ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात ति. अण्णांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त प्रा. निरंजन फरांदे लिखित साद अण्णांना हे भावस्पर्शी पत्र

September 21, 202116:40 PM 61 0 0

साद अण्णांना……
निरंजन बाळासाहेब फरांदे. सातारा
ति. अण्णा…….
हल्ली तुमची वारंवार आठवण येते…
अण्णा , जाणिवांनी प्रगल्भ आणि संवेदनशील असणं, हा शाप आहे ! त्यात वाचत राहणं आणि त्यामुळे इतिहास-वर्तमानातली विसंगती दिसणं , हे तर खूपच वाईट.
सततची अस्वस्थता येते वाट्याला त्यामुळं.
प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचे “उमलत्या पिढीच्या हातात महापुरुषांची चरित्रे दिली पाहिजेत, म्हणजे हे दीपस्तंभ आदर्श समाज घडवतील..”
पण हल्ली महापुरुषांचे विचार सोईनं वापरण्याची पद्धत आलीये. ताटात चवीपुरतं मीठ, तसं आयुष्यात अगदी थोडेच आदर्श.. जाती शोधून महापुरुष फॉलो केले जातात अलीकडे. मग जातींच्या अस्मिता तीव्र होत जातात अन् विचारांची माती होते.
आज काळ खूप बदलाय म्हणतात. गतिमान झालाय तो. ‘मी आणि माझं’ याच्या पलीकडे कोणी पाहतच नाही.
अण्णा , तुम्ही तुमचं सोडून सगळ्या समाजाचं का बरं पाहिलं त्या काळात ?
परवा विद्यापीठाची एक प्रवेश परीक्षा होती. कॉलेज गेटवर भयंकर गर्दी. पालक आपल्या मुलांना घेऊन आलेले. परीक्षेची वेळ झाल्यावर गेट उघडलं. परीक्षेचा नंबर शोधायला सगळ्यांची तारांबळ. कळपातनं चुकून एखादं पिल्लू कावरं-बावरं व्हावं, भरकटाव तसं एक साध्या कपड्यातलं पोरगं हातात परीक्षेचं रिसिट घेऊन नंबर शोधत आलं. त्याच्या पाठोपाठ मध्यम वयातला र्‍यापैकी मध्यमवर्गीय गृहस्थ आपल्या मुलीला परीक्षेसाठी घेऊन आला.


मुलाला परीक्षा नंबरच सापडेना. त्याला घाबरून घाम फुटलेला. त्यांचं ओळखपत्र बघितलं तर तो गावाकडचा, अगदी छोट्या खेड्यातला. त्याला समजून सांगेपर्यंत मागून आलेल्या या गृहस्थांनी “त्याच सोडा, आमचं बघा” म्हणून तगादा लावलेला.‌ त्यांना म्हटलं, थोडं थांबा. परीक्षेला वेळ आहे अजून. याला नंबर शोधून देतो. तो ग्रहस्थ म्हणे, “ए मुला , तू जरा थांब परीक्षेला वेळ आहे अजून”.
सर, “त्याचं जाऊद्या, माझ्या मुलींचं आधी बघा. तिला एकदा जागेवर बसवलं की मी निश्चिंत.”
मुलांना परीक्षेला बसवून माघारी फिरताना त्याला सहज विचारलं, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, कुठं ? “आहो, मी शिक्षक नाही का ?” अमुक अमुक शाळेवर…
मी स्तब्ध.
अण्णा , तुम्ही महाराष्ट्रभर पायी फिरायचा. शिक्षणासाठी खांद्यावर बसून लहान लहान पोरं साताऱ्याला आणायचा. ती ना तुमच्या जातीची असायची, ना नात्याची. पण ती तुमची लेकरं म्हणून तुम्ही पोटाशी लावायचा.
पण अण्णा स्वतःच्या मुलाला आप्पासाहेबांना मात्र तुम्ही शिक्षणासाठी नातेवाईकांकडे ठेवलं होतं. स्वतःचं घर सोडून या महाराष्ट्राचा सामाजिक संसार मांडताना तुम्ही पोटच्या मुलांकडे क्षणभरही आसक्त झाला नाही. हे इतकं निस्वार्थ जगणं कसं जमलं तुम्हाला ?
आज बघेल तिकडं फक्त स्वार्थ-स्वार्थ-स्वार्थ , त्रिवार स्वार्थ….
कोरोनाची लस घ्यायला उभी असलेली रांग असो किंवा सरकारी ऑफिसच्या बाहेर कागदपत्रांसाठी उभी असलेली रांग. भयंकर हपापलेपण. आपल्या कृतीत असलेली अर्थशून्यता आम्हाला का कळत नाही ?
कोरोनाकाळात ऑनलाइन शिकवणं आणि वर्क फ्रॉम होम असताना शिक्षकांनी दिवाळीच्या सुट्टीसाठी हट्ट करणं हे सुद्धा तसं पाशवीच आहे. तुमच्यासारख्या महापुरुषांनी जगण्या-वागण्यातून उभे केलेले नैतिकतेचे उच्च आदर्श धडाधड जमीनदोस्त व्हायला लागलेत अण्णा.
अण्णा तुम्ही कवलापूरसारख्या खेड्यातनं गुडघ्या एवढ्या पांडुरंग पाटलाला खांद्यावर बसून साताऱ्याला आणलं. इथेच मोठा केला आणि बॅरिस्टर करायला इंग्लंडला पाठवलं. तोच पोरगा बॅ. पी. जी. पाटील होऊन मोठ्या पगाराच्या नोकऱ्या, सुखी श्रीमंती परदेशी जीवन सोडून पुन्हा तुमच्या पायाशी आला. रयतेचा शिक्षक झाला. केवढी तत्त्वनिष्ठा होती ती.
मी शोधत असतो आज हे समाज घडवणारं शिक्षकाचं आत्मबळ. पण नजर उपाशीच राहते.
वर्तमानात आरक्षणाचे प्रश्न भयंकर पेटलेत अण्णा. तुम्ही रयतेचं पहिलं कॉलेज काढलं, त्याला नाव दिलं – छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. तुमच्या मनात महाराष्ट्रऐक्य घडवणारं शिवरायांचं शिवतत्त्व होतं. त्याला फुले-शाहूंच्या वैचारिकतेचा भक्कम आधार देऊनन महर्षी शिंदे- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांती विचारांच्या धाग्यांनी अण्णा तुम्ही महाराष्ट्राचे सामाजिक समतेची वीण घट्ट केली.
पण आज तुमच्या या जातिअंताच्या- समतेच्या विचाराला पार मुठमाती दिली जातेय. समतेवर कोणी बोलतच नाही. अगदी शिक्षकही नाही. उलट जातीवर बोलतात सगळे. बघता बघता जातीयवादीच झालेत सगळे.
अण्णा तुम्ही लहान होता. मित्रांबरोबर खेळता-खेळता तुमच्या एका मित्राला तहान लागली. सार्वजनिक विहिरीवर त्याला कोणी पाणी पिऊ दिलं नाही. तुम्हाला या भेदाभेदाचा राग आला. त्या विहिरीचा तुम्ही रहाटच मोडून टाकला. अगदी नकळत्या वयात विषमतेवर प्रहार करणारा हा मानवतावाद तुमच्यात कुठून आला ? पुढे गांधीहत्येनंतर समाजात जाळली जाणारी उच्चवर्णीयांची घर तुमच्या रयतेतल्या पोरांनीच वाचवली. तुम्ही आयुष्यभर परिवर्तनाचं केवढं चाक फिरवलंत.
हे चाक आज उलटं फिरायला लागलंय अण्णा.
आज अनुदानित विनाअनुदानित शाळांचा बाजार दिसतोय समाजात. शिक्षणसुद्धा आधुनिक झालंय. पण या सुटाबुटातल्या शिक्षणाला तुमच्या वटवृक्षाच्या छायेत पारावर भरणाऱ्या शाळेची सर नाही. ना तुम्ही शिकवलेलं मानवतेचं गीत.
अण्णा, साताऱ्याच्या वसतिगृहात एका आड्याखाली रात्री राहिलेल्या शिळ्या भाकरीचे तुकडे पेढे म्हणून खाणारी आणि तुमच्या उबीला वाढलेली समता-बंधुता-स्वावलंबन या त्रिसूत्रीत घडलेली ती पिढी खरंच महान होती.
समाजाच्या सर्व बाजूंनी अराजकतेचा भेसुरध्वनी कानी पडत असताना आम्हाला तुमच्याच विचारांकडे यावे लागेल अण्णा. कारण तुम्ही घालून दिलेल्या वाटेनेच आमचे कल्याण आहे…..

प्रा.निरंजन बाळासाहेब फरांदे
 महिला कॉलेज,सातारा

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *