जालना : शहरातील नुतन वसाहत भागातील नागरी शहरी आरोग्य केंद्र हरवल्याची तक्रार जनता व पोलीस समन्वय समितीने कदीम जालना पोलीस ठाण्यात दिल्याने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील नुतन वसाहत भागातील नागरी शहरी आरोग्य केंद्र अनेक वर्षापासून हरवल्याने नुतन वसाहत सह आसपासच्या परिसरात राहणार्या नागरीकांना व लहान बालक, गदोरमातांना प्राथमिक उपचारापासून वंचित रहावे लागत आहे. परिणामी नागरीकांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी खाजगी दवाखान्याकडे जावे लागत असल्याने सावकाराकडून पैशांची उचल घेऊन कर्जबाजारी होण्याची वेळ येते.
आरोग्य विभागाची यंत्रणा बघ्याची भूमिका निभावत असल्याने जनता व पोलीस समन्वय समितीचे जालना सहसमन्वयक ईश्वर बिल्होरे यांनी जनहितास्तव कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे रितसर लेखी तक्रार देऊन सदरील मंजूर आरोग्य केंद्राचा शोध घेण्याची विनंती केली आहे. सदरील तक्रार अर्ज स्वीकारतांना पो. नि. महाजन म्हणाले की, पोलीस गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी खाकीवर्दी सर्वात पुढे असते. तसेच लोकांच्या मुलभूत हक्कावर कुणी गदा आणत असेल तर पोलीस प्रशासन सक्षमपणे जनतेच्या पाठीशी असल्याचे म्हटले. या प्रसंगी कदीम पोलीस ठाण्याचे कैलास जावळे यांच्यासह जनता व पोलीस समन्वय समितीचे सदस्य अशोक भगुरे, संतोष काठोठे, इतर सदस्य गण उपस्थित होते.
Leave a Reply