जालना (प्रतिनिधी) : जालना शहर व विधानसभा मतदार संघातील कोव्हीड लसीकरण केंद्रामध्ये कोव्हीड लसीचा मोठ्या प्रमाणात तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांची विशेष करुन वयोवृद्ध लोकांची मोठी तारांबळ उडत असल्याची बाब महाराष्ट्र विधीमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आ. कैलास गोरंट्याल यांनी आज राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणुन देत लस तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
जालना शहर व जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून राज्य शासनाने 45 वर्षा वरील नागरीकांसाठी लसिकरण मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जालना शहर व जिल्ह्यात कोव्हिड शिल्ड आणि कोव्हॉक्सीन अशा दोन लसी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या होत्या. जालना शहरासह विधानसभा मतदार संघातील अनेक लसिकरण केंद्रावर 45 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरीकांनी कोव्हिड शिल्ड लसिची पहिली मात्रा महिनाभरापुर्वी घेतली आहे. सदर नागरीकांची दुसरी मात्रा घेण्याची मुदत संपल्यानंतरही केंद्रावर कोव्हिड शिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे हजारो लाभार्थ्यांना लसिच्या दुसऱ्या मात्रापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच अनेक नागरीक नव्याने लसिचा पहिला मात्रा घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत असले तरी लसिच्या मात्रा उलब्ध नसल्यामुळे अनेकांना केंद्रावरून परतावे लागत आहे. कोव्हिड लसिच्या तुटवड्याबाबत अनेकांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी संपर्क साधून तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आ. गोरंट्याल यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा सरकारी रूग्णालयातील संबंधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोव्हिड लसिसंदर्भात विचारणा केली आणि त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेश टोपे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कोव्हिड लसी संदर्भात त्यांच्याशी विस्तृत चर्चा करत कोव्हिड लसीचा निर्माण झालेला तुटवडा तात्काळ दुर करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. याबाबत गांभीर्याने दखल घेवून आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी सदर लस लवकरच उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांना दिली.
Leave a Reply