जालना ( प्रतिनिधी) : आयात -निर्यात व्यापार वृद्धि, दळण-वळण व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने जालन्या सह मराठवाड्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या दरेगाव शिवारातील ड्रायपोर्ट च्या पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आगामी आठ ते नऊ महिन्यानंतर येथून प्रत्यक्ष वाहतुकीस सुरुवात होईल .त्या दृष्टिकोनातून वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर असलेल्या कंपन्यांचे लक्ष जा लन्याकडे केंद्रित झाले आहे. दळण- वळण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सदस्य यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ड्रायपोर्ट ची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला.
बियाणांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरातून भाजीपाला, कापूस , फळे यांची देशासह, युरोप व जगभरात निर्यात केली जाते. तर स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक दररोज मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेता जालना शहरालगत प्रस्तावित असलेल्या ड्रायपोर्ट साठी १८१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात २५ हेक्टर क्षेत्रावर विकास कामे प्रगती पथावर आहेत. पुढील वर्षी सुरू होत असलेल्या येथील व्यापाराच्या दृष्टीने अ. भा. दळणवळण आणि आयात-निर्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेएनपीटी चे माजी विश्वस्त आशिष पेडणेकर, शिप फॉरवर्डस् कंपनीचे करूनाकर शेट्टी यांनी ड्रायपोर्ट ची प्रत्यक्ष पाहणी केली. येथील व्यापारी आणि उद्योजकांशी स्वा.सै.रामभाऊजी राऊत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संवाद साधला. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी ,संघटन प्रमुख राजेश राऊत, इंदरचंद तवरावाला, कोषाध्यक्ष विजय राठी, जिल्हा निर्यातदार संघटनेचे सदस्य सुबोध मंत्री, सुधीर श्रीसुंदर,जालना मर्चंट बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, कार्याध्यक्ष अर्जुन गेही, दिलीप शाह, सुभाष देवीदान, प्रसिद्धीप्रमुख नागेश बेनिवाल,ड्रायपोर्ट चे कन्सल्टंट शिवा संकेत,सिध्दार्थ नायक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जालना जिल्हा निर्यातदार संघटनेचे सदस्य सुबोध मंत्री यांनी मुंबई येथून मराठवाड्यात दररोज शंभर टँकर तेलाची आयात केली जाते. तसेच जालन्यातील भाजीपाला, सीडस् ची अमेरिका, युरोप सह संपूर्ण जगभरात निर्यात होते. तर कापूस श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशात पाठविला जातो. स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे १०० ट्रक दररोज येतात .असे मंत्री यांनी नमूद केले.
ड्रायपोर्ट मुळे भाजीपाला, कापूस, मका ,ज्वारी, पशुखाद्य ,मोसंबी, सीताफळ ,डाळिंब या फळांची देखील दररोज कोट्यावधी रुपयांची निर्यात होऊ शकेल. असे त्यांनी स्पष्ट केले. अर्जुन गेही यांनी ड्रायपोर्ट च्या सद्य स्थिती बाबत माहिती दिली.
ड्रायपोर्ट च्या १८१ हेक्टर पैकी पहिल्या टप्प्यात २५ हेक्टर क्षेत्रावर अंतर्गत रस्ते, गोदामे ,कंटेनर थांबण्यासाठी ट्रान्सपोर्ट यार्ड, अबकारी कर कार्यालय सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे .कोरोना च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या लॉकडाऊन मुळे या कामांत खंड पडला होता .तथापि आता कामाची गती वाढविण्यात आली . मालवाहतुकीसाठी रेल्वे रूळ अंथरण्याचे कामही सुरू आहे. शिवाय ड्रायपोर्ट ते जालना- औरंगाबाद महामार्गास जोडणाऱ्या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील तीन ते चार दिवसात या रस्त्याच्या कामास प्रारंभ होईल. आगामी आठ ते नऊ महिन्यांत पहिला टप्पा पूर्णत्वास जाऊन येथून प्रत्यक्ष कंटेनर द्वारे निर्यातीस प्रारंभ होईल. अशी माहिती ड्रायपोर्ट चे कन्सल्टंट शिवा शक्ती व सिध्दार्थ नायक यांनी दिली. सुञसंचालन बंकट खंडेलवाल यांनी केले तर विजय राठी यांनी आभार मानले.
स्थानिकांना मोठ्या संधी : आशिष पेडणेकर
वर्षभरात ड्रायपोर्ट उभारणीनंतर स्थानिक लघु, मध्यम उद्योजक, व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना नव्याने व्यवसाय सुरू करण्यास मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याने भूमिपुत्रांनी या संधीचा लाभ घेण्यास आतापासून नियोजन करावे .असे दळणवळण आयात-निर्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेएनपीटीचे माजी विश्वस्त आशिष पेडणेकर यांनी यावेळी सांगितले. पहिल्या टप्प्याची निर्मिती होताच ड्रायपोर्ट परिसरात खाजगी वेअर हाऊस ,वर्कशॉप, हँडलूम ,स्थानिक वाहतूकदार, चहा टपरी, ट्रक थांबण्याची सुविधा, गॅरेज ,मजूर पुरवठादार अशा विविध माध्यमांतून व्यवसाय व रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत. स्थानिक व्यापारी व उद्योजकांनी याचा विचार करून येथील लघु व्यवसायिक, कारागीर यांना प्रोत्साहन द्यावे .असे आवाहनही आशिष पेडणेकर यांनी केले.
पायाभूत सुविधांची गती वाढवावी: विनीत साहनी
जालना येथून मुंबईसह राज्य आणि देशभरात दररोज आयात-निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. येथील व्यापारी व उद्योजकांना निर्यात करताना मोठा आर्थिक भार उचलावा लागतो. आणि वेळही खर्च होतो. शिवाय अबकारी कर पूर्ण होण्यास दोन दिवस जातात. तसेच अपघात, चोरी यांची जोखीम असते. ड्रायपोर्ट मुळे वेळ आणि पैशांची बचत होईल. भविष्यात औरंगाबाद च्या उद्योजकांना लाभ मिळणार असल्याने महत्वकांक्षी असलेल्या या प्रकल्पास शासनाने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करावे. आणि सुविधांच्या कामांची गती वाढवावी अशी अपेक्षा जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी यांनी यावेळी केली.
दुसऱ्या टप्प्यासाठी पाठपुरावा करणार : राजेश राऊत
व्यापार-उद्योग, दळण -वळण आणि रोजगार निर्मिती होऊन विकासाचे चक्र गतिमान होण्यासाठी ड्रायपोर्ट च्या दुसऱ्या टप्प्यातील कामे ही लवकर सुरू व्हावीत यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा संघटन प्रमुख राजेश राऊत यांनी सांगितले.
Leave a Reply