ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिंकलस पोरी

July 25, 202118:34 PM 38 0 0

भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक मध्ये शनिवारी झालेल्या ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण २०२ किलो वजन उचलून आपले ऑलिम्पिक पदक पक्के केले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाई चानूने मेडल जिंकताच संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मीराबाईच्या घवघवीत यशानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. याच बरोबर ऑलिम्पिक खेळाडूंकडून देशाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. मीराबाईने अनेकवेळा देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे या वेळी ती भारताला पदक मिळवून देईल, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि ती खरी ठरली. मीराबाईचा जन्म इंफाळपासून २२ किमी दूर असणाऱ्या नोंगपोक काकचिंग गावात गरीब परिवारात झाला होता. तिच्या कुटुंबात सहा भावंड होती. लहानपणापासूनच तिला तिरंदाजी मध्ये करिअर करायचं होतं, पण आठव्या इयत्तेत असताना तिने वेटलिफ्टिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. इम्फाळची वेटलिफ्टर कुंजराणीला पाहून आपणही वेटलिफ्टर व्हावं, अशी इच्छा मीराबाईला झाली. मीराबाईच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली.

२००६ मध्ये तिने सराव सुरू केला तेंव्हा लोखंडाचा बार नसल्यानं ती बांबूच्या बारनं सराव करत असे. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईला तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबली नाही. मीराबाईला वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन प्रशिक्षण केंद्रात जावं लागायचं. तिथून आल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास यातच संपूर्ण दिवस निघून जायचा. वयाच्या ११ व्या वर्षी मीराबाई अंडर १५ चॅम्पियन होती आणि १७ व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुराणी यांना बघत मीराबाईच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजुराणी यांचा १२ वर्षं जुना विक्रमम मीराबाईने मोडीत काढला. १९२ किलो वजन उचलून. असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईच्या आई-वडिलांजवळ पुरेशी साधनसंपत्ती नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ
सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती. पण ही वेळ आली नाही. २०१४ च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. या प्रकारातील सुवर्णपदकही भारताच्या खात्यात आले होते. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत मीराबाईने तिची आयडॉल असलेल्या कुंजराणीचा पराभव केला आणि ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान पक्के केले. मीराबाईला आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. मीराबाई चानूने शनिवारी इतिहास घडवला पण हे ध्येय गाठणं सोपं नव्हतं, यामध्ये तिने बालपणी केलेले कष्ट आहेत, कठोर मेहनत आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, चानू देखील वयाच्या बाराव्या वर्षी तिच्या\ मोठ्या भावापेक्षा जास्त वजनाची लाकडं गोळा करत असे. लहानपणी घेतलेले हे कष्ट आज तिच्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. अमेरिकेत ५० दिवसांची ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तिने थेट टोकियो गाठलं होतं. मात्र हे कष्ट केवळ पन्नास दिवसांचे नाहीत, तर रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या

पराभवापासूनचे आहेत. रियो ऑलिम्पिक २०१६ मध्ये तिने विशेष कामगिरी केली नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली होती. ऑलिम्पिकसारख्या खेळात प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली तर वेगळी गोष्ट आहे. पण खेळाडू त्याचा खेळ पूर्णच करू शकला नाही तर ती गोष्ट खेळाडूच्या मानसिक धैर्याला धक्का पोहोचवणारी असते. २०१६ मध्ये मीराबाईबरोबरही असंच झालं होतं. ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशी दुसरी खेळाडू होती जिच्या नावासमोर डिड नॉट फिनिश असं लिहिलेलं होतं.जे वजन मीराबाई सराव करताना सहजपणे उचलत असे, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू तिचे हात जखडले होते. त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे हे खूप कमी भारतीयांनी बघितलं. सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरली. त्यावेळी मीराबाई चानूला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली होती. याकाळात ती
नैराश्याचा सामना करत होती. दर आठवड्याला तिला मानसिक तज्ञांकडून उपचार घ्यावे लागले. वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. मात्र त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. नैराश्यावरही मात करुन मीराबाईनं दमदार पुनरागमन केलं. २०१७ मध्ये वर्ल्ड चँपियनशिप आणि साल २०१८ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिनं सुवर्णपदकजिंकलं. टोकियोमध्ये तिने इतिहास रचला. पुन्हा एकदा तिने भारताचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी मीराबाई दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यासोबतच वेटलिफ्टिंमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी देखील ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी २००० साली सिडनी
ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं कांस्य पदकाची कमाई केली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत तिने भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. टोकियो ऑलिम्पिक२०२०स्पर्धेतभारतासाठी पहिलं पदक जिंकल्याबद्दल मीराबाई चानूच अभिनंदन !

– सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *