जालना, दि. 27 :- जालना जिल्ह्यात कोव्हीड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण व्हावे यादृष्टीने मिशन कवचकुंडल अभियानाचा तिसरा टप्पा 2 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार असन या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे. कोव्हीड19 लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री जिंदल बोलत होते.
यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. जे.पी. भुसारे, औरंगाबादचे सर्व्हेलन्स मेडीकल ऑफीसर डॉ. सय्यद मुजीब, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह सर्व मुख्याधिकारी तसेच नगरसेवकांची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जिंदल म्हणाले, शहरी भागामध्ये लसीकरणाचे प्रमाण अधिक वाढावे यासाठी लसीकरणाबाबत जनमानसांमध्ये प्रभावीपणे जनजागृती करण्यात यावी. शहरातील ज्या वार्डमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी अधिक प्रमाणात लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. मुस्लीम धर्मगुरुंनी प्रार्थनास्थळांच्या माध्यमातुन मुस्लीम बांधवांना लसीची उपयुक्तता पटवुन देत लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Leave a Reply