लॉकडाऊनने घराच्या आत थांबायला सांगितले. कित्येकांना ही कैद वाटतेय. मी मात्र ही संधी समजतोय. लिहिणे, वाचणे, चित्रपट बघणे, झोपणे या आपल्या छंदांना भरपूर वेळ देता येईल अशी ही संधी. बघा ना एक बालकादंबरी लवकरच लिहून हातावेगळी होईल. वपूर्झाचं पुन्हा एकदा पारायण करून झालंय. ‘बाप नावाची माय’ पुस्तकाचे वाचन पूर्ण केलेय. एकूणच छंदांना पूरक परिस्थिती आहे म्हणायची.
पुस्तकं चाळत असताना लेखक सुनील जवंजाळ यांची काळीजकाटा ही कादंबरी हाती लागली. कादंबरी तशी छोटीच. लिखाण तर इतकं प्रवाही अन् प्रभावी की साडेचार तासांच्या एकाच बैठकीत 144 पृष्ठांची कादंबरी पूर्णपणे वाचून संपवली. ‘काळीजकाटा’ ही सावली नावाच्या एका चोवीस वर्षीय मुलीची कहाणी. ही शेतकऱ्याची मुलगी. परिस्थितीनं सतत दुष्काळच तिच्या ओढणीला बांधलेला. पण ही ओढणी विणलीय आईवडिलांनी तिच्यावर केलेल्या सुसंस्कारांच्या धाग्यांनी. म्हणूनच ती कुठेही ढळत नाही. संवेदनशील मनाची सावली तिच्या कवितांच्या सोबतीने आपल्यालाही शब्दांनी बांधून ठेवते.
कादंबरीच्या सुरूवातीलाच साहित्याच्या क्षेत्राचं एक काळकुट्टं वास्तव लेखक वाचकांसमोर मांडतो. पुरस्कारांच्या आडून वासनांचा भरणारा बाजार तो परिणामकारकपणे उजागर करतो. या दाहक वास्तवाचा धक्का पचवत सुरू होणारा सावलीचा प्रवास वसंताच्या सहवासात येताच प्रेमाच्या सावलीत विसावू लागतो. पण हे विसावणंही क्षणिकच ठरतं. स्वरांच्या सान्निध्यात सूर लावू पाहणारं त्यांचं प्रेमगीत वाचकांना मोहून टाकतं. पण या प्रेमाला मात्र आयुष्य असतं ते हार्मोनियम पेटीच्या पोटात भरलेल्या हवेइतकंच. सूरांसोबत ते प्रेमही अधूरं राहतं.
प्रेम म्हणजे दोन शरीरांचं नव्हे तर दोन मनांचं मिलन. अशी दोन मनं एकत्र येणं हीच पवित्र प्रेमाची खरी पूर्तता. लौकिकार्थाने ती प्रेमकहाणी अधूरी राहिली असं म्हटलं जात असलं तरी एका मनानं दुसऱ्या मनाला मिठी मारणं ही प्रेमाची यशस्विताच नव्हे काय? आई वडिलांच्या प्रेमाखातर, त्यांच्या संस्कारांची बूज राखत आपल्या तारूण्यसुलभ प्रेमाला मनातच जपून ठेवणारी सावली वाचकाला प्रभावित केल्याशिवाय राहत नाही. पुस्तकातल्या लेखकाच्या प्रतिमेचा वापर करत कथेच्या नायकाचंही मन जाणणारी अन् जपणारी सावली खऱ्या अर्थाने या कादंबरीचा प्राण आहे. आणि लेखक सुनील जवंजाळ यांनी आपल्या शब्दांनी ती अक्षरशः जिवंत केली आहे. काही ठिकाणी लेखक आपल्याला सिनेमाची स्टोरी सांगतोय अशा पद्धतीने क्रियापदांचा होणारा वापर खटकतो. उदा. ‘सावली पुस्तक वाचत बसते.’ अशा वाक्याच्या ठिकाणी ‘सावली पुस्तक वाचत बसली.’ असे वाक्य आले तर वाचनाचा ओघ कायम राहिला असता .पण असे क्वचितच जाणवते.दर्जेदार पुस्तकांची आपली प्रतिष्ठा कायम राखत चपराकच्या घनश्याम पाटलांनी ‘काळीजकाटा’ प्रकाशित केली आहे. कादंबरीचं मुखपृष्ठ बोलकं आहे. “एक सुंदर आणि संवेदनशील वाचनसंस्कार म्हणजे काळीजकाटा” असे या कादंबरीच्या बाबतीत म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
‘ काळीजकाटा ‘
लेखक – सुनील जवंजाळ
प्रकाशक – चपराक प्रकाशन, पुणे
लेखक संपर्क – 9404692662
– शिरीष पद्माकर देशमुख
मो. 7588703716
मंगरूळ ता मंठा जि जालना
Leave a Reply