जालना(प्रतिनिधी) क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचे धाडस केले.त्यांच्या या दूरदृष्टी मुळेच आज महिलांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे समन्वयक तथा भाजपचे गटनेते अशोक पांगारकर यांनी आज येथे बोलतांना केले. जालना जिल्हा ओबीसी महिला मोर्चाच्या वतीने भगवानसेवा मंगलकार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ओबीसी मोर्चा संयोजन समितीचे संयोजक राजेंद्र राख,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळबांडे,प्रा.सत्संग मुंढे,प्रा.रेणुका भावसार,कपिल दहेकर,दीपक दराडे,सुहास मुंढे,डॉ.धानुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना पांगारकर म्हणाले की,ज्या काळात महिलांना घराचा उंबरठा ओलांडून घराबाहेर पडण्याची परवानगी नसायची अशा काळात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यासाठी केलेला संघर्ष आजही सर्वांच्या स्मरणात आहे.
त्यावेळी झालेली टीका आणि आरोपांकडे दुर्लक्ष करून सावित्रीमाई यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. यासाठी सावित्रीमाई यांना क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचे पाठबळ अत्यंत मौलाचे ठरले. या दापंत्यांनी स्त्री शिक्षणासाठी कठोर परिश्रम घेतल्यामुळेच आज विविध क्षेत्रात महिला आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे असेही पांगारकर शेवटी म्हणाले.यावेळी राजेंद्र राख,प्रा.सत्संग मुंढे,संजय काळबांडे, प्रा.रेणुका भावसार यांनीही आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा उहापोह केला. याप्रसंगी उपस्थित महिला व छोट्या मुलींनी सावित्री माईच्या जीवन कार्यासह महिलांसंदर्भात आपले विचार मांडले. ’सावित्रीमाईंचा विजय असो’ जय ज्योती जय सावित्री अशा घोषणांनी सर्व सभागृह दणाणून गेले होते. सर्व महिला मंडळांनी प्रतिवर्षी ’सावित्री उत्सव’ साजरा करण्याचा संकल्प केला व पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होईल याचे नियोजन केले.सावित्री उत्सव साजरा झाल्यानंतर 24 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी व्हीजेएनटी एनटी एसबीसी मोर्चा यशस्वी करण्यासाठी महिलांनी बैठक घेतली.यावेळी उपस्थित महिला पदाधिकार्यांनी नियोजित ओबीसी मोर्चाच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करून या मोर्चात जास्तीत जास्त महिला आणि युवतींचा सहभाग वाढवण्यासाठी जालना शहर व जिल्ह्यात घरोघरी जाऊन ओबीसी जनगणने बाबतचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार उपस्थित महिलानी केला. तसेच ओबीसी समाजाची जनगणना झाली नाही तर आमचा जनगणनेत सहभाग नाही अशी पाटी घराबाहेर लावण्याचा संकल्प करण्यात आला.ओबीसी समाजाच्या जणगणनेसह इतर मागण्यांसंदर्भात प्रबोधन करण्यासाठी महिला पुढाकार घेतील असा विश्वास व्यक्त करून येत्या 24 जानेवारी रोजी आयोजीत विशाल मोर्चात ओबीसी व्हिजे एनटी, एस बीसी समाजातील घरातील प्रत्येक लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत,शेजारी, नातेवाईक सहभागी होतील असा संकल्प महिलांनी केला.यावेळी ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply