जालना : व्यवस्थेच्या वेदनांना आपल्या शब्दवैभवातून ‘अस्वस्थ’ साकारणारे सुप्रसिद्ध कवी कैलास भाले यांचे वडील विश्वनाथ भाले यांचे रविवारी ( दि.24 ) निधन झाले. ते कलासक्त मनाचे व्यक्तिमत्व म्हणून साहित्य वर्तुळात सुपरिचित होते. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शनिवारी ( दि.30 ) त्यांना ‘काव्यात्मक श्रद्धांजली’ वाहण्यात आली.
यावेळी प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजीवनी तडेगावकर, मसापचे जालनाचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, कवी राम गायकवाड, शिवाजी कायंदे, डॉ. प्रभाकर शेळके, सुनील लोणकर,लक्ष्मीकांत दाभाडकर,डॉ. बाबुराव श्रीरामें, डॉ. शोभा यशवंते, गणेश खरात, प्रदीप इक्कर, प्रतिभा श्रीपत,अशोक साबळे,नवनाथ लोखंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
‘नका मनाशी घालू पिंगा, आठवणीनो पुन्हा, सोडून आले गावकुसाशी साऱ्या खाणाखुणा’
ही कविता डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी सादर केली. ‘कानामनात साठवी कवी ल्योकाची अक्षरं, मन मोहरून नाचे बाप होऊन साक्षर’ ही कविता डॉ. प्रभाकर शेळके यांनी सादर करून कै. विश्वनाथ भाले यांना आदरांजली अर्पण केली. तर कवी राम गायकवाड, शिवाजी कायंदे, डॉ. प्रभाकर शेळके, सुनील लोणकर,लक्ष्मीकांत दाभाडकर,डॉ. बाबुराव श्रीरामें, डॉ. शोभा यशवंते, गणेश खरात, प्रदीप इक्कर या कवींनी देखील विविध भावस्पर्शी कविता सादर करून काव्यात्मक श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक प्रा. रमेश भुतेकर यांनी केले. तर पंडित लव्हटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कवी कैलास भाले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती.
Leave a Reply