ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि आपत्काळात धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी ?

July 21, 202115:31 PM 72 0 0

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.
हिंदु शास्त्रामध्ये वरील श्‍लोक सांगितला आहे. गुरूंशिवाय तरणोपाय नाही. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर अशी अनेक वैशिष्ट्ये गुरूंबद्दल सांगता येतील. मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी गुरुतत्त्व नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्र (हजार) पटींनी कार्यरत असते. यावर्षी आषाढ पौर्णिमा अर्थात व्यासपूजन म्हणजेच गुरुपौर्णिमा 23 जुलै या दिवशी आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व पहाणार आहोत. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुपौर्णिमा महोत्सव नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात आपत्काळातील (कोरोनाच्या संकटकाळातील) निर्बंधांमध्ये धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी ? हे सुद्धा आपण पाहणार आहोत.


1. तिथी – गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. (तामिळ प्रदेशात व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेस साजरा करतात.)

2. उद्देश – गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.
3. महत्त्व
अ. गुरुपौर्णिमा या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत 1 सहस्र (हजार) पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत 1 सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.
आ. ‘गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे; परंतु काळाच्या प्रवाहात रज-तमप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे या महान अशा गुरु-शिष्य परंपरेची उपेक्षा होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय ! गुरु-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून इतिहासापर्यंत पहायला मिळतात, उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण. चंद्रगुप्त मौर्य याला आर्य चाणक्य यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत. आज गुरु-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. गुरु-शिष्य परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत पुनःश्‍च हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक आहे.
4. गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत – प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षि व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतियांची धारणा आहे. कुंभकोणम् आणि शृंगेरी ही शंकराचार्यांची दक्षिण भारतातील प्रसिद्ध पिठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव साजरा होतो. व्यासमहर्षी हे शंकराचार्यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे; म्हणून संन्यासी लोक या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात.
5. गुरुपूजनाचा विधी – स्नानादी नित्यकर्मे आटोपून ‘गुरुपरम्परासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये ।’ असा संकल्प करतात. एक धूतवस्त्र अंथरून त्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेघा काढतात. ते म्हणजे महर्षि व्यास यांचे व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परात्परशक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांचे त्या व्यासपिठावर आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. याच दिवशी दीक्षागुरु आणि मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.
6. आपत्काळात धर्मशास्त्रानुसार गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी ? – मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुपौर्णिमा महोत्सव नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. या दृष्टीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्माचरण म्हणून काय करता येऊ शकेल, हे पाहूया. येथे एक महत्त्वाचे सूत्र असे आहे की, हिंदु धर्माने आपत्काळासाठी धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म. हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे यातून शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितियत्व अधोरेखित होते.


अ . गुरुपौर्णिमेच्या दिवशी बहुतेक जण त्यांच्या श्री गुरूंकडे जाऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार कुणी श्री गुरु, कुणी माता-पिता, कुणी विद्यागुरु (ज्यांनी आपल्याला ज्ञान दिले, ते शिक्षक), कुणी आचार्यगुरु (आपल्याकडे परंपरागत पूजेसाठी येणारे गुरूजी), तर कुणी मोक्षगुरु (ज्यांनी आपल्याला साधनेची दिशा देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, ते श्री गुरु) यांच्याकडे जाऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आपण घरी राहून भक्तीभावाने श्री गुरूंच्या छायाचित्राचे पूजन किंवा मानसपूजन भावपूर्ण केल्यानेही आपल्याला गुरुतत्त्वाचा एक सहस्र पटीने लाभ होईल. प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार उपास्यदेवता, संत किंवा श्री गुरु निराळे असले, तरी गुरुतत्त्व एकच असते.
आ. संप्रदायातील सर्व भक्तांनी पूजनाची एक वेळ निश्‍चित करून शक्यतो त्याच वेळेत आपापल्या घरी पूजन करावे. ‘एकाच वेळेत पूजन केल्याने संघटित शक्तीचा अधिक लाभ होतो’, यासाठी सर्वानुमते शक्यतो एक वेळ निश्‍चित ठरवून त्या वेळी पूजन करावे.
* सकाळची वेळ पूजनासाठी उत्तम मानली आहे. ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य आहे, त्यांनी सकाळची वेळ ठरवून त्या वेळी पूजा करावी. काही अपरिहार्य कारणामुळे ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य नाही, त्यांनी सायंकाळची एखादी वेळ निश्‍चित करून त्या वेळी; परंतु सूर्यास्तापूर्वी, म्हणजे सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी पूजा करावी. ज्यांना ठरवलेल्या निश्‍चित वेळेत पूजा करणे शक्य नाही, त्यांनी आपापल्या वेळेनुसार; मात्र सूर्यास्तापूर्वी पूजा करावी.
* प्रत्येकाने आपापल्या संप्रदायानुसार श्री गुरु वा उपास्यदेवता यांचे चित्र, मूर्ती किंवा पादुका यांचे घरी पूजन करावे. चित्र, मूर्ती किंवा पादुका यांना गंध लावून पुष्प वहावे. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून पंचोपचार पूजा करावी. नंतर श्री गुरूंची आरती करावी. ज्यांना साहित्याच्या अभावामुळे प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नाही, त्यांनी श्री गुरु किंवा उपास्यदेवता यांची मानसपूजा करावी.
* नंतर श्री गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा. श्री गुरु आपल्या आयुष्यात आल्यानंतर आलेल्या अनुभूतींचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. त्या वेळी ‘वर्षभरात आपण साधनेत कुठे न्यून (कमी) पडलो ? आपण श्री गुरूंची शिकवण किती प्रमाणात आचरणात आणली ?’, याचेही सिंहावलोकन करून त्यावर चिंतन करावे.’
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)
संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था
संपर्क- 9284027180

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *