नांदेड – कोरोनाच्या महासंकटाने होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. अनेक घरांना कुलुपबंद ठेवण्याची वेळ आली आहे तर शेकडो मुले अनाथ झाली आहेत. अनेक महिला निराधार झाल्या आहेत. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या हाहाकाराने मुलांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. परंतु हा ग्रामीण भागात अयशस्वी ठरला आहे. यासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू केल्याशिवाय हे शैक्षणिक नुकसान भरून निघणार नाही. सर्वच इयत्तांमधील विद्यार्थ्यांचे टप्याटप्याने लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करण्यात येऊ नयेत. संपूर्ण लसीकरण हाच आॅनलाईन शिक्षणाला पर्याय आहे असे मत येथील शिक्षक साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी व्यक्त केले.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी शिक्षक साहित्यिक मंडळाच्या वतीने सुरू होत असलेल्या २०२१-२२ या शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन पद्धतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘आॅनलाईन शिक्षण – काळाची गरज’ या विषयावर सहभागी होतांना शिक्षक कवी प्रशांत गवळे म्हणाले की, सध्या स्पर्धेचे युग आहे त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.विज्ञान आणि तंञज्ञानामुळे आज विद्यार्थ्यांना घरी बसून आॕनलाईन शिक्षण घेता येते.ब-याच वेळेला पुणे -मुंबई – अशा ठिकाणी जाता येत नाही…अशा वेळेला तिथल्या अॅकॅडमीला जाॅईन होऊन आॅनलाइन क्लासव्दारे मार्गदर्शन घेऊ शकतात.
हिमायतनगर येथून ज्येष्ठ साहित्यिक पांडूरंग कोकुलवार यांनी ऑनलाइन शिक्षण हे आजच्या आधुनिक काळात ऊर्जेचे श्रोत बनले आहे.पण ग्रामीण भागात शिक्षणाचा म्हणावा परिणाम होताना दिसून येत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्त्याना नेहमी अडचणीला सामोरे जावे लागते. अँड्रॉइड मोबाईल, संगणक, इंटरनेट, टी. व्ही., आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे शिक्षणाची हेळसांड होत आहे, याबद्दल दुःख व्यक्त केले. देश समृद्ध आणि विकासाच्या दृष्टीने पाऊले उचलत असताना शिक्षण ही ऑनलाइन असायलाच पाहिजे पण किमान प्रत्येक खेड्यापाडयात किमान इंटरनेट किंवा वाय-फायची सुविधा आणि चोवीस तास वीज पुरवठा सुरू ठेवल्यास नक्कीच प्रत्येक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचा लाभ मिळवू शकेल, असेही ते म्हणाले.
शिघ्रकवी कैलास धुतराज म्हणाले की, गरज ही शोधाची जननी असते. परिवर्तन ही जीवनाचा पाया आहे. प्रत्येक गोष्ट ही काळानुरुप बदलत असते. त्यानुसार आज शिक्षण पद्धतीत सुद्धा बदल करावा लागला. कोरोना सारख्या महामारीमध्ये जीव जगला पाहीजे;जीव टिकला पाहीजे. मुलांना शिक्षण हे आॅनलाईन देऊन त्याला तंत्रज्ञानाशी जुळवून घेता आल पाहीजे.आम्ही शिकत आसतांना साधा टि.व्ही.सुद्धा आम्हाला चालू बंद करता येत नव्हता. आजची पिढी अँन्ड्राईड फोन सहजपणे हाताळतात.स्वतःच्या स्वतः शिकतात. खुप मोठा बदल आज शिक्षणपद्धतीत झाला आहे. आँनलाईन शिक्षण ही काळाची गरज ठरली आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागोराव डोंगरे, शंकर गच्चे, मारोती कदम, बाबुराव पाईकराव रणजीत गोणारकर आदींनी पुढाकार घेतला होता.
Leave a Reply