जालना ( प्रतिनिधी) : आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या पीछेहाट झालेल्या मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. ओबीसींचे नको तर स्वतंत्ररित्या आरक्षण द्यावे अशी मराठा क्रांती मोर्चा ची भूमिका राहिली आहे. साष्टपिंपळगाव येथील आंदोलनकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण स्वतः पोहोचविणार आहोत .असे स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत मराठा समाजास न्याय मिळेल असा विश्वास शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलताना व्यक्त केला. तथापि मराठा आरक्षण आंदोलनास आपला जाहीर पाठिंबा असल्याचेही श्री खोतकर यांनी सांगितले.
साष्ट पिंपळगाव ता. अंबड येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलन व आमरण उपोषणास गुरुवारी ( ता. २८) माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी भेट देऊन आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्यासह समाजबांधवांना धीर दिला व आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी पंडीतराव भुतेकर, बाबासाहेब इंगळे, अशोक पाटील, गणेश पागिरे, लक्ष्मण धोत्रे, शिवाजी मोरे, दत्ता जाधव, नारायण शिंदे, गणेश जाधव, किशोर रंधे आदींची उपस्थिती होती.
अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराच्या आधीन राहुन आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहात .सर्वोच्च न्यायालय मराठा समाजातील गरीब, दुबळ्या तरुणांचा विचार करेल. अनेक राज्यांनी आरक्षणाच्या बाबतीत लक्ष्मणरेषा ओलांडली आहे त्याच धर्तीवर मराठा समाजास आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा अशी अपेक्षाही श्री खोतकर यांनी व्यक्त केली असे झाल्यास समाजा -समाजात फूट पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे भरभक्कम बाजू मांडली जाईल. असेही श्री .खोतकर यांनी सांगितले.
Leave a Reply