ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जीवन संघर्ष शोध आणि वेध

May 5, 202113:48 PM 165 0 0

जनमानसात लोकप्रिय होत असलेले ‘जीवन संघर्ष’ पुस्तक माझ्या हातात पडले. हा कवितासंग्रह वाचला आणि तो मला आवडला. या पुस्तकात शोधक वृत्तीने पाहिल्यास हा कविता संग्रह विविध विषयाला स्पर्श करणारा, कवितेच्या माध्यमातून प्रश्न मांडणारा आणि समाज व्यवस्थेला विचार करायला लावणारा आहे, याची जाणीव झाली. नवनाथ रणखांबे या तरुणाच्या कविता प्रबोधन करणाऱ्या स्पष्ट आणि निडर ते बरोबर समंजस आणि संयमी ही आहेत याची जाणीव कविता वाचल्यावर होते. ‘जीवन संघर्ष’ गाव गाड्यातून पर्यावरणा विषयी व्यक्त होत, शहराकडे जात, समाज व्यवस्थतेचे बारकावे टिपत, प्रेमाच्या कवितेने मन जिंकत जातो. या कवितेला सामाजिक जाणिवांची झालर आहे.

‘जीवन संघर्ष’ विविध पुरस्काराने सन्मानित झाला आहे. ‘ जीवन संघर्ष’ या पुस्तकाचे कमी वेळेत विविध मान्यवरांनी समीक्षा , परीक्षणे लिहिल्यामुळे त्याचा विक्रम झाला आहे. ऐतिहासिक विक्रमात विविध रेकॉडने पुस्तकाची नोंद झाली. नवनाथ रणखांबे या तरुण कवी लेखकाच्या ‘जीवन संघर्ष’ या पुस्तकामध्ये असे काय आहे ? की त्याच्यावर परीक्षणांचा एक ऐतिहासिक विक्रम झाला ! या माझ्या पुढे निर्माण झालेल्या कुतूहलाने ‘जीवन संघर्ष’ पुस्तकावरील कवितांचा थोडक्यात शोधक नजरेने शोध आणि वेध घेत आहे . या कविता संग्रहातील प्रत्येक कवितेवर स्वतंत्र परीक्षण होऊ शकते असे मला वाटते. या पुस्तका विषयी सविस्तर माझ्या पुढे असणारे मुद्दे :-

१) जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे : व्यक्तिमत्त्व आणि परिचय थोडक्यात .
२) नवनाथ रणखांबे : साहित्य क्षेत्रात कसा वळला.
३) जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे : यांच्या कवितेतील सामाजिक जीवन कसे आहे .

४) नवनाथ रणखांबे : यांच्या कविता आणि पर्यावरण यांचा काय संबंध आहे.

५) नवनाथ रणखांबे : यांच्या कवितेमधील समाजप्रबोधन कसे आहे.

६)’जीवन संघर्ष’ पुस्तकाची विचार धारा काय आहे.

७) नवनाथ रणखांबे : यांच्या कवितेतून मिळणारी सकारात्मक प्रेरणा कशी आहे.

८) नवनाथ रणखांबे : यांच्या कवितेची विशेषतः कायआहे .

९) ‘जीवन संघर्ष’ पुस्तकाची बांधणी आणि मांडणी कशी आहे : –
१०) ‘जीवन संघर्ष’ पुस्तकाचे मराठी साहित्यात योगदान काय आहे.

वरील मुद्यांवरती आपण थोडक्यात पुढीलप्रमाणे शोध आणि वेध घेऊ या :-

१) जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे : व्यक्तिमत्त्व आणि परिचय थोडक्यात :-
सांगली पासून वाहनांनी प्रवास केल्यास एक- दीड तासाच्या अंतरावर असणारे गौरगावात नवनाथ रणखांबे या तरुणाचा जन्म १२ फेब्रुवारी, १९८३ साली झाला. गौरगाव गावामध्ये प्राथमिक शिक्षक घेऊन पुढील शिक्षणासाठी हा तरुण मूळ गावी मांजर्डे येथे गेला, येथे बारावी पर्यत शिक्षण घेतले. दुष्काळ पडल्यामुळे दुष्काळाचा फटका सर्वांना पडला. या तुरुणाची आई शालन आणि वडील आनंदा हे शेती करीत असल्याने दुष्काळाच्या परिणामांचा छळ आणि झळ या तरुणाच्या स्वप्नांनावर ही पडला. या होतकरू तरुणाला इच्छा असून डी. एड आणि पुढील कांही अडचणीमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. हे लक्षात येताच त्याचे मोठे भाऊ अविनाश यांनी मला का सांगितले नाही ? अशी विचारना करून . शिक्षणाचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासकीय दोन चाकी गाडीची निगा आणि दुरुस्तीचा आय टी आय सुरू केला. हे शैक्षणिक आय . टी. आयचे वर्षे या तरुणाने पूर्ण केले. यावेळी गावात त्याने शाळेत आणि स्वतः क्लास घेऊन मुलांना अध्यापन करण्याचे काम सुरू केले. याबाबत नंदकुमार खराडे सर आणि मारुती माने काका यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शनआणि सहकार्य मिळाले. आपल्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आई आणि वडिलांच्या मार्गदर्शनाने आपण मुंबईला जावे, तेथे दिवसा काम करून नाईट कॉलेज करावे. हा विचार मनात पक्का करून हा तरुण स्टार गुटख्याची बॅग घेऊन, थोडे कपडे आणि पैसे घेऊन मुंबईला वास्तव्यास आला. शहरात मोठा भाऊ संजय , मावशी पमा, मावशी यशोदा आणि कामावर नेते संजय थोरात यांच्या सहवासात शहरात राहिला. शहरात आल्यावर ही या तरुणाचा संघर्षमय प्रवास सुरुच राहिला. चांगल्याच्या सहवासात राहिल्यामुळे तो घडत गेला. मनात ठरवल्याप्रमाणे एक एक पाऊल पूढे टाकत टाकत आज एम .ए (इतिहास), एल.एल. बी, डी.जे आणि एम. सि, आणि इतर शैक्षणिक ज्ञान घेत विविध परीक्षेत ज्ञान त्याने मिळवले. शहरात आल्यावर येथे ही त्याने मुलांना शाळेत आणि क्लास मध्ये अध्यापन सुरू ठेवले होते. साहित्य, शैक्षणिक , कामगार , सामाजिक इ . विविध क्षेत्रात तो आवडीने सामाजिक जाणिवेतून काम करू लागला.


२) नवनाथ रणखांबे : साहित्य क्षेत्रात कसा वळला :-
घरातील वडील, आई, भाऊ आणि बहीण यांचे त्याच्या अभ्यासकडे लक्ष होते. प्राथमिक, हायस्कूल आणि कॉलेज मध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे त्याला शिक्षणाचे महत्व पटून शिक्षणा विषयी गोडी निर्माण झाली. वर्गात हुशार विद्यार्थी म्हणून तो विविध परिक्षे बरोबर इतर स्पर्धा परीक्षेत लहानपणापासून आघाडीवर असे. मैदानी खेळा ऐवजी तो पुस्तकात रमत असे. प्रामाणिकपणा, होतकरू, शिकण्याची आवड, नम्रता आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असणारा नवनाथ रणखांबे सामाजिक प्रश्नांने अस्वथ होत असे. गरिबी, जाती- धर्म भेद, अन्याय – आत्याचर ,भ्रष्टाचार याविषयी त्याला लहानपणापासून चीड होती.
लहानपणापासून पुस्तके वाचण्याची आवड त्याला होती . विविध विषयांवर लिहिण्याची आवड होती . विविध सामाजिक भेडसावणारे प्रश्न त्याला लहानपणापासून अस्वथ करीत होते यातून हा तरुण विचार करू लागला आणि लिहू लागला. पुढे या लिहिण्याला प्रेमाने अधिक बहर चढला.
३) जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे : याच्या कवितेतील सामाजिक जीवन कसे आहे :-
जीवन संघर्ष कविता संग्रहातील कविता ग्रामीण आणि शहरी भागातील आहेत. या शोषित ,पीडित , वंचित , अन्यायग्रस्त समाजातील लोकांच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या असून सर्व सामान्य मानवाचे जीवन संघर्ष टिपणाऱ्या आहेत. कविता मागची प्रेरणा माणूस, समाज, आणि सामाजिक बांधिलकी असल्याची जाणीव कवितेतून दिसून येते. माणुसकी हरवल्याची वेदना, गरिबांची उपासमारी, कवितेतून दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘शाहू फुले आंबेडकर’, चळवळ ही या कवितेची उगमस्थाने आहेत . कवितेचा केंद्रबिंदूच हा सर्व सामान्य माणूस आहे. जीवन संघर्ष म्हणजे जीवन संघर्ष गाथाच आहे. विविध संघर्षाचे कवितेत बारकावे टिपलेले दिसतात. पिढ्यानपिढ्या आलेल्या गावगाडा आणि बलुतेदार जीवन व्यवस्था आणि त्याचे झालेले परिणाम दाखवणाऱ्या सामाजिक व्यसवस्थेचे दर्शन यातून घडते. सामाजिक कुप्रथा, अन्यायकारक रीतीरिवाज, अन्याय, आत्याचार, उच्च – नीच, जात -पात , धर्म भेद , अंधश्रद्धा इ . दर्शन जीवन संघर्षमधून नजरेस येते. डॉ. आंबेडकर, माणूस पण विसरला, शोध स्वतःचा , जातीचे ग्रहण, जीवन संघर्ष, उपाशी पोटं, भटकंती पोटाची अधोगती देशाची, मोडेल कणा, इ. कवितेतून कवीने सामाजिक जीवनाचे विदारक चित्रण डोळ्यापुढे उभे केले आहे. कवीने स्वतःच्या जीवन संघर्षा बरोबर कौटुंबिक संघर्ष रेखाटला आह. तर गरिबीची दाहकता कवितेत आहे तर गरिबांच्या उपासमारी विषयीची वेदना कवितेत नजरेस पडते. प्रेमातील फसवून शेतकरी वर्गाचे सुख – दुःख टिपण्याचा प्रयत्न केला आहे . यात शेतकरी , भूमिहीन मजूर, पर्यावर , प्रेम, विरह , सुख , दुःख ,निसर्गाचा कोप , भ्रष्टाचार, सामाजिक जातीभेद आणि धार्मिक भेद निर्माण असणाऱ्या सामाजिक परिस्थितीचा आढावा ‘जीवन संघर्ष’ मध्ये कवीने घेतला आहे.
कवी नवनाथ रणखांबे आपल्या ‘शब्दाला जाळा’ या कवितेत म्हणतो–

दलित बोलणे सोडा ।
या शब्दाचे भांडवल टाळा ।।
दलित्व तुम्ही सोडा ।
शब्दाला या जाळा ।।

दलित शब्द हा ‘हीनताबोध’ आहे म्हणून कवीला या दलित शब्दाला विरोध आहे . दलित हा शब्दप्रयोग करून राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय भेद निर्माण करून पोळी भाजणारे खूप आहेत. त्यामुळे जे स्वतःला दलित म्हणून घेता आहेत त्यांनी या हीनताबोध शब्दाला जाळा असे प्रबोधनात्मक कवी आव्हान करतो आहे. दलित हा तिरस्कार वाटणारा शब्दा सतत प्रयोग करून एका समूहाला हीन लेखनारा वर्ग आहे. हा वर्ग या शब्दाचे भांडवल करत आला आहे. हा दुही माजवणारा जातीभेद करणारा स्वार्थी धंदा बंद करून सामाजिक समता ठेवा. असा आशयच कवितेत व्यक्त होत आहे.
राजकारणातील सामाजिक परिस्थितीचा आढाव कवीने घेतला आहे. आज श्रेय लाटण्यासाठी राजकारणी लोकांच्या भानगडी होतात आणि कार्यकर्ते मंडळींची डोकी फुटतात . याचे बारकावे टिपताना कवी ‘श्रेय’ या कवितेत म्हणतो …
श्रेय
इथं तिथं
पाट्या लागल्यात
राजकारणी विरोधात
श्रेयासाठी भिडलेत
उदघाटने झाली….
डोकी फुटली….
डबडबलेल्या डोळयांनी
कामेच रडली ….!
तर पुढे आलेला ‘निधी’ या कवितेत निधी कसा इकडे तिकडे वळवला जातो. हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गरज असणाऱ्या मानवांच्या गरजेला निधी मिळत नाही. निधी कागदावर असतो त्याची अंमल बजावणी होऊन विकास होत नसल्याची कवीची खंत आहे. आलेल्या ‘निधी’ या सदर कवितेतू पुढीलप्रमाणे कवी म्हणतो….
आलेला निधी
इथं मिळतात
कागदाला सवलती
मानवाला नाही
मानव मेलाय
कागद जगलाय
इकडे तिकडे
कागदाने वळवलाय
आलेला निधी
परत घालवलाय
सर्वांगीण विकास
कागदाचा झालाय
( कागदी घोडे नाचतात…!)
आज मानव जगत असताना सामाजिक परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे कोठे तरी थांबले पाहिजे असे कविला वाटते आहे म्हणून की काय ‘शेवट अजून बाकी आहे’ ह्या नवनाथ रणखांबे यांच्या कवितेचा जन्म झाला .सदर कविता पुढीलप्रमाणे…
शेवट अजून बाकी आहे
भ्रष्टाचार अजून,
नाही मिटला….
भ्रष्टाचार जीवन,
आहे जगत….

