जालना/प्रतिनिधी – भाषा म्हणजे प्रत्येकाचा श्वास आहे. त्याचबरोबर भाषा एक संवाद असून, भावना पोहचवण्याचे ते एक साधन आहे. शब्दांची देवाण-घेवाण होते, तेव्हांच भाषा फुलते. भाषेला शुध्द अशुद्धतेत अडकवू नका, असा सल्ला हिंदी, मराठी, गुजराती, संस्कृत या देशीसह २२ परकीय भाषा अस्खलित बोलणाऱ्या अमृता जोशी यांनी दिला. रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित शारदोत्सव या व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफताना अमृता जोशी बोलत होत्या. या व्याख्यानमालेत रोटरी क्लब चे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपावले, प्रांतपाल नॉमिनी स्वाती हेरकर, महिला सबलीकरण संचालक महानंदा सोनटक्के, उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया, रोटरी क्लब ऑफ अकलुजचे अध्यक्ष सी.ए. नितीन कुदाळे, सचिव गजानन जवंजाळ, रोटरी क्लब ऑफ वाईचे डॉ. प्रेरणा ढोबळे, सचिव तथा अध्यक्ष दिपक बगाडे, रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष अॅड. महेश धन्नावत व सचिव प्रशांत बागडी, जालना रोटरीचे अध्यक्ष महेंद्र बागडी व सदस्य मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते.
मातृभाषेशिवाय इतर भाषा शिकणे थोडे आव्हानात्मक असतेच. शाळेत आपण 3-4 भाषा शिकतो. त्यापुढे जात नाहीत. अमृता जोशी यांचे तब्बल 22 भाषांवर प्रभुत्व आहे. नवीन भाषा कशी सहजतेने शिकावी, त्यातील गमती जमती, आणि या भाषा कौशल्यामुळे त्यांना समृद्ध करून देणारे अनुभव सांगून त्यांनी संवाद साधला. आहेत. अमृता जोशी पुढे म्हणाल्या की, मातृभाषेशिवाय इतर भाषा, विदेशी भाषा शिकणे बालपणीच सुरू करावे का ? असा प्रश्न अनेकजण विचारतात. तसे पाहिल्यास भाषा शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. आपल्याला सहसा आठवीत जातांना मातृभाषेशिवाय अन्य एका भाषेची निवड करता येते. घरातील वातावरणामुळे थोडीफार संस्कृत भाषा येत होती. सहसा आपल्याकडे हिंदी, संस्कृत किंवा पाली यापैकी एक भाषा निवडली जाते. मात्र, मी आठवीत फ्रेंच भाषेची निवड केली. इंग्रजीत चांगले गुण असतील तरच फ्रेंच भाषा निवडता येते. प्रारंभी या भाषेत शब्दाचा धड उच्चार करता येत नव्हता. एक शब्दही बोलता येत नव्हता. हळूहळू जमत गेले. दहावीनंतरच्या सुटीत जर्मन भाषा शिकण्यास सुरुवात केली, जर्मन यायला लागल्यानंतर चीनी भाषेचे आकर्षण निर्माण झाले. यानंतर जापानी भाषाही शिकले, असे सांगून आजघडीला आपणास २२ विदेशी भाषा अवगत असल्याचे त्या म्हणाल्या.
विविध परकीय भाषा अवगत असल्याने आपणास अर्थाजर्नाचा मार्ग सापडला. आज कार्पोरेट क्षेत्रात भाषांतरकार म्हणून तसेच इतर भाषा शिकवण्याचे क्लासेस घेते. कोणत्याही भाषेचा अभ्यास केल्यास व्याकरण समजते आणि व्याकरण समजले म्हणजे त्या भाषेत बोलता येते. गुगल ट्रान्सलेटरपेक्षा ह्यूमन ट्रान्सलेटर 1 टक्का वरचढच असतो. प्रत्येकाची मातृभाषा ही समृद्धच असते. नुसती भाषा शिकून उपयोग नाही, बोलता आली तरच फायदा होतो. त्या भाषेत कुणी बोलणारा नसेल तर मनाशी बोला, असे अमृता जोशी म्हणाल्या. संस्कृतचेच उदाहरण घ्या ना. ती आपण बोलायला शिकत नसल्याने ती देवी-देवतांचे पाठ आणि मंत्रापुरतीच मर्यादीत राहिलेली आहे. भाषा ही गप्पा- गोष्टी , मस्करी व भांडणातूनही वाढते. इंग्रजी ही व्यावसायिक भाषा बनली आहे. त्यामुळे ती आलीच पाहिजे. त्याशिवाय जगात डोकावता येणार नाही. इंग्रजीची भीती बाळगु नका. कुठलीही भाषा अथवा गोष्ट शिकायची तर किंतू-परंतू नको. जीभ रेटायला, बोलायला शिका कोणतीही भाषा कोणत्याही वयात शिकता येते. अनेक भाषा अवगत असतील तर, घरबसल्या त्या भाषेतील साहित्य, संस्कृती, संगीत आदींचा लाभ घेता येतो, असे अमृता जोशी म्हणाल्या.
Leave a Reply