नांदेड – रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जवळ्यात सम्राट सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवचरित्र चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या चाचणी स्पर्धेला ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण १९ फेब्रुवारी रोजी जवळा देशमुख येथे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पं.स. सदस्य श्रीनिवास मोरे, प्रसिद्ध विचारवंत व इतिहासतज्ज्ञ डॉ. अनिल कठारे, लोहा नगरपालिका नगरसेवक तथा विरोधीपक्ष नेता पंचशील कांबळे, सरपंच कमलताई शिखरे, मुख्याध्यापक ढवळे जी. एस यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तथा वाचनालयाचे संस्थापक भैय्यासाहेब गोडबोले यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र चाचणी परीक्षा घेण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रारंभ जवळा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच कमलताई शिखरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनींनी सरपंच शिखरे यांचा पुष्पहार घालून सन्मान केला. यावेळी प्रमोद मठपती, सूरज शिखरे, सत्यजीत गोडबोले, कमलाबाई शिखरे, गंगाधर ढवळे, भैय्यासाहेब गोडबोले, हैदर शेख यांची उपस्थिती होती. माहिती तंत्रज्ञान व मोबाईलच्या जमान्यात वाचनसंस्कृतीचा लोप होत चालला आहे. मानवी जगण्याच्या विविध क्षेत्रात माहितीचा स्फोट होत असला तरी सर्वसामान्य ग्रामीण नागरिक, नवसाक्षर पुरुष महिला यांच्यासाठी आणि बालक बालिका तरुण मुलामुलींसाठी वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाचनालयाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून ग्रामीण वाचकांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे वाचनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Leave a Reply