येत्या रविवारी (दि. ८ ऑगस्ट) ला आषाढी अमावस्या अर्थात दीप अमावस्या आहे. अलीकडच्या काळात आषाढी अमावस्या म्हटलं तर फारसे कुणाच्या लक्षात येणार नाही पण गटारी अमावस्या म्हटलं तर सर्वांना कळते. तथापि, दीप अमावस्येला कटहारी अमावस्या असेही म्हणतात, जो कष्टहारी शब्दाचा अपभ्रंश आहे. मात्र, त्याचे गटारी कधी आणि कसे झाले हे समजत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती व वात यांना महत्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हंटले जाते तर दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याच वेळी दारिद्र्याची देवता निघून जाते अशीही कल्पना आहे.आपल्याकडील प्रत्येककथेमागे,सण- उत्सवामागे धार्मिक (सामाजिक) आणि शास्त्रीय कारणे असतात.हिंदू धर्मशास्त्रानुसार पूजा करताना तुपाचा दिवा लावल्याने अज्ञानाचा अंधकार नाहीसा होऊन घरामध्ये सुख-समृद्धी येते.गायीच्या तुपामध्ये रोगराई पसरविणारे सूक्ष्म किटाणू मारण्याची क्षमता असल्याने तूप जेव्हा दिव्यामध्ये अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा वातावरण पवित्र आणि शुद्ध होऊन प्रदूषण दूर होते.
तथापि, श्रावण महिन्यात अनेक लोक मांसाहारी पदार्थांचे सेवन करत नसल्याने श्रावण मासारंभाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गटारीच्या दिवशी मांसाहार तसेच मद्यपानावर भर देतात. एकवेळ मांसाहार हा आहाराचा अविभाज्य घटक मानला तरी मद्य हा आहाराचा अपरिहार्य भाग असू शकणार नाही. मद्यपानाच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबांची वाताहात झाल्याची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असताना लोक गटारीच्या निमित्ताने मद्याच्या बाटल्या रिचवून धुंद होताना दिसतात. तेव्हा आषाढी अमावस्येला दिव्यांची अमावस्या समजून, या दिवशी घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करुन त्यांना पाटांवर मांडून त्यासमोर रांगोळी काढून त्यांना हळदी-कुंकू, अक्षता, फुलं वाहील्यानंतर गंध, फुलांनी मनोभावेपूजा करून गुळ, फुटाणे व लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. अशाप्रकारे काळा अंधार उजळून टाकणाऱ्या या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करू या. “तमसो मा ज्योतिर्गमय” असा संदेश देणारी मंगलमय दीप अमावस्या आपण पारंपरिक पद्धतीने अगदी सहजपणे साजरी करून येणाऱ्या श्रावण मासाचे स्वागत करू या !
प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ, जि. (सांगली).
Leave a Reply