ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून देणारा तरुण क्रांतीकारक – खुदीराम बोस

August 10, 202113:25 PM 64 0 0

खुदीराम बोस ! भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर. हिंदुस्थानवर जुलमी सत्ता गाजवणार्‍या ब्रिटीश साम्राज्यावर ज्यांनी अलौकिक धैर्याने पहिला बॉम्ब फेकला, शालेय जीवनातच वन्दे मातरम् या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी भारतभूच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले त्या खुदीराम बोस यांचा 11 ऑगस्ट या दिवशी बलिदानदिन साजरा केला जातो. 11 ऑगस्ट 1908 या दिवशी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी हातात भगवद्गीता घेऊन खुदीराम बोस यांनी फाशीच्या खांबाला आलिंगन दिले.

  1. खुदीराम बोसने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करणे !

काळ होता 1903 चा ! बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने निश्‍चित केले. त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला. देशासाठी काहीतरी करावे, असे सारखे वाटू लागल्याने मेदिनीपूर येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरुद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या.

  1. राजद्रोहाच्या आरोपातून निर्दोष सुटणे

फेब्रुवारी 1906 मध्ये मिदनापूर येथेे एक औद्योगिक आणि शेतकी प्रदर्शन भरले होते. हे प्रदर्शन पहाण्यास आजूबाजूच्या प्रांतांतून शेकडो लोक येऊ लागले. बंगालमधील एक क्रांतीकारक सत्येंद्रनाथ यांनी लिहिलेल्या सोनार बांगला या जहाल पत्रकाच्या प्रती खुदीराम यांनी या प्रदर्शनात वाटल्या. पोलीस शिपाई त्यांना पकडण्यासाठी धावला. खुदीराम यांनी या शिपायाच्या तोंडावर ठोसे मारले आणि शिल्लक राहिलेली पत्रके काखेत मारून ते त्याच्या हातून निसटून गेले. या प्रकरणी राजद्रोहाच्या आरोपावरून सरकारने त्यांच्यावर अभियोग भरला; परंतु खुदीराम त्यातून निर्दोष सुटले.

  1. न्यायाधीश किंग्जफोर्डला ठार मारण्याच्या कामगिरीसाठी निवड होणे

मिदनापूर येथे युगांतर या क्रांतीकारकांच्या गुप्त संस्थेच्या माध्यमातून खुदीराम क्रांतीकार्यात ओढले गेले. वर्ष १९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. या फाळणीच्या विरोधात असणार्‍या अनेकांना त्या वेेळचा कलकत्त्याचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याने क्रूर शिक्षा ठोठावल्या होत्या. अन्य प्रकरणांतही त्याने क्रांतीकारकांना खूप छळले होते. याच सुमारास किंग्जफोर्डला बढती मिळून तो मुझ्झफरपूर येथे सत्र न्यायाधीश म्हणून कामावर रुजू झाला. सरतेशेवटी युगांतर समितीच्या एका गुप्त बैठकीत किंग्जफोर्डलाच ठार मारायचे ठरले. यासाठी खुदीराम आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची निवड करण्यात आली.

खुदीराम यांना एक बॉम्ब आणि पिस्तूल देण्यात आले. प्रफुल्लकुमार यांनाही एक पिस्तूल देण्यात आले. मुझ्झफरपूरला आल्यावर या दोघांनी किंग्जफोर्डच्या बंगल्याची टेहळणी केली. त्यांनी त्याची चारचाकी आणि तिच्या घोड्याचा रंग पाहून घेतला. खुदीराम तर त्याच्या कार्यालयात जाऊन त्याला नीट पाहूनही आले.

30 एप्रिल 1908 या दिवशी हे दोघे नियोजित कामगिरीसाठी बाहेर पडले आणि किंग्जफोर्डच्या बंगल्याबाहेर घोडागाडीतून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले. बंगल्यावर टेहळणीसाठी असलेल्या दोन गुप्त अनुचरांनी त्यांना हटकले; पण त्यांना योग्य ती उत्तरे देऊन ते तेथेच थांबले.

  1. हिंदुस्थानातील पहिला बॉम्ब फेकण्याचा बहुमान मिळणे

रात्री साडेआठच्या सुमारास क्लबकडून किंग्जफोर्डच्या गाडीशी साम्य असणारी गाडी येतांना दिसताच खुदीराम गाडीमागून धावू लागले. रस्त्यावर खूपच अंधार पडला होता. गाडी किंग्जफोर्डच्या बंगल्यासमोर येताच त्यांनी दोन्ही हातांनी बॉम्ब वर उचलला आणि नेम धरून अंधारातच पुढील चारचाकीवर जोराने आदळला. हिंदुस्थानातील या पहिल्या बॉम्बस्फोटाचा आवाज त्या रात्री तीन मैलांपर्यंत ऐकू गेला आणि काही दिवसांतच त्याचा आवाज इंग्लंड, युरोपलाही ऐकू गेला.

खुदीराम यांनी किंग्जफोर्डची गाडी समजून बॉम्ब टाकला होता; पण त्या दिवशी तो थोड्या उशिराने क्लबबाहेर पडल्यामुळे वाचला. दैवयोगाने गाड्यांच्या साधर्म्यामुळे दोन युरोपियन महिलांना आपले प्राण गमवावे लागले. रातोरात खुदीराम आणि प्रफुल्लकुमार दोघेही २४ मैलांवरील वैनी रेल्वे स्थानकापर्यंत अनवाणी धावत गेले.

  1. धैर्याने आणि आनंदी वृत्तीने फाशी जाणे

दुसर्‍या दिवशी संशयावरून प्रफुल्लकुमार चाकी यांना पोलीस पकडण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि प्राणार्पण केले. खुदीराम यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेचा शेवट ठरलेलाच होता. 11 ऑगस्ट 1908 या दिवशी भगवद्गीता हातात घेऊन खुदीराम धैर्याने आणि आनंदी वृत्तीने फाशी गेले.

किंग्जफोर्डने घाबरून नोकरी सोडली आणि ज्या क्रांतीकारकांना त्याने छळले, त्यांच्या भीतीने तो लवकरच मरण पावला, त्याचे नावनिशाणही उरले नाही.

खुदीराम मात्र मरूनही अमर झाले !!

 

संकलक : कु. प्रियांका लोणे,

समन्वयक, हिंदू जनजागृती समिती,

संभाजीनगर-जालना  

संपर्क क्र.: 8208443401

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *