ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दलितांवरील अन्याय अत्याचाराची भारतीय मानसिकता

February 7, 202215:28 PM 50 0 0

दलित हा शब्द कोणतीही संज्ञा किंवा संकल्पना नाही. ती एक मानसिकता आहे. तसेच ती कालिक आहे. साधारणपणे ठरवून घेतले तर काही काळानंतर असलेले दलितत्व संपून जाऊ शकते. दलित असणे हे इथल्या समाजव्यवस्थेने स्विकारलेल्या वर्णवादाचे फलित आहे. पिढ्यानपिढ्या मांडलेला हा छळवाद आणि तो सोसण्याची गुलामी करणे हा धर्मच होऊन बसला होता. हा कालखंड इतका मोठा होता की, आजही तो मानसिकतेतून जायला तयार नाही. हे दलितत्व बाह्यपरत्वे संपले असले तरी मनातून जायला हवे. ते तसे बहुतेकांच्या मनातून गेले. ते गेल्यानंतर दलित काही सवर्ण बनणार नाहीत हे त्यांना आणि इथल्या तथाकथित सवर्णांनाही माहीत असते. परंतु ज्यांच्या मनातून गेले ते आंबेडकरी झाले, बौद्ध झाले. यांच्याही मनात आपणही दलितच आहोत असे अजूनही असेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. परंतु प्रश्न बौद्ध न झालेल्या मोठ्या दलित वर्गाचा आहे. न्यायालयाने यात हस्तक्षेप करीत दलित हा शब्द वापरण्यावर, अनुसरण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तरीही बौद्ध वगळता अनेक जातीसमुह स्वतःला दलित समजण्यात धन्यता मानतात. यात काही अतिविशिष्ट लेखक आणि विचारवंतांचाही समावेश होतो. तिथे सर्वसामान्यांचे काय? सर्वसामान्य लोकांना गावगाड्यातील सततचा होणारा छळवाद स्वतःला दलित म्हणवून घेण्यास भाग पाडत असतो. त्यामुळे ही मानसिकता प्रबळ होत जाते. आपणच नेहमी म्हणत असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात आणि जातीय वर्णवर्चस्ववादी बरबटलेल्या महान देशात काही विशिष्ट काळानंतर अन्याय (हा तर सततच होत असतो.) आणि जबरी अत्याचाराच्या घटना घडतांना आपल्याला दिसतात. मोर्चे किंवा आंदोलन केले की संपले असा त्याचा काही अर्थ नाही. गाव – शहरातील दलितांनी स्वतःला दलित समजण्याची आणि स्वतःला वरिष्ठ उच्चभ्रू समजून दलितांना दलित समजण्याची मानसिकता संपवली पाहिजे.‌
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्नापूर येथील दलित वस्तीत मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच जाणीवपूर्वक पाणी पुरवठा बंद केल्यामुळे शेकडो ग्रामस्थांनी दोन फेब्रुवारीपासून रात्री गाव सोडून गावाच्या वेशीवर आंदोलन सुरू केले होते. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर गावात वार्ड क्रमांक एक मधील गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्या कारणाने गावकऱ्यांनी गावाच्या वेशी जवळ ठिय्या आंदोलन पुकारले. बुधवारी रात्री पासून गावावर बहिष्कार टाकला. जो पर्यंत पाणी मिळणार नाही तो पर्यंत आता मागे हटणारच नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. साधारणपणे एक महिना वार्ड १ मध्ये ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा केला नसल्याचा आरोप त्या पिडित वंचित समुहाने केला आहे. फक्त दलीत वस्तीत पाणी येत नसून उपसरपंचाने जाणीपूर्वक पाणी पुरवठा बंद केला होता.
अमरावती जिल्ह्यातील सावंगी मरगापुर येथील दलित वस्तीला पाणी दिले जात नसल्याने दलितांनी गाव सोडल्याची नामुष्की ओढवल्यानंतर आता पुन्हा पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना लातूर जिल्ह्यात घडली. लातूरच्या निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात दलित तरुणाने मंदिरात जावून नारळ फोडल्याने संपूर्ण समाजावर बहिष्कार टाकण्यात आला होता. ही पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारी ही घटना आहे. मंदिरात जावून नारळ फोडल्याने दलितांवर बहिषकार टाकण्यात आल्याचा प्रकार ताडमुगळी या गावात घडलाय. दलितांना जर कोणी मदत केली, त्यांना कामावर घेतले तर त्याला पन्नास हजार रुपांपर्यंत दंड लावण्यात येईल असा तोंडी नियम सर्वानुमते ठरवण्यात आला होता. दोन दलीत महिला दळण आणण्यासाठी गिरणीत गेल्या असता गिरणी चालकाने त्यांना दळून देण्यास नकार दिला. एक दलीत मंदिरात जातो, अस कस चालेल, आम्ही दळण दिलं, किराणा दिलं की पन्नास हजार रूपये दंड लागणार असल्याचं त्यानं त्या महिलांना सांगितलं. तुमच्या दहा रुपयांसाठी एवढा दंड कशाला भरायचा असा प्रश्नही त्याने महिलांना केला. हे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. आम्हाला गरिबांना कशाला ताप देताय… द्या की एवढ्या वेळेस, एकानं केलं अन् सगळ्यांना त्याचा त्रास कशाला? अशी आर्जव महिला त्या दुकानदारांकडे करतांना दिसत आहेत. त्यावर गरिबानं नीट रहावं की… कशाला गावच्या मंदिरात जावं, असं म्हणत गिरणीवाल्याने दळण देण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तसंच बहिष्काराची माहिती औराद पोलिसांना मिळाल्यानंतर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय मात्र अद्याप कोणावरही कारवाई केली नाही. आता हा बहिष्कार मागे घेण्यात आल्याची दवंडी गावात देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नाही.
गतवर्षीही अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातीलच दानापूर येथील अनुसुचित जातीच्या बांधवावर गावातील सवर्ण सतत जातीय अन्याय अत्याचार करीत आहे. त्यांच्या निषधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी गाव सोडले होते. त्यांचा मुक्काम गावालगतच्या पाझर तलावावर असुन ते गावात परतणार नाही. त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी कळविले होते. चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील या बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदनच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. मात्र गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी चौघांवर अ‍ॅट्रोसिटीसह अन्य गुन्हे दाखल झालेले आहे .मात्र स्थानिक एसडीपीओंनी सदर प्रकरणच दाबून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सवर्णाचे मनोबल वाढले आणि त्यांनी दलित युवतींना त्रास देणे सुरू केले. या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मात्र दोन्ही प्रकरणात मात्र कार्यवाही केली नाही. या अन्यायाविरूध्द दानापूरचे दहा दलित गावात आमरण उपोषणला बसले होते. त्यानंतर मोठ्या जीवाभावाने चांदूरच्या एसडीपीओंनी कार्यवाही केली. मात्र रस्ता अडवणूक प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आरोपी अद्यापही मोकाट आहेत असे दलित बांधवांनी म्हटले. वहीवाटीच्या रस्त्यासाठी स्थानिक तहसीलदाराकडे दाखल केसवर चार महिने होऊनही निकाल लागलेला नाही. सततचा अन्याय, अत्याचार होऊनही न्याय मिळत नसल्याने दानापूरचे दलित व्यथित झाले होते. तर आरोपींना शासन-प्रशासनाकडून पाठबळ मिळाल्याने त्यांचे अन्याय अत्याचार वाढले. सोयाबीन काढण्यासाठी तात्पुरता रस्त्यासाठी या दलितांना तहसिलचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळाला नाही.
विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पासून १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली होती. या घटनेत ७ जण जखमी झाले. अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना घडली होती. पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी घटनेबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली. त्यामुळे चोवीस तास उलटूनही या गंभीर प्रकाराची कुठेही वाच्यता झाली नाही. गावाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला गेला. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. गावातील लोक काहीही बोलण्यास तयार नव्हते. घटना अशी घडली होती की, गावातील दोन-तीन महिलांच्या अंगात देवी आल्या आणि त्यांनी दलित समाजातील वयाने ज्येष्ठ आठ-दहा लोकांची नावे घेऊन त्यांनी भानामती केल्याचे सांगितले. त्याला बळी पडून गावातील काही लोकांनी त्या सर्वांना भरचौकात खांबांना बांधून बेदम मारहाण केली. वृद्ध, महिलांनाही मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना गावातील इतर लोक मूक दर्शक बनले होते. भीतीने कुणीही मध्ये पडले नाही. यात ७ जण जखमी झाले.