भेदभाव अजून,
नाही संपला…
भेदभाव वाढत ,
आहे पसरत…

दोष अजून ,
नाही काढला…
वंचित अजून,
आहे भटकत…

शेवट अजून,
बाकी आहे…
शेवट शेवटाच्या,
प्रतिक्षेत आहे !

४) नवनाथ रणखांबे : यांच्या कविता आणि पर्यावरण यांचा काय संबंध आहे:-
‘जीवन संघर्ष’ ह्या काव्यसंग्रहात इतर कविते बरोबर पर्यावरणावर आधारित कविता आहेत. निसर्गाचे बारकाईने केलेले निरीक्षण कवितेतून दिसून येते. यात ओला आणि सुखा दुष्काळ यावर कविता आढळतात. कवीने जे पाहिले, जे अनुभवले आणि जे ऐकले या घटनेचा उल्लेख कवितेतून येतो . कवी आपल्या कवितेत आपल्या मातीचा सुगंध घेऊन आला आहे. कवीचा जन्म १९८३ सालचा असला तरी १९७२ च्या सुखा दुष्काळाच्या तीव्रतेची त्याला दाहकता माहीत आहे. आयुष्य जगतांना लहानपणापासून दुष्काळाचे चटके सहन केलेला हा कवी आहे. आई वडिलांन सोबत स्वतःची शेती कसत असतांना इतरांच्या शेतीत मजुरी करणारा हा तरुण विविध अनुभव संपन्न आहे. दुष्काळ परिस्थितीत लोकांची बिकटअवस्था पाहणारा आणि स्वतः त्या दिवसांना पाठ देणारा हा तरुण दुष्काळ परिस्थितीमुळे गाव सोडून मुंबई शहरात आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आला. तर २००५ साली अतोनात नुकसान करणाऱ्या ओला दुष्काळाच्या हानीचा साक्षीदार झाला आहे.
‘माजोऱ्या पाऊसा’ या कवितेत त्याचा समावेश आढळून येतो. हा कवी मानवाची हानी करणाऱ्या पाऊसाला साहित्याच्या कोर्टात खेचण्यास , कवितेच्या दुनियेत घेऊन जाण्यास आणि शिक्षा देण्यास कमी करीत नाही. ‘माजोऱ्या पाऊसा’ ही रचना मनाला भावते सदरहू या कवितेच्या कांही ओळी…..

जिथे गरज, तिथे नाहीस,
जिथे नको, तिथे आहेस,
तुझी हानी , सहन होत नाय,
सोसल्या शिवाय , पर्याय नाय
पुढे ‘ पाऊस पेरणी’ या कवितेतून पाऊसाची कशी पेरणी केली पाहिजे म्हणजे पाऊस कसा पेरला पाहिजे. याचे विवेंचन करणारी ही कविता, कवितेच्या माध्यमातून पाऊस हा मानवाशी संवाद करतोय अशी ही रचना आहे. यात झाडे आणि वने मानवाने नष्ट केली. त्यामुळे जलचक्राचा नियम मोडला . त्यामुळे मानवाला दुष्परिणाम भोगावे लागले यात शेतकरी राजा कोलमडून गेला आहे. कवी कवितेत म्हणतो..

झाडे म्हणजे श्वास ।
श्वास म्हणजे जगणे।।
पाऊस म्हणजे पाणी।
पाणी म्हणजे जीवन ।।

पुढे कवितेत पाण्याच्या संगोपनासाठी संदेश देतांना कवी लिहितो आहे की,

पाणी अडवून जिरवा,
पाणी पुरवून उरवा,
भूजल पातळी वाढावा!

या कवितेतून अंधश्रद्धा न बाळगता झाडे लावून वाढवण्यास कवी सांगतो आहे. जल चक्रास , निसर्ग नियमास मदत केल्यामुळे पाऊस स्वतः जोरात पडण्याची हमी देतांना कवितेत दिसतो आहे.
कवीला गावगाडा , बारा बलुतेदारी पद्धतीचे दुष्परिणाम, बाबासाहेबांचे महान कार्य आणि सामाजिक चळवळ यांची जान आहे. तसेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची जाणिव आहे यातून शिवरायांच्या गड – किल्ल्याची दुर्दशा पाहून ‘प्रतिक्षेत मराठी सत्तेच्या’ या कवितेचा जन्म होताना दिसतो . पर्यावरणाचा समतोल का बिघडला तर झाडे नष्ट केल्यामुळे जंगल नष्ट झाली. उघडे बोडके डोंगर , टेकड्या , दिसत आहेत. विकासाच्या नावाखाली झालेली हानी याची चिंता व्यक्त करित पर्यावरणाचा समतोल ढासळल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. यांचे विचार मंथन कविता करीत आहे. ‘ढळला तोल’ या कवितेच्या माध्यमातून निसर्गाचा हिरवा शालू नष्ट झाल्याची खंत व्यक्त झाली असून ओझन थोडा थोडा मरत आहे , आणि ही बाबा चिंताजनक आहे. असे कवीला वाटते आहे. दुष्काळ परिस्थिती ही असमानी की सुलतानी ? हा सवाल या कवितेत कवी आपल्यासमोर ठेवतो आहे. पर्यायवरनाची वाट लागू नका तर त्याचे संगोपन करा. हा प्रबोधनात्मक संदेश कवी देतो आहे.

५) नवनाथ रणखांबे यांच्या कविततील समाजप्रबोधन कसे आहे :-
नवनाथ रणखांबे यांच्या कविता या अंधश्रद्धा जपणाऱ्या नाहीत. त्या आधुनिक विचारांची पेरणी करून प्रबोधन करणाऱ्या आणि मानवता जपणाऱ्या आहेत. बहिष्कृत, शोषित, पीडित वंचित… इत्यादींच्या जीवन संघर्ष मांडणाऱ्या आहेत. मानवाला माणूसपण शिकवणाऱ्या मानवतावादी कविता आहेत. प्रेमात ही कशी जात आडवी येते हे ही या कवितेत पाहण्यास मिळते. ते जातीचे ग्रहण या कवितेच्या माध्यमातून, कवितेतील ओळी पुढीलप्रमाणे…..
तुझ्या माझ्या वरील प्रेमाला जातीचे ग्रहण होते…..
तुझ्या बुरसटलेल्या जुनाट विचरांचे प्रेमात होते….
………वादळ जातीचे
आज ही बाजारबुणग्यांची स्वतंत्र मिळता दहा दशकाचा आढाव ‘भटकंती पोटाची अधोगती देशाची’ या कवितेत कवीने घेतलेला दिसत आहे. आज डोंबारी खेळ, मरी आई गाडा, नंदीबैल वाले फिरणे, वासुदेवाची फेरी, देवाला पोतराज आणि जोगती सोडणे, गोंधळ घालणे हे पिढ्यानपिढ्या करीत असणारे आज ही हे काम करावे लागत आहे. हे काम करावे लागत असेल तर आज या मागास लोकांची प्रगती झाली नाही हेच सिद्ध होत आहे असे कवीला ठासून सांगायचं आहे. दीड विताच्या पोटासाठी त्यांना गावोगावी दारोदारी भटकावे लागते अजून काही ठिकाणी रोजगाराची आणि शिक्षणाची गंगा त्यांना मिळालीच नाही . अजून ही हा भटकंती करणाऱ्या जाती जमातींना घर नाही , दारा नाही , गाव नाही, की शिव नाही. पिढ्यानपिढ्या कांही भटक्या जमाती भटकतच आहे. काहींना ना आधारकार्ड , ना रेशनकार्ड आहे . ना जन्माचा पुरावा, मुत्याचा दाखला आजही ही देशातील स्थिती पाहून हा सामाजिक प्रश्न कवीने कवितेत मांडला आहे. कवी म्हणतो….

नाही शिक्षण , नाही रोजगार
स्वातंत्र मिळता सात दशके
अजूनही आहे वंचित ….

काही सुधारले , काही नाहीच सुधारले,
गरिब- गरिब, श्रीमंत-श्रीमंत होत आहे…
सामाजिक आर्थिक , विषमतांची दरी,
खोलवर एतद्देशीय भेद भारी…
सामाजिक वास्तवाचे निरीक्षण करणाऱ्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांच्या कविता आहेत. या कवितेतून सामाजिक बांधिलकी, माणूसही हरवल्याची वेदना, गरिबांच्या उपासमारीची वेदना, भ्रष्टाचारा विषयी राग, अन्याय आत्याचार विरुद्ध आवाज, स्त्रियां, शेतकरी आणि मजुरांच्या व्यथा वेदना इ. कविता सामाजिक जीवांचा संशोधनात्मक वेध घेत आहे. कवितेतून पर्यावरण संगोपन आणि संवर्धन त्यांनी केले आहे. कवितेतून समानता जोपासली आहे. सामाजिक कुप्रथा , वाईट रितीरिवाज , अन्याय , अत्याचार, उच्च – निच , जात -पात, लिंग वर्ण वर्ग भेद, आणि धर्म भेद यावर विचारमंथन करीत समानता जपणाऱ्या कविता जीवन संघर्षमध्ये पहावयास मिळतात. ‘माणूस पण विसरला’ या कवितेतून कवी म्हणतो….

माणसा तू माणसातला
माणूस पण विसरला
भगवा , हिरवा
निळा , पिवळा
धर्म जात पंथ वाटला ।

अशी कवितेने सुरुवात करून शेवटी

माणसा तू माणसाप्रमाणे,
माणसाळायला विसरू नको।।
माणसा तू माणसातलं
माणूसपण विसरू नको ।।
असा व्यक्त होत माणूसपणा शिकवून कवी जातो. ‘ शोध स्वतःचा’ या कवितेतू माणूस स्वतः हरावला आहे स्वार्थाच्या दुनियेत त्यांची माणुसकी ही हरवली आहे. चांगला विचार करणे, चांगले वागणे , चांगले राहण्याचा विचार हरवला आहे, श्रेष्ठ , कनिष्ठ इ. भेदभाव धर्म – जाती – पातीच्या गर्वात समानता हरवून माणूस बसला आहे. हे सगळे हरवले असतांना त्याला स्वतः शोध घेऊन चांगले वागले पाहिजे ही काळाची गरज असल्याचा आशय कवितेतून उतरत जातो.

६) जीवन संघर्ष पुस्तकाची विचार धारा काय आहे :-
जीवन संघर्ष पुस्तकात मानवता वाद आहे . सर्व सामान्य माणूस ह्या लेखणीत आढळतो. आंबेडवादी काव्यसंग्रह असल्यामुळे हा बाबासाहेबांच्या विचारांवर चालत माणसाला माणुसकी शिकवत बुद्धाच्या मार्गाने जात आहे. आंबेडकरवादी विचारधारेच्या जीवन संघर्ष कवितेतून स्वातंत्र्य , समता, बंधुता, न्याय इ. मुल्यांची कवितेतून उधळण झाली आहेत. ‘मानवतेला डाग’ या कवितेत कवी सहज काव्यातून म्हणतो
शोषणांच्या दुष्टचक्रात
पिढ्यानपिढ्या पिढ्यात
मानवता गहिवरली
क्रूर अन्याय पाहून
ओक्सा बोक्शी रडली !

समाज व्यवस्थेला तडा…
रक्ताच्या सड्याने राडा….

सामाजिक प्रघाताने
अन्यायाला पाहिले नाही
सामाजिक प्रघाताने
अन्यायाला दूर केले नाही

अन्यायी घटना….
मानवतेवर डाग आहे
अन्यायी मानवांनी ….
मानवतेला जाळले आहे.
सदर कवितेतून कवीने पिढ्यानपिढ्या सामाजिक आन्यायाचा पाडा वाचला आहे. चार वर्णाच्या नावाने शूद्र आणि अतिशूद्र यांच्यावर अन्याय आत्याचार अखंड चालूच राहिला आहे. पूर्व जाती भेद , धर्म भेद, स्पृश्य – अस्पृश्य , विविध वाईट रूढी परंपरेने येथील सामाजिक वातावरण गढूळ झाले होते आणि आज ही कांही प्रमाणात आहे. ते नाकारता येत नाही. रमाई आंबेडकर नगर , बेलछी, पारसा भिघा, बथनी टोला, झज्जर, खैरलांजी , सोनाई, खर्डा, जवखेड, बुलढाणा, उना, रोहित विमुला,सहराणापुर…इ. अन्यायी घटनामधून
मानवतेवर डाग पडला आहे. बुरसटलेल्या विचार सरणीतून मानव मानवावर अन्याय करीत आहे. अन्यायी मानवांनी मानवतेला जाळले आहे हे स्पष्ट होते आहे. तर पुढे ‘जीवन संघर्ष’ या कवितेतून हाच आशय व्यक्त होत असून लेखणीचे मशाल घेणारा हा कवी या कवितेत …
जीवन संघर्ष….
वेदनांचे हुंकार…
वेदनांचे आक्रोश….
कवितेने कागदावर
आता उमटवायचं !
असा व्यक्त झाला आहे तर ‘डॉ. आंबेडकर’ या कवितेतून भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांच्या महान कार्याबद्दल व्यक्त होत संविधान निर्मितीने
सर्वांत मोठ्या संविधानने
रक्तपात न करता…
लेखणीच्या स्वतंत्र क्रांतीने
नवा इतिहास घडवलात…
सार्वभौम समाजवादी धर्म निपेक्ष,
गणराज्य घडवलत ….
स्त्री पुरुष सर्व धर्माला देशात
न्याय दिलात ….
—- युगपुरुष , त्राता बाबा तुम्ही ! असा व्यक्त होताना दिसतो तर आंबेडकवादी कवी ‘बानं शिकवलं’ या कवितेतून शिक्षणाचं महत्त्व पटलेला आणि बाबासाहेबांच्या विचाराने भारून गेलेला कवीचा ‘बा’ कवितेतून जगासमोर आणत आहे. आपल्या मुलाने शिकून मोठं होऊन घराचं नाव मोठं करावं म्हणून हा बाप बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार पेरत आहे. सदर कवितेतून…
‘बा’ माझा ओरडला
लेका आजपासून तुझी
शिक्षण हीच ‘आई’
करियर हाच ‘बा’
मुंबई हिच ‘पांढरी’

असा व्यक्त झाला आहे तर पुढे कवितेत.

जा, पोरा जा, तू …..
उद्याचा दिवस तुझा आहे
त्यात परिवर्तन तुझे आहे
प्रगती तुला खुणावत आहे
प्रसिद्ध तुझी वाट पाहत आहे
असा व्यक्त होऊन त्यांनी सदर कवितेतून सर्वच मांडलेला विचार प्रेरणादायी आहे. पुढे कवितेत कवी शेवटी म्हणतो…
कधी हिंमत हारू नको
पुस्तक वाचणे सोडू नको
पुस्तक माझे सर्वस्व आहे
कधी एकटा समजू नको

शिक्षण वाघिनीचे दूध आहे
भीमाच्या चळवळीचा गाभा आहे
लोकांसाठी तुझं……..
जगणं हेच तुझे जीणं आहे.
भीमाच्या चळवळीचं
नवनाथा शिलेदार तुला बनणं आहे! कवीचा ‘बा’ आपल्या मुलाला कवितेच्या माध्यमातून दुसऱ्यासाठी जगण्यास सांगतो आहे आणि बाबासाहेबांच्या चळवळीचा शिलेदार व्हायला विचारांचे बाळकडू पाजत आहे. घरातून मिळालेल्या वैचारिक वारसा जपत आंबेडकरवादी कवी ‘ मोडेल कणा’ या कवितेत म्हणतो आहे…..

लढताना मोडेल कण माझा
स्वाभिमान अन्यायापुढे वाकणार नाही
मी चळवळीचा वसा माझा
शेवटच्या श्वासापर्यत सोडणार नाही

‘थरकाप’ कविता ही गरुडाचे जीवन सांगणारी आणि दलित पँथरवर चळवळीवर भाष्य करणारी कविता वाटते आहे. सदर कवितेत
पँथर दरारा संपत
तुझ्या उतरत्या काळात
म्हातारी बोथड चोच, नखं
उपडून तोडून काढ…
परत धारदार येतील!
मरगळ टाकून ,
घायाळ करून ;
सावज पकडशील ,
तुझ्या गरुड भरारीनं ;
परत आसमंत ढवळून काढशील !
गरुडाच्या प्रतिकाने कविता दलित पँथर चळवळीला पूर्वीसारखी धार यावी हा आशय व्यतीत होतांना दिसतो.

७) नवनाथ रणखांबे यांच्या कवितेतून मिळणारी सकारात्मक प्रेरणा कशी आहे. :-
जीवन संघर्ष करीत यश गाठण्याची जिद्द या कवीतून दिसते . जीवनाकडे आशावाद आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळते. जीवन संघर्ष मधील कविता या जगण्याला बळ देणाऱ्या कविता आहेत. ‘मात’ या कवितेत कवी पुढीलप्रमाणे म्हणतो..

संघर्षाने दिलं माझ्या,
जगणाऱ्या जीवनाला
काळा कुट्ट काळोख,
मशाल बनून पेटवायला
मोकळे आकाश ,
उंचावर भरारीने जायाला
यशाचं शिखर,
उंचावर ऐटीत बसायला

