डोंबिवली : क्षुल्लक कारणावरून शशांक महाजन या तरुणाच्या अंगावर कार घालून त्याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी डोंबिवलीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
औद्योगिक परिसरातील एका उपाहारगृहात सचिन पाटील आणि त्याचे साथीदार जेवण्यासाठी गेले होते. याच उपाहारगृहात शशांक महाजन हादेखील त्याच्या मित्रासोबत आला होता. या दरम्यान शशांकसोबत सचिन आणि त्याच्या साथीदारांचे वाद झाले. त्यानंतर शशांक त्याच्या मित्रासह उपाहारगृहातून बाहेर पडला. त्या वेळी सचिन व त्याचे साथीदारही उपाहारगृहातून बाहेर पडले. त्यांनी शशांकचा कारने पाठलाग केला. त्याला गाठून बेदम मारहाण केली. या मारहाणीत शशांक रस्त्यावर पडला. त्यानंतर सचिन आणि त्याच्या साथीदारांनी शशांक याच्या अंगावर कार घालून त्याला ठार केले. त्यानंतर सहाही जणांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Leave a Reply