अकोला: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल समर्थकांशी संवाद साधताना भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना अप्रत्यक्ष टोले लगावले. त्याची चर्चा रंगत असतानाच आता या वादात राष्ट्रादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करून हा सल्ला दिला आहे. या ट्विटमधून मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्लाही चढवला आहे. ताईंनी आज कौरावांना चांगलंच झोडपलं. ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे, हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलंय. मामु सोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व पोरी पळवून नेणारे दुःशासनपण आहेत. “नरो वा कुंजरोवा होऊ देऊ नका, असं आवाहनही मिटकरी यांनी केलं आहे. मिटकरी यांच्या या सल्ला वजा खोचक ट्विटची जोरदार चर्चा होत आहे. त्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?
नाराजीच्या पार्श्वभूमीवर पंकजा समर्थकांनी पदाचे राजीनामे दिले होते. पंकजा यांनी काल या समर्थकांशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. मनातील खदखद बोलून दाखवतानाच महाराष्ट्र भाजपातील राजकारणावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मात्र, पक्षातच सक्रिय राहण्याचे संकेतही त्यांनी दिले. मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही. मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे, असं पंकजा म्हणाल्या होत्या.
धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न
पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं होतं. त्यामुळे पंकजा यांचं धर्मयुद्ध स्वपक्षीयांसोबत अजूनही सुरूच असल्याचं अधोरेखित झालं आहे. हाच धागा पकडून मिटकरी यांनी त्यांना सल्ला दिला आहे.
Leave a Reply