८) नवनाथ रणखांबे यांच्या कवितेची विशेषतः कायआहे :-
मुक्त छंदात कविता आहेत. कवितेत यमक साधण्याचा प्रयत्न केला असून कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करीत असताना दीर्घ कविता ही या संग्रहात वाचण्यात येतात .
ग्रामीण भागातून आलेला तरुण नवनाथ रणखांबे कवितेतून निर्जिव घटकांशी संवाद साधताना दिसतो तर इतर काही ठिकाणी निर्जिव वस्तू सजीव होऊन मानवाशी संवाद साधताना दिसते असे लक्षात येते. विविध पात्र आपला जीवन संघर्ष करीत असताना सुख ,दुःख , अपेक्षा , जगण्यासाठीचा संघर्ष, जीवनात लढण्याची प्रेरणा इ. सांगण्याचा प्रर्यत करीत असल्यासाचे दिसून येते ‘माजोऱ्या पाऊस’ या कवितेत पाऊस वेळेत पडत नाही. तो दुष्काळ पाडून नुकसान करतो म्हणून तो पाऊसाशी संवाद साधून त्याला साहित्याच्या कोर्टात उभा करतो. कवितेच्या दुनियेत निकाल झाल्यावर त्याला नभ सृष्टीच्या तुरुंगात आवश्यकतेनुसार पडण्याची सजीवांचे नुकसान न करण्याची शिक्षा दिले जाते. अशी एक वेगळी काव्य रचना पाहण्यास मिळते. माय, तुला मी पाहिलय या कवितेत कवी सहज व्यक्त झाला आहे.
तुझ्या जीवन संघर्षाचा,
संग्राम पाहून ……
काळ स्तब्ध झाला अन…
संघर्ष गहिवरला….
ओथंबलेल्या डोळ्यांनी
………….ढसा ढसा रडला!
पाऊस पेरणी या कवितेतून दुष्काळ का पडतो ? पर्यावरणाची वाट का लागली ? हे पाऊस सांगत असून तो पाऊसाची पेरणी करायला मानवाला सांगत आहे. ‘प्रश्न अन उत्तरी’ या कवितेत कर्जाला राग आला आणि तो मानवांशी कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. सरसकट शेतकऱ्यांची कर्ज माफ होतात पण बोगस कर्ज घेणाऱ्यांना नुकसान न होताच लाभ मिळतो. तर शेतात भुमीहिन मजूर राबतात त्यांच्याकडे कोणी पाहतच नाही. दुष्काळात त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. भुमीहिन मजुरांकडे ‘कर्ज’ लक्ष वेधतांना कवितेत दिसते. ‘उपाशी पोटं’ या कवितेत कोठार धान्याला बोलते आहे, श्रद्धा मानवाला बोलते आहे, बचत मानवाला बोलते आहे आणि उपवास मानवाला बोलते आहे या संवादातून सामाजिक प्रश्नांकडे खेचून समाजप्रबोधन कवितेत होतांना दिसते. कवितेच्या कांही ओळींचे एक उदाहरण पुढीलप्रमाणे

बचत मानवाला बोले
अन्न कचऱ्यात असे,
तुम्ही नासाडी करता कसे !

जातीचे ग्रहण या कवितेतून जातीचे प्रेमाला घातलेले कुंपन येथे संवाद प्रेमविराशी साधताना म्हणते की,

तुझ्या माझ्या जातीने प्रेमाला घातले बंधन
तुझ्या भोवती तू घातलेले बोलले कुंपन
तू वेगळा…. मी वेगळी….
वेगळ्या आपल्या जातीमुळे
प्रेमात नकार त्यामुळे

प्रतीक्षेत मराठी सत्तेच्या या कवितेत ‘किल्ला’ त्याच्या सर्वांगिन विकासासाठी ‘मराठी सत्तेच्या प्रतिक्षेत’ आहे. तो आपले भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्याकाळ यासंदर्भात आपलि सुख -दुःख संवाद कवितेतून मांडत आहे . हा संवाद साधत असताना ‘अखेरचा श्वास’ या कवितेच्या माध्यमातून प्रेम विरह प्रेमात संवाद साधतांना आपल्या जोडीदाराला प्रेमशून्य अवस्थेत एकदा भेटण्याच्या आवस्थेत आहे. ‘जिवनाच्या लढ्यात’ या कवितेतून चमेली, धरणी, मरुत, अनल हे मानवाला जीवनाच्या लढ्यात कसे लढायचे याची प्रेरणा देताना कवितेतून संवाद साधतो आहे.

अरे अरे मानवा
जीवनाच्या लढ्यात करोस काय ?
चमेली बोलतेय …..
सुगंधात दरवळत जा !
नवनाथ रणखांबे यांच्या कवितेत संघर्षाची धग पाऊलो पाऊली जाणवते. कविता या संघर्षातून जगाण्याचे बळ देते. विविध कवितेतून कवीने वेगवेळा संघर्ष टिपण्याचा प्रयत्न केला आहे .
नवनाथ रणखांबे यांच्या कवितेत विशेषणे, उपमा , उपमेय, प्रतीके इ. वापर केल्याचे दिसून येते. आभाळाची माया, गेही, आभाळ फाटलं, उसवलं घरदार, संघर्ष रडताना, डोंगराचे लोन , पडाक मन, उधळपट्टीचा साज, घाव वेदनांचे , माजोऱ्या पाऊसा, साहित्याच्या कोर्टात , नभ सुष्टीच्या तुरुंगात, दुष्काळाचं पाणी, गरिबीच्या पेवात,शिक्षण हीच आई, करियर हाच बा, मुंबई हीच पांढरी, एसटी ला लालपरी उपमा, पाऊसाचं रडगाणं, वेदनांचे अश्रू, वेदनांचे जीणे, उपाशी पोटं, भुकेची तृप्ती, कट्यार शब्द, मानवतेची नग्न धिंड, हैवांनी षंढ, नामर्दांची जात्यांध फ़ौज, जातीवादी मन, कोंडमारा, दाहकता, जातींच्या उतरंडी, शोषणांच्या दुष्टचक्रात, मानवता गहिवरली, क्रूर अन्याय, रक्ताच्या सड्याने राडा, मानवतेवर डाग, मानवतेला जाळले, सामाजिक अपंगत्व, आक्रोशांनी सजलेले, दुःखानी विणलेले, गिलोटन, वाकळ, ठिगळ, मळभ, जातीचे ग्रहण, ठाकले, आभाळचे क्षितिज, नाते धाग्याने शिवतं, भाकरीचा भस्मासुर, अन्यायाचा नंगा नाच, पेटून उठला श्वास, काळाच्या छाताडावर, गावकुसाबाहेर, बारा बलुतेदार, चार वर्ण, भाकरीसाठी भटकंती, प्रबुद्ध जीवन, पड झडीचं ग्रहण, पँथर दरारा, मृत्यूच्या जाळ्यात, मुडदा मोकळा, हाडांचा सापळा, शरीराची धग, काडीमोड घेणारे दिल, श्वास स्वार, प्रेमशून्य अवस्थेत , नारीत्वचा ऐवज, मानाची कापली मान, पहाट गिळत गिळत, दवबिंदूची हिरवळ, धुक्यांच्या शालुनी, मोकळा श्वास ,शरीर घटस्फोटित, रात्र माझी जागत होती, आठवण बोलत होती, स्मृतीच्या कप्प्यात इ. शब्द आलेले असून शहरी आणि ग्रामीण जीवनातील शब्दाचा साज कवितेत आलेला आहे.

९) जीवन संघर्ष : पुस्तकाची बांधणी आणि मांडणी कशी आहे : –
‘जीवन संघर्ष’ पुस्तकाची मांडणी आकर्षक अशी आहे. मुखपृष्ठावरील जीवनाचा संघर्ष करीत उंच आकाशात गरुड झेप घेणारा गरुड मन जिंकतो. पुस्तकाचे शीर्षक, माहिती, अर्पण पत्रिका, अनुक्रम , प्रास्ताविक, आणि मनोगता कडून हा कविता संग्रह कविते पर्यत पोहचतो आणि ४७ विविध विषयांवर आधारीत ‘जीवन संघर्ष’ पुस्तकात कविता लिहिल्या गेल्या. ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रहातील कविता मनाला भावतात, नंतर हा काव्य संग्रह अभिप्रायाकडे सरकतो. यामध्ये विविध मान्यवरांनी लिहिलेले अभिप्राय , समीक्षा ,परीक्षण वाचण्यास मिळते. यात वाचक समीक्षक मुख्याध्यापिका आशा रणखांबे, कामगार नेते संजय थोरात, प्रसिध्द बौद्ध साहित्यक डी. एल. कांबळे, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, थोर समाजसेवक सीताराम गायकवाड यांचा समावेश आहे. अभिप्रायाकडून सरकत हा काव्यसंग्रह आभाराकडून कवीच्या अल्प परीचयपर्यत येऊन ठाकतो. मुखपृष्ठा मागील आणि मलपृष्ठभाग अगोदर कवितासादरीकरनाचे जीवनसंघर्षकाराचे छायाचित्रे आहेत. पुस्तकाच्याशेवटी मलपृष्ठाच्या मागे बहुभाषिक प्रख्यात साहित्यिक दामोदर मोरे यांनी पुस्तकाची मलपृष्ठ लिहून पुस्तकाची पाठराखण केली आहे. पुस्तकातील सारांश मोजक्यात शब्दात सांगितला आहे . हे वाचल्यानंतर पुस्तकाबद्दल वाचकास पुस्तक वाचण्यास उत्सुकता लागते. पुस्तकाला पिन ऐवजी पुस्तक बायडिंग केल्याने आणि पुस्तकाचा पेज चांगला वापरल्यामुळे पुस्तकास दीर्घ आयुष्य लाभले आहे.

१०) जीवन संघर्ष बाबत मोजक्या लेखकांचा थोडक्यात अभिप्रायात , परीक्षणात , समीक्षणात आलेली मते :-
साहित्य क्षेत्रात समीक्षक पुस्तकावर लिहिताना आपला हात नेहमी आखुडता घेतात. परंतू जीवन संघर्ष वरती समीक्षक , वाचक वर्ग आणि साहित्यिक वर्ग यांनी समीक्षा परीक्षण , अभिप्राय भरभरून लिहिल्याचे अढळून येते.
जीवन संघर्ष पुस्तकावर आलेली परीक्षणे , अभिप्राय , समीक्षा
वाचल्यानंतर कांही मोजके समीक्षक , साहित्यिक आणि लेखक वर्ग पुढील प्रमाणे थोडक्यात आपले मत व्यक्त करीत आहे.
अ) रसिक रायभोळे – ‘ सामाजिक संघर्षाची कविता जीवन संघर्ष हा नवनाथ रणखांबे, यांचा पहिलाच कविता संग्रह. मात्र
या कविता संग्रहात पहिलेपणाच्या खुणा आढळत नाहीत उलट या संग्रहातील कविता समंजस आणि संयमी आहे कारण या कवितांमागच्या प्रेरणा माणूस, समाज आणि सामाजिक बांधिलकी या आहेत.’
आ) साहित्य दरबार टीम – जीवन संघर्ष ‘जीवनाचा वेध घेणाऱ्या कवितांचा संग्रह’.
इ) अंकुश शिंगाडे – ‘ जीवन संघर्ष ; माणूस घडविणारं पुस्तक’. ‘ जीवन संघर्ष वास्तविक जीवनातील एल्गार ‘
ई) प्रतीक्षा थोरात – ‘ जीवन संघर्ष कविता संग्रहाच्या संघर्षमय प्रेरणादायी कविता मनाला भावतात ‘.
उ)डॉ. विकास वसंत खराडे – ‘समाज प्रबोधनाचे धडे देणारा कविता संग्रह जीवन संघर्ष’.
ऊ) प्रा. संभाजी भगत :- ‘नवनाथ रणखांबेंच्या जीवन संघर्ष मध्ये संपूर्ण समाज, निसर्ग, सजीव व पंचमहाभूतांचा वेध’. संपूर्ण समाजाचा विचार करणारा काव्य संग्रह म्हणजे जीवन संघर्ष.
ए) प्रा.डॉ. यशोधरा वराळे – कवी नवनाथ रणखांबे यांच्या जीवन संघर्ष कविता संग्रहातील कविता म्हणजे जीवनाच्या संघर्षाला लढण्यास प्रोत्साहन देणाऱ्या आहेत’.
ऐ) जगदेव भटू – ‘आंबेडकरवादी कवीने व्यक्त केलेल्या संघर्ष व्यथा , वेदनांचे वास्तव’.
ओ) अँड श्रीकृष्ण टोबरे – ‘जीवनात जीवनाचा संघर्ष तोच जीवन संघर्ष.’
औ) मारुती कांबळे – ‘संघर्षातून यशाच्या मार्गाकडे घेऊन जाणारी कविता.’
अं) महेश धानके – ‘जीवन संघर्ष समाजाचे प्रतिबिंब.’
अ:) किरण गायकवाड – ‘ जीवन संघर्ष पुस्तकातील कविता समाजाला जाणिव आणि प्रेरणादायी विचार देणारी.’
क) विजय वाठोरे ( साहिल) – ‘आंबेडकरवादी चळवळीचे नेतृत्व करणारा कवितासंग्रह जीवन संघर्ष ‘.
ख) किरण डोंगर दिवे – ‘जीवन संघर्ष आंबेडकरी विचार प्रणालीचा आश्वाक स्वर’.
ग) मीनाक्षी किलावत – ‘ प्रेम , विरह , वेदना, निसर्ग, अशा विविधतेने नटलेल्या काव्य पुष्प वाचकांच्या मनाचा ठाव घेणार आहे’.
घ) डॉ. कुलदीप कदम – ‘जीवन संघर्ष कविता संग्रह वाचकांना दिशा देणारा आहे’.
च) विजय ज. जाधव – ‘ परिवर्तन वादी काव्य’. परिवर्तनवादी काव्यनिर्मितीचा धनी म्हणजे नवनाथ रणखांबे.
छ) चेतन जाधव – ‘समस्यांवर काव्यत्मक भाष्य’.
ज) संघरत्न घनघाव – ‘अंधाराला पेटवणारा एक ज्वलंत कवी’.
झ)पंकज पाटील – ‘मनात प्रज्ञेचे रोपण करणारा काव्य संग्रह जीवन संघर्ष’.
त्र)नाना नेटावटे – ‘ जीवन जगण्याची कला हे जीवन संघर्ष कविता संग्रहातून शिकता येईल’.
ट) विजय भोईर – ‘आकाशाला गवसणी घालणारे जीवन संघर्ष’.
ठ) रमेश सरकटे – ‘वास्तवदर्शी भावनांमुळे जीवन संघर्षात जिवंतपणा’.
ड) शामजी बैसाणे – ‘ जीवन संघर्ष काव्यसंग्रह तथागत भगवान बुद्ध आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा देणारा आहे’.
ढ) रविकिरण कोल्हे – ‘जीवन संघर्ष पुस्तकातील कविता मनाला भुरळ घालणाऱ्या आहेत.’
ण) महानंदा गुणकी – ‘जीवन संघर्ष एक सुंदर काव्य संग्रह’.
प) अजय भामरे – ‘जीवन संघर्ष दिशादर्शक ,सुंदर वाचनीय आहे’.
फ) सुभाष आढाव – ‘कवीचे अंतर्गत व्यथा , वेदना , हुंकार, संघर्ष समाज व्यवस्था ,परिवर्तन….जे पाहिले , अनुभवले, ऐकले ते अंतरंग जे आहे ते मुक्त छंद रुपात नवनाथ रणखांबे यांच्या जीवन संघर्ष व्यक्त होत जातो. किंबहुना गावकुसाबाहेर वस्तीचा जीवन शैलीचा धांडोळा आपणास वाचायला मिळतो.’

