मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यात भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थ डे बॉयला पोलिसांनी मंगळवारी बेड्या घातल्या आहेत. त्याच्याकडून २६ इंच लांबीचे दुधारी पाते व ६ इंच लांब नक्षीदार मुठ असलेली तलवार जप्त करण्यात आली.
समीर अनंत ढमाले (वय २७, रा. रविवार पेठ) असे बर्थ डे बॉयचे नाव आहे. समीर ढमाले याने मित्रांसह २३ जानेवारी रोजी मध्यरात्री भररस्त्यात वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापला होता. त्यानंतर सोशल मीडिया वेबसाइटवर तलवारीने केक कापतानाचा फोटो अपलोड करुन नवीन स्टेटस ठेवलं होतं. मंगळवारी ढमाले हातात तलवार घेऊन रविवार पेठेत फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय थोरात यांना मिळाली होती. त्यानंतर त्याला गणेश पेठच्या लोकरवाडा इथून अटक केली आणि तलवारही हस्तगत करण्यात आली, अशी माहिती पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल ताकवले यांनी दिली.
दरम्यान, पुढील कारवाईसाठी समीर ढमालेला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे फॅड वाढले आहे. कॉलेजच्या तरुण-तरुणींपासून गल्लीतले भाई-दादा देखील अशाप्रकारे वाढदिवस साजरा करुन एकप्रकारे ‘शक्तीप्रदर्शन’ करत असतात, त्यामुळे पोलिस सध्या असे प्रकार हाणून पाडत आहेत.
Leave a Reply