ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या अग्निहोत्राचे महत्त्व आणि लाभ

March 12, 202116:10 PM 120 0 0

वातावरणाच्या शुद्धीसाठी प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ करण्याची संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये आहे. अग्निहोत्राच्या उपासनेमुळे वातावरण शुद्ध होऊन एकप्रकारचे संरक्षककवच निर्माण होते. अगदी किरणोत्सर्गापासून संरक्षण करण्याचे सामर्थ्यही अग्निहोत्रामध्ये आहे. यासाठी ऋषिमुनींनीही यज्ञाचा प्रथमावतार असलेले अग्निहोत्र करणे हा उपाय सांगितला आहे. तो करण्यास अतिशय सोपा आणि अतिशय अल्प वेळेत होणारा; पण प्रभावी असा सूक्ष्मातील परिणाम साधून देणारा उपाय आहे. प्रतिदिन अग्निहोत्र करण्यामुळे वातावरणातील हानीकारक जीवाणूंचे प्रमाण लक्षणीय घटते, हेही आता वैज्ञानिक प्रयोगांद्वारे सिद्ध झाले आहे. प्रतिदिन अग्निहोत्र करणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. ‘विश्व अग्निहोत्र दिना’च्या निमित्ताने सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून वाचकांना अग्निहोत्राची ओळख होईल. तसेच अग्निहोत्र करण्याचे महत्त्व आणि लाभही या लेखातून जाणून घेऊया.

१. अग्निहोत्र म्हणजे काय ?
अग्निहोत्र म्हणजे अग्न्यन्तर्यामी (अग्नीमध्ये) आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्‍वरी उपासना. सूर्योदयाच्या, तसेच सूर्यास्ताच्या वेळी केली जाणारी सूर्याची उपासना म्हणजे अग्निहोत्र ! अग्निहोत्र म्हणजे कामधेनूच आहे. अग्निहोत्र करण्यासाठी वेळ सोडली, तर अन्य कशाचेच बंधन नाही. अग्निहोत्रासाठी पिरॅमिडच्या आकाराच्या पात्रात गायीच्या शेणाच्या गोवर्‍या, २ चिमूट अखंड तांदूळ आणि देशी गायीचे तूप यांच्या साहाय्याने प्रज्वलित केल्या जातात. त्यानंतर २ मंत्र म्हणून आहुती दिली जाते.

आज मनुष्याचे जीवन अतिशय धावपळीचे आणि तणावग्रस्त झाले आहे. अशा परिस्थितीत मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषिमुनींनीच अग्निहोत्राचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आपण श्रद्धापूर्वक तो अवलंबल्यास निश्‍चितच लाभ होईल.

२. अग्निहोत्र करण्याचे महत्त्व
त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, आता पुढे येणारा काळ हा भीषण आपत्काळ आहे. पुढे आपत्काळ आहे, असे म्हणण्यापेक्षा आता आपत्काळाला आरंभ झालाच आहे. सद्यस्थितीत तिसरे महायुद्ध कधीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. दुसर्‍या महायुद्धापेक्षा आता जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे ती एकमेकांविरुद्ध डागली जातील. या युद्धामध्ये अण्वस्त्रे उपयोगात आणली तर या अण्वस्त्रांपासून संरक्षण होण्यासाठी तसेच या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा. किरणोत्सर्गापासून संरक्षण करण्याचे सामर्थ्यही या अग्निहोत्रामध्ये आहे. अग्नीच्या साहाय्याने कोणीही करू शकेल असा हा उपाय म्हणजे अग्निहोत्र. असे या अग्निहोत्राचे विशेष महत्व आहे.