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना चळवळीचे केंद्र असलेल्या मराठवाड्यातील औरंगाबादेत घडली आहे. उच्च न्यायालयातील एका वकिलाला दलित असल्याने घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. प्रकरणी अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत पाच जणांविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयात वकिली करणारे महेंद्र गंडले यांना शहरातील उच्चभ्रू सोयायटीत केवळ दलित असल्याने घर नाकारले गेले. औरंगाबादेतील हिरापूरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या साईटवर अॅड. गंडले कुटुंबीयासह गेले होते. त्यांनी बांधकाम विकासकाला घर दाखवण्यास सांगितले. यावेळी एका कर्मचाऱ्याने त्यांना तुम्ही कोणत्या जातीचे आहात असा प्रश्न विचारला. यावर गंडले यांनी आश्चर्य व्यक्त केले. गंडले हे दलितांपैकी असल्याचे समजताच तेथील कर्मचाऱ्याने त्यांना घर दाखवायला टाळाटाळ केली. आम्ही तुम्हाला घर देणार नाही, असे निक्षून सांगत त्याने त्यांना जायला सांगितले.
अशा अनेक घटना सातत्याने घडत असतात. यापुर्वीही असंख्य घडल्या आहेत. त्यापैकी अनेक घटनांत न्यायही मिळालेला नाही. दलित महिलांवरील अत्याचार, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेणे, दलित मुलींना छेडणे, त्यांच्यावर बलात्कार करून खून करणे, प्रकरण दडपून टाकणे, दलित महिलेची धिंड काढणे, एखादा दलित त्याच्याच लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावर बसला म्हणून मारहाण करणे, दलितांनी उच्च शिक्षण घ्यायचे नाही आणि ते घ्यायचे असेल तर सायकल चालवायची नाही, प्रेम प्रकरणातून हत्या, शेती प्रकरणातून महिला बालक पुरुषांना मारहाण किंवा हत्या, चोरी केल्याचे आरोप, पंगतीत जेवला म्हणून मारहाण, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यामुळे नग्न करून मारहाण, वाळीत टाकणे, सामुहिक बहिष्कार घालणे अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. देशभरात आपण विचारही करु शकत नाहीत इतक्या छोट्या मोठ्या घटनेवरून दलितांना लक्ष्य केले जाते. ह्या घटना आजही घडतांना दिसतात. बौद्धांनाही रो हाऊस, फ्लॅट नाकारला जातो. या सर्व दलित असण्याच्या आणि मानण्याच्या मानसिकता आहेत. खैरलांजीचे प्रकरण सर्वांनाच माहित आहे. अख्खे कुटुंबच संपविण्याची हिंमत कुठून येते? मेल्यावरही दलितांना अनेक ठिकाणी अंत्यविधीवाचून अवहेलना पहावी लागते. दलितांवर अन्याय करण्याची, त्यांच्यावर अत्याचार करण्याची गावगाड्यातील पारंपारिक मानसिकता कायम आहे. आपापल्या पायरीने गावखेड्यांची संरचना अजूनही या पद्धतीनेच असल्याचे दिसून येते त्यामुळे अशा घटना घडतच राहतात. एखाद्या घटनेत प्रकरण वाढत जाऊ लागले तर प्रशासनाच्या मदतीने गावातच प्रकरण मिटल्याची दवंडी दिली जाते. सगळं सहन करुन बसावे लागते. अन्याय अत्याचार करुन नंतर मिटवामिटवी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. दलित साहित्यिक, विचारवंत आजही सवर्णांनी दिलेले पुरस्कार घेण्यात धन्यता मानतात. ही मानसिकता कायमची नष्ट झाली पाहिजे तरच ह्या घटनांना आळा बसेल.
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड
मो. ९८९०२४७९५३.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *