मंदाताई पिळणकर यांची आणि माझी ओळख २०-२२ वर्षांपूर्वींची ! अजुनही आम्ही संपर्कात आहोत. आज मंदाताईंंचे वय ८०+ आहे.
मंदाताई मुंबई सेंट्रलला एका चाळीत एकट्या राहात होत्या . डोंबिवलीत ज्ञानदीप स्री जागृती मंचाचे एकल महिलांसाठी काम सुरू आहे असे कळल्यावर मंदाताईंनी माझ्याशी संपर्क साधला. आम्ही सविस्तर बोललो. तेव्हा समजले की त्या फोर्टमधल्या काही कार्यालयात दुपारचे जेवणाचे डबे पाठवतात. त्यातून मिळणार्या पैशांवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
डोंबिवलीला संस्थेच्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण मी त्यांना पाठवले. आणि काय सांगू .. मंदाताई एवढ्या लांबून डोंबिवलीला आल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले , तेव्हा तर त्यांचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या ‘ ताई, माझ्यासारख्या विधवा बाईला तुम्ही सन्मान दिलात. तुमचे आभार कसे मानू ?’
मंदाताईंच्या प्रेमळ आग्रहाखातर आम्ही उभयता एकदा त्यांच्या घरी गेलो. जेवण , गप्पा झाल्यावर आम्ही निघालो. ‘थोडं थांबा हो ताई ‘ असं म्हणत मंदाताई सारख्या आतबाहेर फेर्या मारत होत्या. तिथे ताटात ओटीचे साहित्य ठेवलेले मला दिसले. मंदाताईंच्या अस्वस्थतेचे कारण माझ्या लक्षात आले. त्यांना विचारल्यावर समजले की ओटी भरण्यासाठी त्यांनी शेजारच्या सवाष्ण बाईंना बोलावले होते. पण त्या बाई बाहेर गेल्या होत्या.
मी मंदाताईंना म्हटलं की तुमची घालमेल कशासाठी चालली आहे ते मी ओळखलंय. माझं ऐकाल का ? तुम्हीच का नाही ओटी भरत ? त्या एकदम गडबडल्याच. ‘ नाय हो ताई . ते कसं चालेल ?’ विधवा बाईने ओटी भरायची नसते. ते अशुभ असतं. जुन्या चालीरीती त्यांच्या मनात खोलवर पक्क्या रुजल्या होत्या. ‘ मला चालेल. या पुढे आणि भरा ओटी.’ मी आग्रह केल्यावर घाबरतच मंदाताईंनी ओटी भरली. निरोप घेताना मी म्हणाले ‘ मंदाताई , काळजी नका करू . काही विपरीत घडेल असा विचारही मनात आणू नका.’ भरल्या डोळ्यांनी मंदाताईंनी आम्हाला निरोप दिला.
स्रियांमधले भेदभाव (म्हणजे विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, मुलं असलेली / नसलेली) संपून त्यांच्यांत भगिनीभाव निर्माण व्हावा यासाठी आमची संस्था प्रयत्नशील आहे. एकल महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, स्रियांच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेतले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. असे झाले तरच स्रियांमधले भेदभाव दूर होतील. स्त्रियांमध्ये समानता नांदेल .
भारती मोरे.
डोंबिवली.
Leave a Reply