३. अग्निहोत्राचे लाभ
३ अ. चैतन्यप्रदायी आणि औषधी वातावरण निर्माण होते.
३ आ. अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य पिकणे – अग्निहोत्रामुळे वनस्पतींना वातावरणातून पोषणद्रव्ये मिळतात आणि त्या सुखावतात. अग्निहोत्राच्या भस्माचाही शेती आणि वनस्पती यांच्या वाढीवर उत्तम परिणाम होतो. परिणामतः अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य, फळे, फुले अन् भाजीपाला पिकतो. – होमा थेरपी नावाचे हस्तपत्रक, फाईव्हफोल्ड पाथ मिशन, ४०, अशोकनगर, धुळे.
३ इ. अग्निहोत्राच्या वातावरणाचा बालकांवर सुपरिणाम होणे – मुलांच्या मनावर उत्तम परिणाम होऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. चिडचिडी, हट्टी मुले शांत आणि समंजस होतात. मुलांना अभ्यासात एकाग्रता सहज साधता येते. मतिमंद मुले त्यांच्यावर चालू असलेल्या उपचारांना अधिक उत्तम प्रतिसाद देतात.
३ ई. अग्निहोत्राने दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होऊन मनोविकार बरे होणे आणि मानसिक बल प्राप्त होणे – नियमाने अग्निहोत्र करणार्‍या विविध स्तरांतील स्त्री-पुरुष, बाल-वृद्ध यांमध्ये एकमुखाने अधिक समाधान, जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, मनःशांती, आत्मविश्‍वास आणि अधिक कार्यप्रवणता हे गुण निर्माण होऊन वाढीस लागल्याचे अनुभवास आले. दारू आणि इतर घातक मादक पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्ती अग्निहोत्राच्या वातावरणात त्या व्यसनांपासून मुक्त होऊ शकतात; कारण त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होते, असे आढळून आले आहे. – डॉ. श्रीकांत श्रीगजाननमहाराज राजीमवाले, शिवपुरी, अक्कलकोट.
३ उ. मज्जासंस्थेवर परिणाम – ज्वलनातून निघणार्‍या धुराचा मेंदू आणि मज्जासंस्था यांवर प्रभावी परिणाम होतो. – होमा थेरपी नावाचे हस्तपत्रक, फाईव्हफोल्ड पाथ मिशन, ४०, अशोकनगर, धुळे.
३ ऊ. रोगजंतूंचे निरोधन – अग्निहोत्राच्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो, असे काही संशोधकांना आढळून आले.
३ ए. संरक्षककवच निर्माण होणे – एक प्रकारचे संरक्षककवच सभोवती असल्याची जाणीव होते.
३ एे. अग्निहोत्रामुळे प्राणशक्ती शुद्ध होऊन त्या वातावरणातील व्यक्तींचे मन त्वरित प्रसन्न आणि आनंदी होणे अन् त्या वातावरणात ध्यानधारणा सहज साध्य होणे – प्राण आणि आपले मन एकमेकांशी घट्टपणे निगडित असून जणूकाही ती एकाच नाण्याची दोन अंगे आहेत, असेही म्हणता येईल. अग्निहोत्रामुळे प्राणशक्ती शुद्ध झाल्याचा इष्ट परिणाम त्या वातावरणात असलेल्या व्यक्तीच्या मनावर त्वरित होऊन तिला तणाव विनासायास नष्ट होऊन मन प्रसन्न आणि आनंदी झाल्याचा अनुभव येतो. त्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते. – डॉ. श्रीकांत श्रीगजाननमहाराज राजीमवाले, शिवपुरी, अक्कलकोट.
४. अग्निहोत्र साधना म्हणून प्रतिदिन नित्यनियमाने करणे आवश्यक असणे
अग्निहोत्र करणे ही नित्योपासना आहे. ते एक व्रत आहे. ईश्‍वराने आपल्याला हे जीवन दिले आहे. त्यासाठी तो आपल्याला प्रतिदिन पोषक असे सर्वकाही देत असतो. या प्रीत्यर्थ प्रतिदिन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करणे, हे आपले कर्तव्य आहे. तसेच ते साधना म्हणूनही प्रतिदिन करणे आवश्यक आहे.

अग्निहोत्राची कृती
अ. अग्निहोत्रासाठी अग्नी प्रज्वलित करणे
हवनपात्राच्या तळाशी गोवरीचा लहान आकाराचा एक चपटा तुकडा ठेवावा. त्याच्यावर गोवरीचे तुकडे तूप लावून अशा रीतीने ठेवावेत (गोवरीच्या उभ्या व आडव्या तुकड्यांचे २-३ थर) की, त्याद्वारे आतील पोकळीत हवा खेळती राहील. नंतर गोवरीच्या एका तुकड्याला गायीचे तूप लावून पेटवावा आणि तो तुकडा हवनपात्रामध्ये ठेवावा. थोड्या वेळात गोवऱ्यांचे सर्व तुकडे पेट घेतील. अग्नी प्रज्वलित होण्यासाठी हवा घालण्यासाठी हातपंख्याचा उपयोग करावा. अग्नी पेटवण्यासाठी रॉकेलसारख्या ज्वलनशील पदार्थांचा उपयोग करू नये. अग्नी निर्धूम प्रज्वलित असावा, म्हणजे त्याचा धूर निघू नये.

