उरण (तृप्ती भोईर) : रायगड जिल्ह्यातील स्वतंत्र पुर्व काळातील इतिहास पहाता उरण तालुक्यातील माती कलेची उज्वल परंपरा व वारसा लाभलेले एक प्रसिद्ध खेडेगाव म्हणजे चिरनेर होय. पुर्वापार चालत आलेल्या या मातीकाम व्यवसायातून चिरनेर येथील कुंभार बंधु भगिनीं अनेक प्रकारची स्वयंपाकास उपयोगी मातीची भांडी, मडकी व श्रीगणेश मुर्ती साकारण्याचे काम करीत आहेत. उदरनिर्वाहासाठी येथील अनेक कारागिर पिढ्यांन पिढ्या या व्यवसायात काम करत आहेत. व ही कलाही जपत आहेत.
परंतु याच मातीकलेत आजच्या प्रगत युगातील आधुनिक माती कामाचे ज्ञान व कौशल्य येथील कुंभार बंधु भगिनीं ना मिळावे,याकरीता सोमवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी चिरनेर येथील कुंभार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते गणेश चिरनेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चिरनेर येथे केंद्रसरकारच्या हस्तशिल्प विभागातर्फे ,वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या वतीने आधुनिक कुंभार काम प्रशिक्षण शिबीर एक महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आले आहे. या शिबिरात चिरनेर मधील कुंभार समाजातील ३० कुटुंबातील समाजबांधवांनी सहभाग घेतला आहे. या शिबीराच्या माध्यमातून वेगवेगळी मातीची भांडी, घरगुती वापरातील भांडी, फ्लॉवर पॉट, शोभेची भांडी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. एक महिन्याच्या कालावधीसाठी चालणाऱ्या या शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना केंद्र सरकारच्या हस्तशिल्प वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने चालणाऱ्या या प्रशिक्षणास भारत सरकारच्या वतीने अर्थिक भत्ता ही देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुंभार समाज महाराष्ट्र सरचिटणीस मोहन कुंभार, रायगड जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष अनंत महाडकर, ठाणे जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष राम पारनेरकर, रायगड जिल्हा कुंभार समाज उपाध्यक्ष नंदकुमार चिरनेरकर, कोकण विभागीय महिला अध्यक्षा लिना चौलकर, रायगड जिल्हा कुंभार समाज महिला कार्याध्यक्षा दिपा मोरे, व चिरनेर येथील समस्त कुंभार बंधु भगिनीं आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गोरोबा काका सेवा मंडळ समाजाचे गजानन चौलकर यांनी केले. व सुत्रसंचलन रमाकांत गोरे व संतोष चौलकर यांनी केले.
Leave a Reply