत्वाचे प्रेम, पालकत्वाचे प्रेम, जीवन साथीचे प्रेम इ . विविध भावांमध्ये प्रेम पाहण्यास मिळते.
#कोणिही_दर्जेदार_कवी, लेखक , साहित्यिक होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीकडे प्रचंड विचार शक्ती, प्रचंड अनुभवांचा झरा आणि प्रतिभा शक्ती आहे. तो आजूबाजूच्या दुःखमय घटनेने अस्वस्थ होतो. आपल्या लेखणीने सुखाला , दुःखाला आणि मानवाच्या भाव भावनांच्या विचाराला लेखणीने वाचा फोडतो. चांगले काय ? वाईट काय ? हे ज्या साहित्यिकास समजते तोच प्रज्ञावंत असतो ! तोच दर्जेदार कवी, लेखक आणि साहित्यिक होऊ शकतो, असे माझे ठाम मत आहे ! काही पुस्तके माझ्या वाचनात आली, त्या पुस्तकांना दर्जा नसतांना छापण्यात आली. लिहायचे म्हणून कांहीही लिहू नये. साहित्यिक आणि विचारवंत होणं काय सोपं नाही. वैचारिक विचार , प्रेरणादायी, प्रतिभेने संपन्न असणारे साहित्य….. ज्या साहित्याची नाळ सर्व सामान्य माणसांशी जोडली जाते ती साहित्य कलाकृती अजरामर होते. तेच साहित्य वाचकांना भावते. मानवाच्या अमर्याद अडी अडचणी , सुख दुःख यात न रमता जे पानात, फुलात साहित्य रमते त्या साहित्यास मी साहित्य समजत नाही. माझ्या मते साहित्य हे माणसात रमणारे असावे. माणसांचे सुख दुःख मांडणारे असावे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे असावे. न्यायासाठी झटणारे असावे. साहित्य हे प्रोत्साहन देणारे प्रेरणादायी असावे . साहित्य हे सामाजिक जाणिवेच्या घडामोडीची जाणीव असणारे प्रतिबिंब असावे. साहित्य हे डोळसपणे लिहिलेले असावे. साहित्यास वैज्ञानिक दृष्टीकोनाची झालर असावी. मानवता हा दृष्टीकोन असणारे साहित्य असावे. हळूवार प्रेमाचा स्पर्श साहित्याला असावा. वरील सर्व साहित्यास मी साहित्य समजतो. त्या साहित्यिकाला मी साहित्यिक मानतो. असत्य गोष्टी पसरवणारे साहित्य नसावे. अंधश्रद्धा जपणारे साहित्य नसावे. साहित्य हे भेद भाव , द्वेष , तिड निर्माण करणारे नसावे. साहित्य हे गुलामी करण्यास प्रोत्साहन देणारे नसावे . साहित्य हे खोटा इतिहास सांगणारे आणि त्याचे श्रेष्ठत्व जपणारे नसावे. साहित्य हे दिशाभूल करणारे नसावे. जर असे साहित्य निर्माण झाले आणि माझ्या वाचनात आले तर त्या साहित्यास मी साहित्य समजत नाही . त्या साहित्यिकाला मी साहित्यिक मानत नाही.
असेन मी नसेन मी
साहित्याने हृदयात
तुमच्या वसेन मी
(लेखक नवनाथ रणखांबे
हे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार
प्राप्त असून विविध बुक ऑफ रेकॉर्ड धारक आहेत )
Leave a Reply