जालना : येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेली जालना नगर परिषदेची निवडणूक लढण्याचा निर्णय पत्रकार विकासकुमार बागडी यांनी जाहीर केला असून नागरीकांचे रस्ते, नाली आणि वीजेशिवायही अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न असून ते सोडवण्यावर आपण भर देणार असल्याचे श्री. बागडी यांनी म्हटले आहे.
या संदर्भातील प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत अनेक पुढार्यांनी नगर पालिकेची निवडणूक लढतांना नागरीकांना केवळ रस्ते, नाली आणि वीजेचा प्रश्न सोडण्याचे आश्वासन दिले जाते मात्र याशिवायही नागरीकांच्या जगण्याचा प्रश्न महत्वाचा असून तोच सोडवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. पत्रकारितेमुळे आपला विविध शासकीय कार्यालयाशी संबंध आलेला आहे. अनेक योजनांची माहिती आपल्याला आहे. बेरोजगार युवकांसाठी महिला व बाल कल्याण, घरकुल याशिवाय जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फतही अनेक प्रकारच्या अनुदानित योजना असल्या तरी या संदर्भात ना नागरीकांना माहिती आहे ना बेरोजगार युवकांना! त्यामुळे या सर्व योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न आपण आपल्या परिचयामुळे जरुर करुन देऊ शकतो. जिल्हा उद्योग केंद्र, विविध प्रकारच्या बँकांमार्फतही अनुदानीत कर्ज दिले जाते परंतू याची माहिती किती जणांना आहे? अनुदानीत योजनांचे प्रस्ताव तयार करुन देण्यापासून ते मंजूरीपर्यंत आपण स्वत: नागरीक व बेरोजगार युवकांना मदत करणार आहोत. नागरीकांसाठी हा अत्यंत निकडीचा प्रश्न आहे, असे सांगून श्री. बागडी म्हणाले की, आज काल नागरीकांना सार्वजनिक प्रश्नांपेक्षाही वैयक्तीक आणि लाभाचे प्रश्न सोडवण्याची गरज वाटते. तीच जर का पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असेल तर नागरीक आपल्याला निश्चितच पसंती देऊन विजयी करतील, असा विश्वासही श्री. बागडी यांनी पत्रकाच्या शेवटी व्यक्त केला आहे.
Leave a Reply