आ. अग्निहोत्र मंत्र
या अग्नीच्या प्रज्वलिततेला मंत्ररूपी तेजाचे अनुष्ठान लाभल्याने अग्नीतून उत्पन्न होणाऱ्या तेजोलहरी थेट आकाशमंडलातील देवतांशी संधान साधून त्या त्या देवतांच्या तत्त्वांना जागृत करून वायूमंडलाची शुद्धी करून देणाऱ्या आहेत. मंत्रांच्या उच्चारांपासून उत्पन्न होणारी कंपने वातावरणात आणि त्यातील सजीव आणि वनस्पती यांवरही परिणाम करतात. अग्निहोत्राचे मंत्र त्यांच्या मूळ रूपात जसेच्या तसे कोणताही भेद न करता उच्चारले जावेत. मंत्रांचे उच्चार अग्निहोत्र-स्थानात गुंजतील अशा नादमय रीतीने, फार गडबडीने किंवा फार सावकाश न करता स्पष्ट आणि खणखणीत स्वरात करावे.

सूर्योदयाच्या वेळी म्हणावयाचे मंत्र
सूर्याय स्वाहा सूर्याय इदम् न मम
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम् न मम
सूर्यास्ताच्या वेळी म्हणावयाचे मंत्र
अग्नये स्वाहा अग्नये इदम् न मम
प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम् न मम
मंत्र म्हणतांना भाव कसा हवा ? : मंत्रांतील ‘सूर्य’, ‘अग्नि’, ‘प्रजापती’ हे शब्द ईश्वरवाचक आहेत. ‘सूर्य, अग्नि, प्रजापती यांच्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्मशक्तीला मी ही आहुती अर्पण करत आहे, ‘हे माझे नव्हे’, असा या मंत्राचा अर्थ आहे.

या कृतीमध्ये हवनद्रव्ये अग्नीत समर्पित करावीत. हवन करतांना मध्यमा आणि अनामिका यांना अंगठा जोडून केलेली मुद्रा असावी. (अंगठा आकाशाच्या दिशेने ठेवणे). तसेच योग्य वेळीच म्हणजे सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी (संधीकाली) अग्निहोत्र करणे अपेक्षित आहे. प्रजापतीलाच प्रार्थना करून सुरुवात आणि त्याच्याच चरणी कृतज्ञता व्यक्त करून हवनाचा शेवट करावा.

५. अग्निहोत्रानंतर करावयाच्या कृती
५ अ. ध्यान – प्रत्येक अग्निहोत्रानंतर शक्य तेवढी अधिक मिनिटे ध्यानासाठी राखून ठेवावीत. निदान अग्नी शांत होईपर्यंत तरी बसावे.
५ आ. विभूती (भस्म) काढून ठेवणे – पुढील अग्निहोत्राच्या थोडे अगोदर हवनपात्रातील विभूती (भस्म) काढून ती काचेच्या अथवा मातीच्या भांड्यात साठवून ठेवावी. तिचा वनस्पतीसाठी खत म्हणून आणि औषधे बनवण्यासाठी उपयोग करता येतो. – होमा थेरपी नावाचे हस्तपत्रक, फाईव्हफोल्ड पाथ मिशन, ४०, अशोकनगर, धुळे.
आवाहन : अग्निहोत्र’ ही हिंदु धर्माने मानवजातीला दिलेली ही एक अमूल्य देणगी आहे. अग्निहोत्र नियमित केल्याने वातावरणाची मोठ्या प्रमाणात शुद्धी होते. इतकेच नव्हे तर, ते करणार्‍या व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीही होते. यासह वास्तू अन् पर्यावरण यांचेही रक्षण होते. समाजाला चांगले आरोग्य अन् सुरक्षित जीवन जगण्यासाठी सूर्यादय आणि सूर्यास्त समयी ‘अग्निहोत्र’ करावे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्ससारख्या 70 देशांनीही अग्निहोत्राचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकांत त्याचे निष्कर्ष प्रसिध्द केले आहेत. त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेला हा विधी सर्व नागरिकांनी मनोभावे करावा.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘अग्निहोत्र’

संपर्क : श्री. दत्तात्रेय वाघूळदे 9284027180

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *