गुरु-शिष्य परंपरा ही भारताचे वैशिष्ट्य आहे. भारताने विश्वाला दिलेली देणगी म्हणजेच गुरु-शिष्य परंपरा. या परंपरेने प्राचीन काळापासून विविध शिष्य तयार करून जगाच्या कल्याणासाठी दिले. अनेक संत राजे-महाराजे हे या परंपरेतूनच घडले. या परंपरेने वाल्याचा “वाल्मिकी” केला व एक आदर्श समाज परिवर्तनाचे उदाहरण जगासमोर ठेवले. स्वराज्याची निर्मिती करण्याचे छत्रपती शिवरायांचे मनोबल निर्माण करणारे व वाढविणारे ही गुरूच होय. ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’ असे संत तुकारामांनी म्हटले आहे.
ईश्वरप्राप्तीचे माध्यम, ज्ञानप्राप्तीचे माध्यम म्हणजे गुरू होय. या परंपरेने समाजाला अनेक गुरू लाभले व गुरुकार्य व ही परंपरा अखंड कार्य करताना आम्हाला आजही दिसुन येते. गुरु-शिष्य परंपरेतून महान राष्ट्राच्या निर्मितीचे व रक्षणाचे कार्य कसे झाले हे पुराणातील अनेक उदाहरणांवरून दिसून येते. उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण, चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य, समर्थ रामदास स्वामी व संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. काळानुरूप वेगवेगळ्या संतांच्या हातून जे महान समाजप्रबोधनाचे कार्य झाले ते या गुरु-शिष्य परंपरेचे फलित होय. गुरुआज्ञा प्रमाण मानून विविध संतांनी आपले जीवन समाजाच्या उध्दारासाठी वाहून घेतले. गुरु वचनांवरील श्रद्धेने ते हे कार्य करू शकले. संत एकनाथ महाराजांना त्यांचे गुरू जनार्दन स्वामी यांनी आज्ञा केली की तुझ्या हातून या समाजासाठी खूप मोठे कार्य घडणार आहे, तू संसार करून परमार्थ कर व या गुरु वचनाची प्रचिती आपण बघतोच मोठ्या ग्रंथसंपदे ची निर्मिती करत संत एकनाथ महाराजांनी आपल्या किर्तन भजन व भारूडातून समाजाला ज्ञान प्रदान केले व एकतेचा संदेश दिला. गुरु आज्ञेनुसार अनेक संतांनी भारत भ्रमण करून विविध ठिकाणी धर्म व अध्यात्माचा प्रसार करत विश्वशांतीचे कार्य केलेले आम्हाला दिसते. संत तुकाराम महाराजांचे अभंगातून आम्हाला जीवनाच्या वास्तविकतेचे दर्शन घडते तर भक्तीमय होऊन आनंदी जीवनाचे सार त्यात उलगडते. समाजातील दांभिकता व कुप्रथेवर प्रहार करत समाजाला भक्तिमार्गाने आणि समाज वर्तनाचे सूत्र मांडत ईश्वरप्राप्ती कडे नेण्याचे कार्य ही गुरुशिष्य परंपरा आजही विविध संत व त्यांच्या वांङमयातून करताना आम्हाला दिसते. या परंपरेतूनच घडलेले व विश्वात भारताची महानता पुन्हा एकदा सिद्ध करणारे स्वामी विवेकानंद आज कित्येक तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. अशीही गुरुशिष्य परंपरा म्हणजे भारताने विश्वाला दिलेली एक अनमोल भेट होय.
डॉ० पी एस. महाजन
संभाजीनगर
Leave a Reply