ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जे का रंजले गांजले !

December 6, 202016:50 PM 176 0 0

अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोस्ती जगजाहीर आहे. काही वैद्यकिय उत्पादने अमेरिकेस न पाठवण्याच्या मोदी यांच्या निर्णयाने दुसऱ्या मित्राने दिलेली धमकी आणि त्यानंतर जे झालं ते…. असो. यावर आपल्याला भाष्य करायचं नाही. परंतु अमेरिका हे भांडवलशाही राष्ट्र आहे आणि भारत लोकशाही आणि मिश्र अर्थव्यवस्था असलेला देश आहे हे आपणास अनेक पुस्तकातून अवगत होते.

या देशाचा कणा कृषी क्षेत्राला म्हंटल्या जात असले तरी मोठ्या प्रमाणातील अदृश्य बेकारी या क्षेत्रात आजही कायम आहे. मग हेच बेकारांचे लोंढेच्या लोंढे पोटाची आग विझवण्यासाठी ग्रामीण भारतातून इंडियातल्या शहरात येत असतात. तिथल्या गगनभेदी इमारतीत वास्तव्य करणं त्यांच्या नशीबी तर नसतच पण या इमारतींच्या आजुबाजूला असलेल्या झोपडपट्टीवजा भागात त्यांना झोपड्या किरायाने घेऊन मिळेल ते काम करावं लागतं आणि संसाराचा गाडा हाकावा लागतो. दहा बाय दहाच्या खोलीत कोंबुन कोंबुन राहणारे बॅचलर कामगार किंवा त्याच आकाराच्या खोलीत आठ – दहा जणांचं कुटूंब हे फक्त मुंबईतल्या भैयांचंच जगणं नाही तर जालन्यासारख्या ठिकाणीही हे भैय्ये (परप्रांतीय) लोकं असं कोंबुन कोंबुन राहतातच. काल औरंगाबादजवळ झालेल्या रेल्वे अपघातात चिरडले गेलेले मध्य प्रदेशातील १६ मजुर यांच्या नशीबीही तेच जगणं होतं.

कोरोना महामारीने भारतात आणलेल्या लाॅकडाऊनचा काळ टप्प्या टप्प्याने वाढत गेला आणि घरदार सोडून पोटासाठी दूर गेलेल्या गरिबांची असुरक्षितताही वाढली. या काळात त्यांना अन्न-पाणी देऊन अनेकांचा समाजकार्याचा एक इव्हेंटही पुर्ण झाला असेल. परंतु सरकार म्हणुन नरेंद्र मोदी व इतर राज्य सरकारांनी जे काय दिवे लावलेत त्याचा प्रकाश फेसबुक, इन्स्टाग्रामच्या भिंती भेदून पायपीट करणाऱ्या विस्थापीत मजुरांच्या मनापर्यंत पोहोचला नाही हे आमचे दुर्भाग्य! जनतेचा पैसा लुटून थंड हवेच्या ठिकाणी आनंद घ्यायला जाणाऱ्या वाधवान कुटूंबाला किंबहुना  त्यांच्यासारख्या अनेकांना इच्छितस्थळी पोहचवून सरकार वा त्यांच्यातील चमच्यांनी त्यांच्या मीठाला जागल्याची चुनुक दाखवली.

परंतु ज्यांच्या तळहातावर अर्थव्यवस्थेचं ओझं ठेऊन आंधळ्या प्रजेला महासत्तेचं दिवास्वप्न दाखवलं जातं त्या हजारो श्रमीकांना रखरखत्या उन्हात हजारो किमीची पायपीट करीत घर गाठावं लागणं. त्यांच्या आयुष्याला पडलेल्या भेगाप्रामणे चालुन चालुन पायालाही भेगा पडणं. पायपीट करताना वाहनाखाली येऊन चिरडून मरणं अथवा रेल्वेखाली शरीराचे तुकडे होऊन सोबतच्या शिदोरीसारखं विखरणं! गर्भवती महिलेची रस्त्यावर एखाद्या झाडाखाली पतीने प्रसुती करणं, तीच्या रक्तस्त्रावानं कपडे रंगुन जाणं हे या देशाच्या महासत्तेकडील प्रवासाचं द्योतक समजायचं की गत काही वर्षात विकसनशील देशांच्या यादीतून मागासांच्या यादीत नाव नोंदवून घेतल्याचं बक्षीस? कि या देशातल्या गरीब विस्थापीतांशी तुमचं माणुसकीचही नातं नसल्याचं उदाहरण? माणुस म्हणुन काय बोध घ्यावा यातून?

जे का रंजले वा गांजले
त्याशी म्हणे जो आपुले
तोची साधु ओळखावा
देव तेथेची जाणावा…!

संसदेत वा अनेक राज्यांच्या सभागृहात अनेक तथाकथित साधू लोकप्रतिनिधी आहेत. परंतु त्यांची नाळ या देशातील श्रमीक रंजल्या गांजलेल्या वर्गाशी नव्हे तर येथील धन दांडग्यांशी जोडलेली आहे यासारखं मोठं दुःख नाही. हेच या देशाच्या विदारक अवस्थेचं प्रतिबिंब आहे. ज्यांचा नेता ईश्वराचा अवतार आहे! किमान त्याने तरी या रंजल्या गांजल्यांचा अखेरचा प्रवास रक्तरंजीत करायला नको होता.

 

साहिल पाटील, जालना
मो.9764349468
(लेखक हे पत्रकार आहेत.)

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *