बीड: जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ड्रायव्हरला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय घडलं?
शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.
व्हायरल व्हिडीओत काय?
दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
शर्मांची तक्रार
परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.
भीमसैनिकांची घोषणाबाजी
दरम्यान, आंबाजोगाई कोर्टाबाहेर भीमसैनिकांनी शर्मा यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शर्मा या शहरातून आल्या आहेत. त्या परळीत कुणाला ओळखत नाहीत. कोण कोणत्या जातीचा आहे हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे त्या कुणाला जातीवाचक शिवीगाळ कशा देतील? दलित समाजाला पुढे करून शर्मा यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलं असून हे चुकीचं आहे. दलित समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून अॅट्रोसिटी कायद्याचाही गैरवापर असल्याचं भीमसैनिकांनी म्हटलं आहे.
Leave a Reply