परीक्षण , समीक्षा आणि अभिप्राय संख्या वाढत असल्यामुळे येथेच आपण थांबू.
( संदर्भ :- वरील मान्यवरांनी लिहिलेली प्रसार माध्यमात प्रसिद्ध झालेली परीक्षण, अभिप्राय, समीक्षा )

जीवन संघर्ष पुस्तकात लिहिलेले अभिप्राय, परीक्षण आणि समीक्षा यांचा थोडक्यात आढाव पुढीलप्रमाणे—
अ) प्रा.डॉ. शहाजी कांबळे – जीवन संघर्ष पुस्तकाच्या प्रास्ताविकातून , जीवन संघर्ष ‘जीवनाची वेध घेणारी कविता’.कवितेचा आशयच अन्यायमूलक जीवन संघर्षाची गाथा आहे हेच त्याच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे’.
आ) आशा रणखांबे – ‘जीवन संघर्ष जगण्याची प्रेरक शक्ती’.
इ)संजय थोरात – ‘संघर्ष कवीच्या पूर्ण संग्रहातून उलगडत जातो’.
ई) डी.एल.कांबळे – ‘जीवन संघर्ष काव्यसंग्रह जीवनाच्या संघर्षाला तोंड देण्याची उर्जा जररू प्रत्येकाला प्रदान करील’.
उ)प्रा. शुक्राचार्य गायकवाड – ‘शिक्षणाच्या संदर्भात कवीने अनमोल असा विचार शब्द बद्ध केले आहेत’.
ऊ) सिताराम गायकवाड – ‘संघर्षाने शिकवले माझ्या जीवनाला ‘मात’ या कवितेमधून त्यावर मात करावयाची असते. अशी प्रत्येक उमद्या व्यक्तीला जगण्याचे वास्तव व यशाच्या उभारिला साद घातली आहे’.
ए) प्रा. दामोदर मोरे – मल पृष्ठातून , जीवन – संघर्ष करीत यशोशिखराकडे भरारी घेऊ पहाणारं मन या कवितेत प्रकट झालं आहे.
‘जा,पोरा जा तू……
उद्याचा दिवस तुझा आहे’
ही कवितेतील जाणीव प्रेरणादायी आहे.
१०) जीवन संघर्ष पुस्तकाचे मराठी साहित्य योगदान काय आहे :-
‘जीवन संघर्ष’ पुस्तक हे कवी नवनाथ राणखांबे याचे पाहिलेच पुस्तक असून पहिलीच आवृत्ती जोरदार प्रसारमाध्यातून गाजत आहे.’ जीवन संघर्ष’ पुस्तकावर विविध मान्यवरांनी लिहिलेली परीक्षणे विविध प्रसारमाध्यमांनी दैनिक, वर्तमानपत्र, साप्ताहिक, मासिक इ . विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले असून त्याचा एक मराठी साहित्य क्षेत्रात ऐतिहासिक विक्रम झाला आहे. सर्वात जास्त पुस्तक परीक्षण प्रसिद्ध होणारे जीवन संघर्ष मराठी साहित्य क्षेत्रात एकमेव आहे. जीवन संघर्ष पुस्तकाने पुस्तक परीक्षणात आघाडी घेतली आहे. ही बाब मराठी साहित्य क्षेत्रात अभिमान स्पद आणि गौरवापात्र आहे. हे नाकारता येऊ शकत नाही
ज्यांच्याकडे सम्यक दृष्टी आहे त्यांना ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रह समजेल. जाती आणि धर्माच्या डोळ्याच्या चष्म्यातून पाहिल्यास ‘जीवन संघर्ष’ त्यांना समजणार नाही.

संदर्भ :- जीवन संघर्ष काव्यसंग्रह, विविध वर्तमानपत्रात विविध मान्यवरांनी लिहिलेली जीवन संघर्ष या कविता संग्रहावरील परीक्षणे, अभिप्राय आणि समीक्षा .

*पुस्तक* :- जीवन संघर्ष
*कवी* :- नवनाथ रणखांबे
*जीवन संघर्ष शोध आणि वेध *

लेखक प्रा.डॉ. विजय मोरे

मोबाईल :- 9029118010
स्वामी विवेकानंद रात्र कला व वाणिज्य महाविद्यालय डोंबिवली.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *