नांदेड – भारताला संतांची परंपरा व महिमा अगाध आहे. संतांनी जनजागृती आणि प्रबोधनातून समताधिष्ठित समाजाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तसेच संत साहित्याच्या माध्यमातून त्या भागात बोलली जाणारी भाषा समृद्ध केली असे प्रतिपादन येथील स्तंभलेखक मारोती कदम यांनी केले. ते शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुमेध कला मंचाचे अध्यक्ष कृष्णा गजभारे, मार्शल आर्टचे प्रशिक्षक गंगाधर वडने, सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, धम्मचळवळीचे अभ्यासक भैय्यासाहेब गोडबोले, राहूल कोकरे, पोलिस उपनिरीक्षक अशोक हटकर, साहित्यिक गंगाधर ढवळे, अॅड. नितीन थोरात आदींची उपस्थिती होती.
मराठी भाषा गौरव दिन व संत रविदास जयंती निमित्त शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात व्याख्यान व काव्यपौर्णिमा हा कार्यक्रम घेण्यात आला. यात ज्येष्ठ कवी मोहन नौबते, श्याम नौबते, भगवान वाघमारे, अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, सत्वशिला खिल्लारे, राहूल कदम, अवंतिका कदम यांनी सहभाग नोंदवला. यावेळी बोलतांना कदम म्हणाले की, बुद्धकाळापासून प्रारंभ झालेला समतावाद संत रविदासांनी आपल्या दोह्यांतून मांडला. भाषेचे साहित्य वर्तुळ तर समृद्ध झालेच परंतु समाजाच्या वैगुण्यावर आणि दोषांवर प्रहार केला. त्यांनी सामाजिक समतेचे महत्व समाजामध्ये रुजवले. अध्यक्षीय समारोप करताना माधवराव गायकवाड म्हणाले की, संत रविदास हे मानवतेचे प्रेरक, आद्य क्रांतिकारी संत होते. त्यांनी दोह्यांतून विद्रोही विचार मांडले. सतगुरु रविदास महाराज यांच्या तोंडून निघालेल्या पावन अमृतवाणीतचा जीवनाच्या प्रत्येक वळणावर प्रत्यय येतो. आजच्या चर्मकार समाजाने हा साक्षात्कार करुन घेतला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच संत रविदास महाराज यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर याचना, भीमस्तुती, त्रीसरण पंचशील आणि त्रिरत्न वंदना कार्यक्रम संपन्न झाला. व्याख्यान व काव्यपौर्णिमा कार्यक्रमानंतर उपासिका रेखाताई हिंगोले व उपासक सतीश हिंगोले या दांपत्याने खीरदान केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर ढवळे यांनी केले. प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संयोजक सुभाष लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाधर शिराढोणकर, रंगनाथ कांबळे, सविताबाई नांदेडकर, शोभाबाई गोडबोले, श्यामाबाई नरवाडे, सुमनबाई वाघमारे, शिल्पा लोखंडे, निर्मलाबाई पंडित निलाबाई हटकर, गिताबाई दिपके, आशाबाई राजभोज, बनारसबाई दुधमल, कमलबाई नवघडे, सोनाली शेळके भागीरथाबाई थोरात, गयाबाई हटकर, अंबादास हटकर सखुबाई भोळे, रंजनाबाई हिंगोले, वैशालीताई हिंगोले, लक्ष्मीबाई खाडे, शोभाबाई पवार, चौत्राबाई चींतूरे, रमाबाई लोणी, विजय हिंगोले, सिद्धार्थ कदम, लखन नरवडे, संदीप ठोके यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका आणि बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply